कुणाच्या अंत्यविधीला किशोर कुमारने हे गीत गायले?
कलावंतांच्या आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेलं असतं. लाईम लाईटमध्ये जगताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू बऱ्याचदा त्यांना मनातल्या मनात आटवून टाकावे लागतात. पण त्याने अंतर्मनातील खळबळ काही कमी होत नाही. अभिनेता, दिग्दर्शक, गायक, संगीतकार, गीतकार असा सबकुछ किशोर कुमार ‘हरफनमौला’ कलाकार होता. भारतीय चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ जेव्हा चालू होता तेव्हा खरंतर सचिनदा यांचा अपवाद सोडला तर कोणत्याही संगीतकाराने त्याला फारसे सिरीयसली कधी घेतलेच नाही. आपल्याकडे एखाद्या कलाकारांना साचेबध्द करून टाकण्याची खूप मोठी फॅशन आहे. खरं तर किशोर कुमार (Kishore Kumar) हा अतिशय चांगला अभिनेता होता. पण त्याच्यावर कॉमेडीचा टॅग लागला गेला आणि आयुष्यभर तो त्याच भूमिकामध्ये पडद्यावर वावरत राहिला. (Kishore Kumar)
किशोर कुमारच्या (Kishore Kumar) आयुष्यात अनेक चढउतार आले, यश अपयश आले. आयुष्यात त्याने चार लग्न केले. पडद्यावरील त्याच्या उटपटांग हरकती आणि त्याच्या स्वभावाने त्याची वेगळीच इमेज सिनेमाच्या जगात निर्माण झाली पण किशोर कुमार हा अतिशय अंतर्मुख होऊन काम करणारा कलाकार होता असं मला कायम वाटतं. कदाचित त्याने विदूषकाचा मुखवटा घालून वावरत होता. किशोर कुमारच्या आयुष्यात आलेला एक भावस्पर्शी प्रसंग मी आज आपल्या सोबत आज शेअर करतो आहे. किशोर कुमार आणि अशोक कुमार या दोघांमध्ये तब्बल १८ वर्षाचे अंतर होते! लहानग्या किशोर कुमारला खांडव्यावरून अशोक कुमार मुंबईला आपल्या घरी घेऊन आला त्यावेळी किशोर कुमारचे वय फक्त आठ वर्षाचे होते. अशोक कुमार यांची पत्नी शोभादेवी किशोर कुमारला (Kishore Kumar) आपला मुलगाच म्हणत होते. त्या दोघांमध्ये देवर भाभीचे नातं असलं तरी किशोर कुमारसाठी ती आईच होती. पुढे अशोक कुमारला चार आपत्य झाले. आरूप कुमार, शोभा, भारती आणि प्रीती. या चौघांसोबतच अशोक कुमार आणि त्यांची पत्नी शोभा हे किशोर कुमारला आपले पाचवे आपत्य समजत होते.
अशोक कुमार रोज संध्याकाळी शूटिंग वरून आल्यानंतर आपल्या पाचही मुलांना घेऊन टेरेसवर जात असत आणि तिथे ज्याला बंगाली भाषेमध्ये ‘गॉलपे’ म्हणतात अशा गमंत गोष्टी सांगत. अशोक कुमार गोष्ट सांगण्यामध्ये खूप प्रवीण होते. ते गोष्ट सांगताना गोष्टीतील प्रत्येक कॅरेक्टर मध्ये घुसत आणि अभिनय करून गोष्ट सांगत. किशोर कुमार हे सर्व खूप आवडीने पाहत असे. नंतर किशोर कुमार देखील अशोक कुमारला जॉईन होऊ लागला मग दोघे मिळून धमाल करत. मग कधी अशोक कुमार सिंह होत असे तर किशोर कुमार छोटा उंदीर व दोघांमधील ते संवाद भरपूर मजा आणत. अशोक कुमारच्या घरामध्ये पियानो होता. अशोक कुमार गात असे आणि किशोर कुमार पियानोवर आपली बोटं फिरवत असे. हा सारा प्रसंग अशोक कुमार यांची पत्नी शोभा देवी बाहेर येऊन कौतुकाने पाहत असे. तिच्याकडे या सर्व मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी असे आणि तिने खूप चांगल्या पद्धतीने ती निभावली होती. रोज रात्री झोपताना या पाचही मुलांना शोभा देवी अंगाई गीत गाऊन झोपवत असे. किशोर कुमार (Kishore Kumar) वर तिचा खूप जीव होता. किशोर कुमार कायम तिच्या जवळ झोपण्याचा हट्ट करत असे.
