दुप्पट मानधन घेऊन किशोरकुमारने केला सिनेमा सुपरहिट
हिंदी सिनेमाच्या गोल्डन इरा मध्ये जेव्हा आपण शिरतो त्यावेळेला आपल्याला अनेक मनोरंजक गोष्टी पाहायला मिळतात ऐकायला मिळतात. खरंतर हिंदी सिनेमामध्ये इतक्या अनपेक्षित अकल्पित आणि अचंबित करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी घडलेल्या असतात की, त्या वाचताना आज देखील आपल्याला मजा येते. त्या घटना रुढार्थाने प्रासंगिक जरी घडल्या असल्या तरी त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला दिसून येतात. हिंदी सिनेमाच्या विनोदी चित्रपटांचा जेव्हा आपण विचार करू लागतो त्यावेळेला एक नाव आपल्याला सर्वात आधी आठवते ते म्हणजे १९६८ साली प्रदर्शित झालेला ‘पडोसन’!
किशोर कुमार (Kishore Kumar) आणि महमूद या दोन विनोदवीरांची यांची जुगलबंदी असलेला हा सिनेमा अनेकांचा ऑल टाइम फेवरेट असा सिनेमा आहे. या सिनेमाच्या मेकिंगच्या वेळची एक गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ‘पडोसन’ या चित्रपटाचे निर्माते होते अभिनेते मेहमूद. हा सिनेमा ज्योती स्वरूप यांनी दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा १९५२ साठी बंगाली मध्ये आलेल्या ‘पाशेर बारी’ या सिनेमाचा ऑफिशियल रीमेक होता. पाशेर बारी हा चित्रपट बंगालमध्ये सुधीर मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. दिग्दर्शक बिमल रॉय यांना हा सिनेमा खूप आवडला होता. त्यांनी लगेच या सिनेमाचे हिंदी रिमेक करण्याचे अधिकार बंगाली निर्मात्याकडून विकत घेतले होते. त्यांना हा सिनेमा हिंदी मध्ये बनवायचा होता.
पण नंतर बिमलदा देवदास, मधुमती, सुजाता, बंदिनी या सिनेमांमध्ये इतके व्यस्त झाले की पाशेर बारी हा सिनेमा ते जवळपास विसरूनच गेले. एक तर त्यांच्या हिंदी सिनेमाचा जॉनर देखील वेगळा झाला होता. नंतर अभिनेता मेहमूद यांनी कधीतरी बंगाली मध्ये हा सिनेमा पाहिला आणि त्यांना हा सिनेमा प्रचंड आवडला आणि हा सिनेमा आपण हिंदीमध्ये बनवावा असे त्यांना वाटले. ते जेव्हा बंगाली सिनेमाच्या निर्मात्याकडे गेले तेंव्हा निर्मात्याने या सिनेमाचे रिमेकचे अधिकार बिमलदा यांच्याकडे असल्याचे सांगितले. मेहमूद ताबडतोब बिमलदा यांच्याकडे रवाना झाले आणि त्यांना या सिनेमाचा रिमेक बाबत विचारले. आणि ,” जर आपण याचा रिमेक बनवणार नसाल तर मला ते राईट्स विकत द्या मी तो सिनेमा बनवतो.” असे सांगितले. बिमल रॉय यांनी पाशेर बारी या सिनेमाचे राइट्स मेहमूद यांना विकून टाकले आणि मग मेहमूद यांनी हा चित्रपट बनवायचे ठरवले. ही घटना १९६४-६५ सालातली. तेव्हा मेहमूद भूत बंगला बनवत होता. (Kishore Kumar)
मुळात पाशेर बारी या सिनेमांमध्ये गुरु जे कॅरेक्टर पडोसन मध्ये किशोर कुमारने रंगवले आहे ते नव्हतेच. परंतु मेहमूद यांनी ते कॅरेक्टर या सिनेमात ॲड केले आणि या सिनेमाचे लेखक पटकथाकार राजेंद्र कृष्ण यांना ते कॅरेक्टर नीट समजावून सांगितले. राजेंद्र कृष्ण यांनी किशोर कुमार चे कॅरेक्टर मस्त लिहिले. त्यानंतर मेहमूद किशोर कुमार यांना भेटले. किशोर कुमार (Kishore Kumar) यांना पडोसन चित्रपटातील भूमिका खूप आवडली परंतु त्यांनी या चित्रपटांसाठी काही अटी ठेवल्या. त्यातली पहिली अट अशी होती की दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘प्यार किया जा’ (१९६६) या सिनेमासाठी मेहमूदने जेवढे मानधन घेतले होते त्याच्या डबल मानधन ते ‘पडोसन’ साठी घेतील. मेहमूद यांना सुरुवातीला काहीच कळाले नाही. ते किशोर कुमार यांना म्हणाले ,”भाईजान आप मजाक कर रहे है क्या?” त्यावर किशोरने (Kishore Kumar) सांगितले,” नाही मी सिरीयस आहे. मला दुप्पट मानधन पाहिजे!” या दुप्पट मानधनाचा किस्सा काय होता? दिग्दर्शक श्रीधर यांनी जेव्हा ‘प्यार किये जा’ हा चित्रपट सुरू केला त्यावेळेला त्यासाठी लीडरोल मध्ये शशी कपूर यांना घेतलं.
