‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
किशोर कुमारने ‘या’ चित्रपटासाठी एकही पैसा न घेता गाणे गायले.
हरफन मौला कलावंत किशोर कुमार यांचा स्मृती दिवस मागच्या १३ ऑक्टोबरला आठवड्यात झाला. त्या निमित्ताने एक भावस्पर्शी आठवण. हिंदी सिनेमाचे सुपरहिट पार्श्वगायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्याबाबत त्या काळात आणि आजही भरपूर अफवा पसरवल्या जात असतात. त्यात एक अशी अफवा होती, आहे ती म्हणजे किशोर कुमार खूप कंजूस होते , खूप मनी माइंडेड होते पैसा घेतल्याशिवाय ते काम करत नसत! ही बाब शंभर टक्के अशीच होती का? यात काही अंशी तथ्य ही असू शकते पण काही घटना अशाही आहेत की, ज्यात किशोर कुमारच्या आपल्या या तथा कथित इमेजच्या अगदी विरुद्ध वर्तन करताना दिसतात. त्याचीच ही आठवण. एका निर्मात्याकडे गाताना किशोर कुमारने एक पैसा देखील मानधन घेतलं नव्हतं. याच गाण्यासाठी नाही तर पुढच्या आणखी काही गाण्यासाठी देखील त्याने एक पैसाही मानधन घेतलं नव्हतं.
तसेच त्या निर्माता दिग्दर्शकाला चित्रपट पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देखील केली होती! किशोर कुमारच्या ह्या चांगुलपणाची फारशी चर्चा कधी झाली नाही. त्यामुळेच मुद्दाम हा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कुणाबाबत किशोर कुमारने ही मदत केली होती? काय होता नेमका किस्सा? सांगतो.
ज्येष्ठ बंगाली चित्रपट दिग्दर्शक ज्यांच्या चित्रपटाने भारतीय सिनेमा खऱ्या अर्थाने जगात पोहोचला त्या सत्यजित रे यांच्या पहिल्याच चित्रपटाच्या वेळी म्हणजेच १९५६ साली प्रदर्शित झालेल्या ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी त्यांना खूप मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. कोणीही फायनान्सर त्यांना मिळत नव्हता. त्यांच्याकडचे पैसे देखील संपत आले होते. ही सोन्यासारखी कलाकृती अर्धवट राहते की काय, अशी त्यांना भीती वाटत होती. सिनेमातील अनेक दिग्गजांना ते भेटले पण कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. अशावेळी त्यांना मदत केली किशोर कुमारने. १९५५ साली किशोर कुमारने सत्यजित रे यांना ५००० रुपयांची मदत करून हा चित्रपट पूर्ण होण्याला सहाय्य केले.‘पाथेर पांचाली’ ही जगविख्यात कलाकृती पूर्ण होण्यासाठी किशोर कुमारच्या त्या पैशांचा मोठा उपयोग झाला. त्यामुळे सत्यजित रे हे कायम किशोर कुमारचे ऋणी राहीले. तसं बघितले तर किशोर कुमार आणि सत्यजित रे यांच्यात एक नातं देखील होतं. (Kishore Kumar)
किशोर कुमारची पहिली पत्नी रुमादेवी हिचे सत्यजित रे मामा होते. किशोर कुमार आणि सत्यजित रे हे परस्परांना १९५१ सालापासून ओळखत होते. सत्यजित रे यांच्या कर्तृत्वाची किशोर कुमार यांना जाणीव होती. त्यातूनच त्यांनी ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटासाठी पाच हजार रुपयाची घसघशीत मदत केली. त्या काळात पाच हजार रुपयेही देखील खूप मोठी रक्कम होती. यानंतर १९६४ साली सत्यजित रे यांनी एक चित्रपट बनवला होता ‘चारुलता’. या चित्रपटाची कथा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘नष्टनिर्थ’ या कथेवर आधारित होती. या सिनेमात एका गाण्यासाठी त्यांना किशोर कुमारचा स्वर हवा होता. त्यासाठी किशोर कुमारला त्यांनी मुंबईला एक पत्र पाठवले आणि आपल्या सिनेमासाठी पार्श्वगायन करावे अशी विनंती केली. त्यासाठी त्यांनी किशोर कुमार (Kishore Kumar) कलकत्त्याला येण्याचे निमंत्रण दिले.
