किरण….तुसी ग्रेट हो…..
कपाळावर भली मोठी टीकली. छानशी काठपदराची साडी. गळ्यात त्या साडीला साजेसा पण भरभक्कम असा नेकलेस आणि कानात मोठ्या रिंगा. हातात बांगड्या अन् केसांच्या अंबाड्यावर सुवासिक फुलांचा गजरा. या सर्वांसोबत चेह-यावर प्रसन्न हास्य. अशा किरण खेर जेव्हा पडद्यावर येतात आणि हार्मोंस दिमाग में घुस जाते हैं और दिमाग सड़ जाता है. असे डायलॉग जेव्हा त्यांच्या खास पंजाबीढसक्यात म्हणतात, तेव्हा सगळ्या थेटरमध्ये टाळ्या पडतात. त्यांची भूमिका ही मुख्य नसते. पण हिरोईन पेक्षा कमीही नसते. अशा आहेत किरण खेर. वयाच्या पासष्टीला पोहोचलेली ही अभिनेत्री आपल्या अभिनयानं आणि प्रसन्न चेह-यानं साईड रोल असूनही प्रमुख भुमिके इतकीच भाव खाऊन जाते…
किरण खेर म्हणजे तमाम बॉलिवूडची मॉडर्न मॉं. एकदम स्टाईलिश. आधुनिक विचारांची. आपल्या पंजाबी लहेजाच्या हिंदीचा परफेक्ट वापर करणारी. किरण खेर यांची ओळख फक्त अभिनेत्री म्हणून नाही तर समाजकार्यांतही त्यांचा पुढाकरा असतो. माजी बॅटमिंटनपट्टू म्हणूनही त्या ओळखल्या जातात.
पंजाबी परिवारातील किरण यांचा जन्म 14 जून 1955 रोजी चंदिगढ मध्ये झाला. रंगभूमीकडे लहानपणापासून ओढा असल्यानं पंजाब विद्यापिठाच्या डीपार्टमेंट ऑफ इंडीयन थेअटर मधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर गौतम बेरी यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना सिकंदर नावाचा मुलगाही झाला. दरम्यान किरण यांनी पेस्टनजी या पंजाबी चित्रपटात कामही केले. त्यानंतर आसरां प्यार का हा आणखी एक पंजाबी चित्रपट त्यांना मिळाला. पण त्यात फारसे यश आले नाही. या दरम्यान किरण आणि गौतम यांच्यातील संवाद मात्र संपला होता. दोघांनाही जाणीव झाली की आपल्या नात्यात प्रेम राहिले नाही. त्यामुळे दोघांनीही परस्पर समजुतीनं घटस्फोट घेतला. त्याच वर्षी म्हणजे 1985 मध्ये किरण या खेर झाल्या. म्हणजेच त्यांच्या परिचयाचे असलेल्या अनुपम खेर यांच्यासोबत त्यांनी दुसरा विवाह केला. अनुपम खेर यांचाही हा दुसरा विवाह होता. त्यांची पहिली पत्नी मधुमालती आणि त्यांचा नुकताच घटस्फोट झाला होता. किरण आणि अनुपम यांची आधीपासूनची ओळख होती. या दोघांच्या दुस-या लग्नाची गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी रंजक आहे.
अनुपम खेर हे काश्मिरी पंडित. त्यांचे वडील शिमला वन विभागात क्लार्क म्हणून काम करायचे. किरण तर अस्सल पंजाबी कुटुंबातून आलेल्या. त्यांचे कुटुंब जमिनदार म्हणून प्रसिद्ध होते. दोघांची पहिली ओळख चंदिगढ शहरात झाली. हे दोघंही चंदिगढ थियेटर ग्रुपमध्ये काम करायचे. तिथेच दोघांची मैत्री झाली. त्यानंतर किरण, गौतम बेरी यांच्याबरोबर विवाह करुन मुंबईला आल्या. इकडे अनुपम यांचाही विवाह मधुमालती नावाच्या मुलीबरोबर झाला. त्यांचेही वैवाहिक आयुष्य सुरु झाले होते. दोघंही जरी वेगवेगळे झाले असले तरी थिएटर म्हणजेच रंगभूमी बरोबर दोघांचेही संबंध चांगलेच होते. या दोघांनीही रंगमंच आपल्यापासून दूर केला नव्हता. नादिरा बब्बर यांच्या एका नाटकादरम्यान कलकत्ता येथे या दोघांची पुन्हा भेट झाली. तेव्हा अनुपम यांनी आपले केस काढले होते. त्यांचा लूक बदलला होता. नाटक संपल्यावर या जुन्या मित्र-मैत्रिणींनं खूप गप्पा मारल्या. या भेटीतच अनुपम यांना किरण यांच्याबद्ल प्रेम वाटू लागलं. त्यानंतर थोड्याच दिवसात अनुपम थेट किरण यांच्या घरी गेले आणि त्यांनी किरण यांना प्रपोज केलं. किरण यांचं लग्न झालं असून त्यांना एक मुलगा आहे, याची त्यांना कल्पना होती. दरम्यान गौतम आणि किरण यांच्या संबंधातही कटूता आली होती. त्यामुळे हा पहिला विवाह घटस्फोटापर्यंत पोहचला होता. किरण यांनी घटस्फोटानंतर अनुपम यांच्याबरोबर विवाह केला.
