
किशोर कुमार आणि बप्पी लहरीच्या गाण्याची झाली अदलाबदल!
सिनेमाच्या दुनियेत कधी कधी धमाल गमती जमती होतात. आता हेच पहा ना एक गाणं गायचं होतं बप्पी लाहीरीला पण ते गाणं गेलं किशोर कुमार (Kishore Kumar)कडे नंतर त्याच चित्रपटातील एक गाणं किशोर कुमारला गायचं होतं पण ते गाणं गायलं बप्पी लाहिरी यांनी! ही गाण्याची अदलाबदल नेमकी झाली कशी आणि का ? खूप धमाल किस्सा आहे. या किस्स्यामधून किशोर कुमारच्या जीवनाचा एक वेगळा पैलू देखील नजरेसमोर येतो. काय होता हा नेमका किस्सा आणि कोणत्या चित्रपटासाठी झाली होती ही गाण्याची अदलाबदल?

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने संपूर्ण जगभरात प्रचंड लोकप्रियता हासिल केली. भारतातील हा पहिला चित्रपट आहे ज्याने १००० कोटी रुपये एका स्ट्रोकमध्ये कमावले होते! या चित्रपटाचे दिग्दर्शक होते बब्बर सुभाष म्हणजेच बी. सुभाष. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि किम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘डिस्को डान्सर’ हा कल्ट क्लासिक चित्रपट त्यातील गाण्यामुळे आजही आठवला जातो. मिथुन चक्रवर्तीला Establish Star बनवणारा हा चित्रपट होता. (‘तकदीर का बादशाह’ या १९८१ साली आलेल्या चित्रपटात पहिल्यांदा मिथुन, बप्पीदा आणि बी सुभाष पहिल्यांदा एकत्र आले होते!)

‘डिस्को डान्सर’ या चित्रपटातील एक गीत होते ‘जरा मुडके मिला आंखे आया हू मै तेरे लिये….’ गीत अंजान यांनी लिहिलं होतं. हे गाणं बप्पी लहरी यांनी त्यांच्या स्वरात रेकॉर्ड केले. परंतु हे गाणं बी सुभाष यांना अजिबात आवडले नाही. त्यांनी अंजान आणि बप्पी यांना बोलावले आणि सांगितले, ”आपल्याला हे गाणे चालणार नाही. यात रिपेअरी वर्क करा.” अंजान यांनी रात्रभर बसून काही बदल केले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ते बी सुभाष यांना दाखवलं. त्यांना आवडले. लगेच बप्पी लहरी यांना देखील बोलावण्यात आलं. बी सुभाष यांनी असे सांगितले की, ”आता मला इथे एक matuared voice पाहिजे. मस्क्युलाईन व्हाईस पाहिजे. मग बप्पी म्हणाले, ”मग आपण हे गाणे किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्या आवाजात रेकॉर्ड करू!” अशा पद्धतीने बप्पी लहरी यांनी आधी गायलेलं गाणे किशोर कुमार यांच्याकडे गेले!
या चित्रपटात आणखी एक गाणं होतं ‘याद आ रहा है तेरा प्यार….’ सिनेमाच्या क्लायमॅक्सला असलेल्या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. हे गाणं बी सुभाष यांना किशोर कुमार यांच्याकडूनच गाऊन घ्यायचं होतं. किशोर कुमारने याच्या रिहर्सल्स देखील केल्या. बप्पीची ट्यून जबरदस्त होती. कफ परेड इथल्या एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गाण्याच्या ध्वनीमुद्रित होणार होते. किशोर कुमार रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओत गेले.

परंतु रेकॉर्डिंग करू शकले नाही! याचे कारण त्या दिवशी रेकॉर्डिंग स्टुडिओची लिफ्ट बंद होती. रेकॉर्डिंग रूम दुसऱ्या मजल्यावर होती आणि त्या काळात किशोर कुमारला हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता आणि डॉक्टरने त्यांना जिने चढायला सक्त मनाई केली होती. त्यामुळे त्यांनी बी सुभाष आणि बप्पी लहरी यांना खाली बोलावले आणि सांगितले, ”आज तर मी काही रेकॉर्डिंग करू शकत नाही.” आणि बप्पी लहरीकडे वळून किशोर म्हणाले, ”भांजे, आज तुम्हारे आवाज मे गाना रेकॉर्ड करना. परसो आके मै डब कर दुंगा!” त्यानुसार बप्पी लहरी यांनी स्वतःच्या आवाजामध्ये हे गाणं रेकॉर्ड केलं.
त्याला माहीतच होतं की हे गाणं उद्या / परवा किशोर कुमार(Kishore Kumar)च्या आवाजात पुन्हा डब करायचे आहे. म्हणून त्यांनी एक स्क्रॅच व्हर्शन बनवले.” ही टेप दिग्दर्शक बी सुभाष यांनी घरी जाताना आपल्या गाडीत ऐकली आणि त्यांना प्रचंड आवडली. बप्पी लहरीचा आवाज त्यांना खूप आवडला आणि हे गाणे बप्पीच्याच आवाजात राहू द्यावे असे त्यांना वाटले. तसे त्यांनी बप्पीलाही सांगितले.

पण बप्पी म्हणाले, ”आपण किशोर कुमार यांचा सल्ला घेऊ.” बी सुभाष यांनी सर्व प्रकार किशोर कुमार यांना सांगितला आणि त्यांच्याकडे ती टेप पाठवली. किशोर कुमारने ते गाणे ऐकले आणि बी सुभाष यांना फोन केला आणि म्हणाला, ”अरे यार मेरे भांजेने तो कमाल कर दिया. अभी ये गाना उसी के आवाज मे रहने दो. मुझे रेकॉर्ड करने की कोई जरूरत नही!” अशा पद्धतीने जे गाणं किशोर कुमार गाणार होते ते गाणे बप्पी लहरी यांच्या कडे गेले.
==========
हे देखील वाचा : “मी दुसरी नर्गीस तयार करेन!” असं दिग्दर्शक मेहबूब का म्हणाले?
==========
खरंतर किशोर कुमार (Kishore Kumar) त्यावेळी पार्श्वगायनातील सुपरस्टार होता. तो म्हटला असता तर ते गाणे पुन्हा एकदा रेकॉर्डिंग करावे लागले असते पण किशोर कुमारने कधीच असला प्रकार केला नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी / फायद्यासाठी त्यांनी कधीही सत्य नजरेआड केले नाही! किशोर कुमारच्या जीवनाचा हा वेगळा पैलू आपल्याला इथे पाहता आला!