या पत्राला उत्तर देताना किशोर कुमारने ४ नोव्हेंबर १९६३ रोजी सत्यजित रे यांना एक पत्र लिहिले त्या पत्राची सुरुवात त्यांनी ‘डियर माणिक मामा’ अशी केली होती. (माणिक हे सत्यजित रे यांचे निकनेम होते.) या पत्रात किशोर कुमार यांनी सत्यजित रे यांचे आभार मानले आणि “तुमच्या चित्रपटात गायला मला नक्कीच आवडेल असे सांगितले. परंतु सध्या अनेक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे कलकत्त्याला येऊ शकत नाही” असे सांगितले. आणि “तुम्हीच मुंबईला या. आपण इथेच गाण्याची रेकॉर्डिंग करू इथे मी सर्व व्यवस्था करतो.” असे सांगितले. सत्यजित रे यांनी किशोर कुमारच्या विनंतीला मान दिला त्यांनी त्यांच्या पत्नीच्या आवाजात ते गाणे रेकॉर्ड करून किशोर कुमार कडे पाठवले. किशोरने ते गाणे ऐकून रिहर्सल केली आणि सत्यजित रे स्वतः मुंबईला आले. कारण या चित्रपटाला संगीत त्यांचे स्वतःचेच होते. किशोर कुमारने स्वतः रेकॉर्डिंग स्टुडिओ बुक केला. वादक निवडले. आणि या गाण्याची रेकॉर्डिंग मुंबईत सत्यजित रे यांच्या संगीत नियोजनात पार पडले.
===========
हे देखील वाचा : ‘या’ चित्रपटातील या गाण्याचा इंटरेस्टिंग किस्सा
===========
गाण्याचे बोल होते ‘आमी चिनी गो चिनी गो तोमारे…’ यानंतर सत्यजित रे यांनी किशोर कुमारला विचारले ,” या गाण्यासाठी तुझे मानधन किती?” त्यावर किशोर कुमारने (Kishore Kumar) नम्रपणे त्यांना नकार दिला. त्यांना नमस्कार केला. आणि सांगितले,” तुमच्या चित्रपटांमध्ये मला गायला मिळाले हेच माझे मानधन आहे.” चारुलता या चित्रपटातील हे गाणे रवींद्र संगीतावर आधारलेले होते. या गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर सत्यजित रे किशोर कुमारला म्हणाले,”तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रवींद्र संगीत गाऊ शकता.” किशोर कुमार तेव्हा म्हणाले,” माझ्यासाठी आपण दिलेला अभिप्राय खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मला हे लिहून द्या. माझ्यासाठी या गाण्याचे हेच मानधन आहे.” सत्यजित रे यांनी एका कागदावर किशोर कुमारला तसे प्रशस्तीपत्र दिले. किशोर कुमारने ते पत्र आयुष्यभर जपून ठेवले. पुढे १९८४ साली सत्यजित रे यांनी ‘घरेबैरे’ हा चित्रपट निर्माण केला. या चित्रपटातील तीन गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. या तीन गाण्यांसाठी देखील किशोर कुमारने एक पैसा देखील मानधन घेतले नाही. खरंतर किशोर कुमार आणि रूमादेवी यांचा घटस्फोट १९५८ सालीच झाला होता. पण तरीही किशोर कुमार आणि सत्यजित रे यांच्यातील नाते आणि स्नेह अजिबात कमी झाला नाही. सत्यजित रे यांनी कायम किशोर कुमारचे (Kishore Kumar) ऋणी राहिले. जिथे जिथे किशोर कुमारच्या स्वरा बद्दल बोलत ते त्यांच्या स्वराचा गौरवच करीत. तर किशोर कुमार आणि सत्यजित रे यांच्यातील नात्याचा हा एक वेगळा भावस्पर्शी किस्सा त्यांच्या मागच्या आठवड्यात झालेल्या स्मृती दिनाच्या निमित्ताने . खाली मी किशोर कुमारने सत्यजित रे यांच्या चारुलता चित्रपटातील गाण्याची लिंक देत आहे नक्की ऐका.