दुस-या विवाहानंतर काही वर्ष किरण रंगमंच आणि पडद्यावर दिसल्या नाहीत. या दरम्यान अनुपम यांचा भरभराटीचा काळ होता. ते शुटींगमध्ये बिझी असायचे. त्यामुळे आपला सगळा वेळ किरण यांनी घरासाठी आणि मुलगा सिकंदर याला दिला. दरम्यान श्याम बेनेगल हे सरदारी बेगम चित्रपट काढत होते. श्याम बेनेगल यांच्या या चित्रपटात किरण यांना मुख्य भूमिका म्हणजे सरदारी बेगमची भूमिका मिळाली. या पहिल्याच चित्रपटांनं किरण खेर यांच्या अभिनयाची ताकद समजली. सरदारी बेगमचं सौंदर्य. त्यांची गाण्यातील नजाकत. यातून आलेले पैसा. बेफीकीरी आणि दुःख. किरण यांनी हुबेहुब सरदारी बेगम उभी केली. किरण यांना या पहिल्याच चित्रपटात स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला. त्यानंतर त्यांनी ऋतुपर्णा घोष यांचा बंगाली चित्रपट बैरीवाली केला. यातही त्यांचा अभिनय लाजवाब होता. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर किरण खेर हे नाव बॉलिवूडमध्ये स्थिर होऊ लागले. त्यानंतर आला संजय लीला भनसाली यांचादेवदास. मोठ्या बजेटच्या देवदास मधील सुमित्रा कोण विसरेल. पारुची आई. छोट्याश्या हवेलीत रहाणारी. पण आपल्या मुलीसाठी मोठी स्वप्न बघणारी. नेहमी उत्साही राहणारी सुमित्रा. आपल्या मुलीच्या लग्नाची बोलणी करायला गेल्यावर आऩंदानं नाचणारी सुमित्रा. आणि तिथे आपला आणि आपल्या मुलीचा अपमान झाल्यावर संतापानं पेटून उठणारी सुमित्रा. आई तो थी तुझे दुआएं देने कि तेरे घर चांद सा बेटा हो, पर अब तो यही दुआ निकलती है कि तेरा घर भी चांदनी से आबाद हो, तेरे घर भी बेटी हो हा डायलॉग बोलते तेव्हा तिच्या संतापानं स्तब्ध व्हायला होतं. किरण यांची ही सुमित्रा सुपर ठरली. इथून किरण यांच्या बॉलिवूडमधील मम्माचा प्रवास सुरु झाला.
वीर-जारा, देवदास, कर्ज, हम, मै हॅू ना, दोस्ताना, कभी अलविदा ना कहना, मिलेंगे-मिलेंगे, कमबख्त इश्क, कुर्बान, फना, पंजाब 1984, ओम शांती ओम, हम तुम, एहसास, अजब गजब लव, खूबसुरत, टोटल सियप्पा, रंग दे बसंती, सिंग इज किंग सारख्या चित्रपटातून आईची भूमिका केली. त्यांची ही आई त्यांच्या मुळ स्वभावासारखीच असल्यामुळे ती कधीही फिल्मी वाटली नाही. प्रत्येकाला आपली वाटली. बॉलीवूडची आई म्हणजे कायम दुःखी भूमिका. सदैव दुःखात पिचलेली आई. ही कल्पनाच किरण यांच्या भूमिकेनं मिटवून टाकली. आपल्या मुलाला किंवा मुलीला समजून घेणारी. मुलीच्या बॉयफ्रेंडला स्विकारणारी. तर कधी मुलाच्या जवळच्या मित्राला बघून जीते रहो, फूलो फलो, खैर छोड़ो हा डायलॉग मारणारी आई. सिंग इज किंगमध्ये तर किरण खेर यांनी अक्षय कुमारच्या जोडीनं धम्माल केली आहे. ओय हॅप्पी. ही त्यांची हाक लोकप्रिय झाली होती. या कसलेल्या अभिनेत्रीचा अनेक आंतराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान करण्यात आलं आहे.
