दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
खईके पान बनारसवाला….
यातील एका गाण्याच्या रेकॉर्डींगच्या वेळचा किस्सा मस्त आहे. गाण्याचे बोल होते ’खईके पान बनारस वाला’ (या गाण्याची जादू आजही अबाधित आहे. शाहरूखच्या ’डॉन’ मध्ये देखील हे गाणं नव्या रूपात घेतल होतं) हे गाणं लिहिलं होतं गीतकार अंजान यांनी. किशोरदांनी रेकॉर्डींगच्या वेळी विचारलं ’दादा आपने ’खा के’ की जगह ’खईके’ और ’हो जाये’ की जगह ’हुई जाय’ ऐसा क्यूं लिखा हैं ?’ अंजान म्हणाले ’किशोरदा इस फिल्म का ’छोरा’ ’ गंगा किनारेवाला’ हैं और उसकी जुबान में बनारस की भाषा है !’ किशोरला गाण्याचा मूड लक्षात आला व बनारसी बोलीतलं गाणं तो झकास गायला. या गाण्याच्या शब्द रचनेतला सर्वात खास भाग म्हणजे गाणं सुरू होण्यापूर्वीच्या चार ओळी! ’अरे भंग का रंग जमा हो चकाचक फिर लो पान चबाये, अरे ऐसा झटका लगे जिया पे पुनर जनम होई जाये’ भांग प्यायल्यानंतर येणारा ’फिल’ नेमका कसा असतो तर ’चकाचक’ आणि एकदा का भांग चढली की सगळंच नवंनवं वाटायला लागतं. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी याला संगीत देताना र्हीदम मस्त पकडला आहे. किशोरने गाताना बनारस पानं मागवली, पींक दानी मागवली आणि मस्त पैकी पान खात खात गाणं गावून गेला. नेमका वादक वर्ग कमी असल्याने अंतर्यामधे संगीतकारांनी किशोरच्या हरकती वाढवत आणखी मजा आणली. (मै कैसा सीधा साधा मै कैसा भोलाभाला…!) रेकॉर्डींगच्या वेळी किशोरदा धमाल नाचत नाचत गात होते. रेकॉर्डींग इंजिनियर कौशिकदा यांनी एका टेक मधे गाणं रेकॉर्ड केलं.
खरंतर हे गाणं सिनेमात नव्हतच. सिनेमाचं शूटींग पू्र्ण झाल्यावर हे सिनेमात घेतल गेलं! पण या गाण्याचा जन्म मुळी या सिनेमा साठी झालाच नव्हता. हे गाणं खरं तर देवा आनंदच्या ‘बनारसी बाबू‘ या सिनेमासाठी बनवले होते पण काही कारणाने त्या सिनेमात घेतले गेले नाही. दिग्दर्शक चंद्र बारोट यांनी मनोजकुमारच्या सल्ल्याने हे गाणं या सिनेमात घेतले!
मुंबईतल्या जोगेश्वरीच्या एका खर्याखुर्या धोबी घाटाच्या लोकेशनवर नृत्य दिग्दर्शक पी एल राज यांनी गाणं चित्रीत केलं. समजून उमजून सर्वांच्या सहकार्याने बनलेली कलाकृती चिरंजीव ठरते हेच खरं! गंमत बघा जर हे गाणे ‘डॉन’ मध्ये घेतलं नसतं तर चित्रपट अधुरा तर वाटलाच असता आणि मुख्य म्हणजे हे गाणे असेच अंधाराच्या गर्तेत खितपत पडले असते.
धनंजय कुलकर्णी