साईड रोलसाठी किशोर कुमार (Kishore Kumar) यांना सांगितले आणि यातील कॉमेडी करीता मेहमूद यांना घेतले. पण मेहमूद यांनी या सिनेमासाठी शशी कपूर आणि किशोर कुमार यांच्या पेक्षा जास्त मानधन मागितले. दिग्दर्शक श्रीधर यांना या भूमिकेसाठी मेहमूद च हवा होता परंतु मेहमूद चे मानधनाची मागणी जास्त! त्यामुळे चित्रपट तयार व्हायला उशीर होऊ लागला. परंतु शेवटी मेहमूद ची मागणी त्यांनी मान्यच केली आणि त्यांना चक्क किशोर आणि शशी कपूर यांच्या पेक्षा जास्त मानधन दिले! जेव्हा शशी कपूर आणि किशोर कुमार (Kishore Kumar) यांना ही बातमी कळली त्यावेळेला त्यांना आश्चर्य वाटले आणि थोडासा रागही आला. कारण मेहमूद त्याची पॉप्युलरिटी अशा पद्धतीने इन कॅश करत होता हे त्यांना ते आवडले नाही. पण मेहमूद यांनी डबल मानधन घेतले ही गोष्ट किशोर कुमार यांनी पक्की लक्षात ठेवली होती!
========
हे देखील वाचा : कुणाच्या अंत्यविधीला किशोर कुमारने हे गीत गायले?
=======
काही दिवसानंतर जेव्हा मेहमूद ‘पडोसन’ चित्रपटाची भूमिका किशोर कुमार (Kishore Kumar) यांना ऑफर करू लागला त्यावेळेला त्यांनी बरोब्बर ‘प्यार किये जा’ चे उट्टे काढायचे ठरवले आणि त्यांनी डबल मानधनाची मागणी केली. मेहमूद यांना या भूमिकेसाठी किशोर कुमारच (Kishore Kumar) हवा होता त्यासाठी त्यांनी खास भूमिका लिहून घेतली होती. त्यामुळे त्यांनाही मागणी मान्य करण्या वाचून गत्यंतर नव्हते. किशोर कुमारने डबल मानधन घेतले तरी त्यातील पै न पै महमूद ला वसूल करून दिली. कारण या सिनेमातील प्रत्येक शॉट मध्ये किशोर कुमारने अतिशय अप्रतिम अशी भूमिका करत प्रेक्षकांना मनमुराद हसवले मग या सिनेमातील ‘मेरी प्यारी बिंदू…’ हे गाणं असेल किंवा ‘एक चतुर नार करके सिंगार..’ हे गाणं असेल. पडोसन २९ नोव्हेंबर १९६८ रोजी साठी प्रदर्शित झाला आणि प्रचंड यशस्वी ठरला. लता मंगेशकर यांचा तो अतिशय आवडता सिनेमा होता. तो त्या वेळी तर सुरार हिट झालाच पण सत्तर आणि ऐशी च्या दशकात मॅटीनी शो मध्ये प्रचंड यश प्राप्त केले. अशा प्रकारे किशोर कॉलनी प्यार किये जा च्या वेळी झालेला मेहमूद चा डबल मानधनाचा डाव पडोसन च्या वेळी खेळून यशस्वी करून दाखवला. अर्थात मेहमूद दिलदार होता. पुढच्या त्याच्या प्रत्येक सिनेमात किशोर कुमार ला तो घेवू लागला.