किरण या मोठ्या पडद्यावर कमाल करत होत्याच पण त्यांनी काही काळ छोट्या पडद्यावरही काम केले आहे. प्रितिमा, गुब्बारे,इसी बहाने अशा मालिकांमधून त्यांनी काम केले आहे. कलर्स चॅनेलच्या इंडीयाज गॉट टैलेंटमध्ये तर जज म्हणून किरण या अधिक प्रसिद्ध होत्या. त्यात त्यांनी घातलेल्या साड्या आणि त्यांची ज्वेलरी याची चर्चा खूप झाली.
हे सर्व चालू असतांना संवेदनशील मनाच्या किरण यांनी समाजकार्यातही आपलं योगदान दिलं आहे. भ्रुण हत्येविरोधात चालू असलेल्या लाडली या चळवळीत त्यांचा सहभाग मोठा होता. कॅंसर रोको हे कॅंसर बाबत जनजागृती करणारं कॅंम्पेन करण्यात आलं होतं. त्यातही किरण यांचा सहभाग होता. किरण यांनी 2009 मध्ये राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीच्या त्या सदस्य झाल्या. देशभर पार्टीसाठी चाललेल्या प्रचार कार्यात त्या सहभागी होत्या. 2011 मध्ये आपल्या माहेरी अर्थात चंदीगढमध्ये झालेल्या पालिका स्तरावरील निवडणुकांमध्येही त्यांनी प्रचाराची मोहीम सांभाळली. अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या भ्रष्ट्राचार विरोधी मोहीमेतही त्या सहभागी झाल्या होत्या. 2014 मध्ये किरण खेर या स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. चंदिगढ मतदार संघातून त्या लोकसभेसाठी विजयी झाल्या.
किरण खेर यांचं सगळं आयुष्य हे चढ-उतार यांची सांगड असेच आहे. अनुपम यांच्याबरोबर विवाह झाल्यावर त्यांनी दहा वर्ष मोठ्या पडद्यापासून स्वतःला वेगळं ठेवलं होतं. तेव्हा अनुपम खेर यांच्याकडे अनेक चित्रपट होते. पण काही वर्षांनी अनुपम यांना चित्रपट मिळेनासे झाले. तेव्हा किरण यांना चित्रपटाच्या ऑफर सुरु झाल्या. दोघांमध्ये काही काळ भांडणंही झाली. पण ही दोघं मेड फॉर इच अदर ठरली. काहीवेळा पैश्याचा तंगीमुळे दोघंही बेजार झाले होते. अपयश होतं. निराशा होती. पण दोघांनीही एकमेकांना साथ दिली आणि सामजस्य दाखवले. आज हे जोडपं बॉलिवूडमध्ये आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं.
किरण या खेळाडू वृत्तीच्या. त्या स्वतः प्रकाश पादुकोण यांच्यासोबत बॅडमिंटन खेळल्या आहेत. त्यामुळे हार जीत पचवण्याची क्षमता त्यांच्याकडे नक्कीच आहे. यात त्यांचा हौशी स्वभाव. त्यांच्याकडे साड्यांचा खजिना असल्याची थट्टा अनेकवेळा केली जाते. आणि ते खरंही आहे. त्या स्वतः साड्या आणि दागिन्यांच्या शौकीन आहेत. आपलं वय काय झालं. हा प्रश्न त्यांना आवडत नाही. सदा हसत रहावं. आनंदी रहावं हा त्यांचा मंत्र आहे. म्हणूनच वयाच्या पासष्टव्या वर्षात ही किरण बहरलेली आहे…