पुढे किशोर कुमार (Kishore Kumar) चित्रपटात आला आणि मोठा गायक बनला पण देवर भाभी मधील माय लेकराचं नातं कायम होतं. त्या काळी भले अशोक कुमार सुपर स्टार असले तरी त्यांची पत्नी शोभादेवी टिपिकल बॉलीवूड वाईफ नव्हती ती खूपच साधी होती ती खूप introvert होती. कधीच ती पार्ट्याला वगैरे जात नसे. आपलं कुटुंब आणि आपण यातीच आनंदी होती. पण नंतर हळूहळू अशोक कुमार, किशोर कुमार, अनुप कुमार हे तिघे बंधू तिला मुंबईमध्ये फिरवत असत हॉटेलमध्ये घेऊन जात असे. १९८७ मध्ये अशोक कुमार आणि शोभादेवी यांच्या लग्नाला ४९ वर्षे पूर्ण झाली व पन्नासाव्या वर्षात पदार्पण होणार होते. त्यानिमित्ताने सर्व कुटुंबीयांसोबत हॉटेलमध्ये मोठे सेलिब्रेशन करायचे ठरवले त्यानुसार जुहूच्या सिरॉक या हॉटेलमध्ये मोठे फंक्शन ठरले. या पूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी किशोर कुमार आणि अशोक कुमार यांची पत्नी शोभादेवी यांनी उचलली होती. सर्व नातेवाईकांना खांडवा, कोलकाता येथून बोलावण्यात आले होते. एक मोठे सेलिब्रेशन होणार होते.
=======
हे देखील वाचा : ‘दो घडी वो जो पास आ बैठे…’ गाण्याची भावस्पर्शी जन्मकथा…
=======
परंतु या कार्यक्रमाला कुणाची तरी दृष्ट लागली आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या चार दिवस आधीच अशोक कुमारची पत्नी शोभा देवी हिचे १० एप्रिल १९८७ रोजी अचानक पणे देहावसन झाले! सर्वांसाठी हा फार मोठा धक्का होता. किशोर कुमार (Kishore Kumar) तर धाय मोकलून रडत होते. कुणी कुणाला समजवायचे? कारण मागचा महिनाभर किशोर कुमार आपल्या वहिनी सोबत कार्यक्रमाच्या तयारीमध्ये बिझी होता. काय काय प्लॅन केलं होतं. परंतु एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. वहिनीच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली. सर्वत्र शोकाकुल वातावरण होतं. किशोर कुमार तर तिच्या पायाशी डोके ठेवून हमसून हमसून रडत होता. अशोक कुमारने त्याला जवळ घेतले आणि त्याला सांगितले,” तुझ्या वहिनीला तू गायलेले गाणं खूप आवडत होतं. ती कायम ते गाणं गुणगुणत असे. माझी अशी इच्छा आहे की तू हे गाणं तिच्या अखेरच्या प्रवासासाठी गावंस!” किशोर कुमार आणखी जोर जोरात रडू लागला आणि अशोक कुमार म्हणाला,” मुझसे ये नही होगा, मुझे से ये नही होगा…” पण अशोक कुमार म्हणाला ,”तुला आता मन खंबीर करायला पाहिजे. तुझ्या आई समान भाभीला निरोप देताना तिच्या आवडीचं गाणं तुला गायलाच पाहिजे!” किशोर कुमारने देखील आता स्वतःला सावरले. अंत्ययात्रा सुरू झाली आणि किशोर कुमारने धीर गंभीर आवाजात गाणे द्यायला सुरुवात केली. गाणं होतं ‘पिया का घर’ या चित्रपटातील ‘ये जीवन है इस जीवन का यही है यही है रंग रूप….’ गाण्यातील भाव त्या वातावरणात अगदी मिसळून गेले होते.
अत्यंत शोकाकुल स्वरात किशोरचं गाणं संपलं आणि तो पुन्हा एकदा धाय मोकलून रडू लागला. आपल्या वहिनीचे निधन किशोर कुमार (Kishore Kumar) ला खूप दिवस सलत होते आणि त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात १३ ऑक्टोबर १९८७ या दिवशी किशोर कुमारचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या दिवशी अशोक कुमारचा ७६ वा वाढदिवस होता. अशोक कुमारसाठी ते वर्षभर कठीण आणि कसोटी लग्नाच्या पन्नासावा वाढदिवसाच्या चार वाढदिवसाची पत्नीचा वियोग आणि आता स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आवडत्या धाकट्या भावाचे निधन! एखाद्याच्या बाबतीत नियतीसुद्धा किती कठीण खेळ खेळत असते!