‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
तमाशापटांचे बादशाहा : अनंत माने
मराठी सिनेमातील तमाशापटांचे बादशाहा म्हणून ज्यांचा अभिमानाने उल्लेख होतो ते म्हणजे दिग्दर्शक अनंत माने (जन्म:२२ सप्टेंबर १९१५) जर व्यक्तीकडे जिद्द, चिकाटी, संघर्षाची तयारी आणि आत्मविश्वास असेल तर यशापासून त्याला कुणी रोखू शकत नाही हे मान्यांचं चित्र कर्तृत्व पाहिल्यावर सिध्द होतं. प्रभातमध्ये बिनपगारी अक्षरश: हरकाम्या म्हणून काम करीत त्यांनी चित्रपटाच्या प्रत्येक अंगाचा अगदी बारकाईने अभ्यास केला. प्रभातमध्ये त्यांना मान्यवरांचं काम जवळून पाहता आलं आणि त्यातूनच माने घडत गेले. माने प्रभात मधून बाहेर पडून राजा नेने यांच्यासोबत काम करू लागले. त्यावेळी राजकमलमध्ये खुद्द बापूंनी त्यांना ऑफर दिली होती. सिनेमाचा समाजावर समर्पक प्रभाव पडावा व सोप्या भाषेत आपला संदेश, आपलं काम लोकांपर्यंत पोचावं यावर त्यांचा विशेष भर असायचा. याबाबतचा एक किस्सा ऐकण्यासारखा आहे. (Anant Mane)
‘आल्हाद चित्र’ च्या ‘बाळा जो जो रे’ च्या वेळी माने व ग. दि. माडगूळकर यांच्यात अंगाई गीतावरून खटका उडाला. माडगूळकरांनी लिहिलेले अंगाई गीत ऐकून माने म्हणाले, ‘तुमचे गीत साहित्याच्या दृष्टीने उत्तम आहे. पण सामान्य प्रेक्षकांना ते बोजड होईल. तुमचं गीत घराघरातून प्रत्येक स्त्रीने म्हटले पाहिजे किंबहुना घरकाम करणार्या मोलकरणीच्यासुद्धा ते तोंडात बसले पाहिजे.’ यावर माडगूळकर मान्यांवर भडकले व गीताचा कागद टराटरा फाडून त्यांच्या अंगावर फेकत म्हणाले, ‘मी हे तुमचे गीत लिहिणार नाही.’ यावर माने खोलीतून निघून गेले. थोडा वेळ गेल्यावर माडगूळकरांनी मान्यांना हाक मारली व म्हणाले, ‘या बसा’ आणि नवीन लिहिलेले अंगाई गीत त्यांनी ऐकवले. हे गीत होतं बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे, डोळ्यांची पाखरे.. हे गाणं ऐकून मान्यांचा चेहरा खुलला. माडगूळकरही खुश होऊन म्हणाले, ‘कसं आहे?’ माने म्हणाले, ‘एकदम बेस्ट!’ पुढं हे अंगाई गीत विलक्षण लोकप्रिय झाले. विनायकराव देऊळगावकरांच्या ‘अजिंठा फिल्म’च्या ‘ओवाळणी’, ‘पुनवेची रात’, ‘प्रीतीसंगम’, ‘पैशाचा पाऊस’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शन अनंत मान्यांनी केले. १९५६ नंतर अनंत माने यांनी स्वत:ची ‘चेतना चित्र’ ही चित्रसंस्था सुरू केली. या चित्रसंस्थेतर्फे त्यांनी ‘पायदळी पडलेली फुले’, ‘सांगत्ये ऐका’, ‘सवाल माझा ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘सांगू कशी मी’, ‘गण गौळण’, ‘अशीच एक रात्र होती’, ‘सुशीला’ हे चित्रपट निर्माण केले. यातील ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाने इतिहास घडवला. (Anant Mane)
मधल्या काळात अनंत मान्यांनी ‘अनंत चित्र’ या नावाचीही त्यांची एक चित्रसंस्था काढली होती. या संस्थेतर्फे त्यांनी ‘रंगपंचमी’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘प्रीतिविवाह’, ‘नार निर्मिते नरा’ व ‘काय हो चमत्कार’ असे चित्रपट काढले. कविवर्य ग. दि. माडगूळकर, पु. वा. भावे, य. गो. जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, रणजित देसाई, व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील अशा मराठीतील थोर साहित्यिकांचा सहवास अनंत माने यांना लाभला. मान्यांमध्ये एक सुप्त कथाकार होता. मान्यांच्या एकूण ५३ दिग्दर्शित चित्रपटांपैकी सुमारे ३० चित्रपटांच्या कथा त्यांनी स्वत: लिहिल्या होत्या. अनंत, माने, राम कदम व जगदीश खेबूडकर या त्रयीने सुमारे दोन दशके (१९६५ ते १९८५) मराठी चित्रपटसृष्टीवर व मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. (Anant Mane)
=======
हे देखील वाचा : पथुपतीनाथ मंदिरातून 10 किलो सोने गायब
=======
चित्रपटाच्या चित्रिकरणाला प्रारंभ करायच्या आधीच, त्यांचं चित्रपट निर्मितीचं नियोजन पक्कं असे. ठरलेल्या मुदतीतच ते चित्रपट पूर्णही करीत. “सांगत्ये ऐका’ चं चित्रीकरण अवघ्या तीन महिन्यात त्यांनी पूर्णही केलं. एक वग, एक द्वंद्व गीत, एक भूपाळी, एक स्त्री गीत आणि तीन लावण्या यासह आठ गाण्यांचा समावेश त्यात होता. हा चित्रपट पुण्याच्या विजयानंद थिएटर मध्ये तब्बल १३१ आठवडे मुक्कामी होता. हा विक्रम आजही अबाधित आहे. ‘एक गाव बारा भानगडी’ हा त्यांचा चित्रपट राजकीय पार्श्वभूमीचा होता. ’पिंजरा’च्या वेळी माने प्रस्थापित दिग्दर्शक असताना केवळ आपल्या गुरूच्या हाताखाली काम कर्ण्यासाठी ते सहायक दिग्दर्शक बनले.