
Kishore Kumar : कोणत्या गायिकेने किशोर कुमारला दिला होता अनमोल सल्ला?
ऑल टाइम हिट प्लेबॅक सिंगर किशोर कुमार (Kishore Kumar) १९६९ साली आलेल्या ‘आराधना’ नंतर प्रचंड यशस्वी झाला. त्याच्या लोकप्रियतेची सीमा इतकी जबरदस्त होती की आयुष्यभर त्याचा स्वर न वापरणारे अभिनेते (दिलीप कुमार, राजेंद्र कुमार) आणि संगीतकार (नौशाद) यांना देखील झक्कत त्याचा स्वर आपल्या संगीतात वापरावा लागला. भारतीय सिनेमाच्या संगीताचा जेव्हा गोल्डन इरा जेव्हा चालू होता, तेव्हा खरं तर या किशोर कुमारच्या स्वराकडे कोणाचं फारसं लक्ष नव्हतं. त्यामुळे पन्नास आणि साठच्या दशकात किशोर कुमारच्या स्वरातील तशी संख्याने कमी गाणी आली. कारण या काळात देव आनंदचा अपवाद वगळता कुणी त्याचा प्ले बॅक घेत नव्हते.

किशोर कुमार (Kishore Kumar) ने खरंतर अभिनेता म्हणून करिअर घडवावे यासाठी अशोक कुमारने त्याला या दुनियेत आणले होते. पण किशोरची मुख्य आवड ही गाण्याचीच होती. त्यामुळे सुरुवातीला त्याने अक्षरश: बॉम्बे टोकिजच्या सिनेमात कोरसमध्ये गाऊन आपल्या गायनाचा श्रीगणेशा केला. १९४८ साली ‘शबनम’ या चित्रपटाला संगीतकार सचिन द बर्मन (S. D. Burman) संगीत देत होते. त्यातील एका शमशाद बेगमच्या गाण्यांमध्ये कोरसमध्ये किशोर कुमार गात होते. (Untold stories)
शमशाद बेगमच्या पारखी नजरेला किशोर कुमार (Kishore Kumar) चा स्वर पडला. गाणं संपल्यानंतर तिने किशोर कुमारला बोलावून घेतले आणि त्याला त्याचे नाव विचारले. त्याने सांगितले, ”किशोर कुमार गांगुली”. तोच गाण्याचे संगीतकार सचिन देव बर्मन तिथे आले आणि त्यांनी शमशाद बेगमला सांगितले, ”हा अभिनेता अशोक कुमारचा भाऊ आहे आणि अशोक कुमार त्याला अभिनयाच्या क्षेत्रात करिअर कर असे सांगतो आहे.” तेव्हा शमशाद म्हणाली, ”ते सर्व ठीक आहे. पण बर्मन दादा, तुम्ही याचा आवाज ऐकला का?” बर्मन दा यांनी नाही म्हटल्यावर शमशादने किशोरला एक गाणे गायला सांगितले.

किशोर (Kishore Kumar) घाबरला आणि त्याने एक बंगाली गाणे म्हणून दाखवले. शमशादला त्याचा अर्थ कळाला नाही पण त्या मागच्या भावना लक्षात आल्या. बर्मन दा मात्र किशोरचा स्वर ऐकून निहायत खूश झाले. त्यानंतर शमशाद बेगम किशोरला म्हणाली, ”तू ॲक्टींगमध्ये करिअर नक्की कर. पण गाणं बंद करू नकोस. तुझा आवाज प्ले बॅकसाठी एकदम परफेक्ट आहे!” यानंतर किशोर शमशादच्या आश्वासक शब्दाने आणखी कॉन्फीडंट झाला. पार्श्वगायनात करिअर करण्याचे ठरवले खरे पण या क्षेत्रात ऑलरेडी भरपूर गायक होते. (Entertainment mix masala)
सुरुवातीला खेमचंद प्रकाश (मरने दुआ कौन करे) अनिल विश्वास (जगमग जगमग निकला तारा) सचिन देव प्रमुख यांच्याकडे तो गावू लागला. पण या दशकात त्याने अभिनयाची यात्रा देखील सुरु केली होती. या दशकात हळूहळू त्याच्या स्वराची जादू संगीतकारांना आणि रसिकांना कळू लागली. विशेषतः ‘नौकरी’ सिनेमात सलील चौधरी यांच्याकडे त्याने ‘छोटा सा घर होगा बादलो की छाव में…’ गायले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. १९५६ साली शमशाद बेगम आणि किशोर कुमार यांचे सदाबहार युगलगीत ‘नया अंदाज’ या चित्रपटात ऐकायला मिळाले. गाण्याचे बोल होते ‘मेरे नींदों में तुम मेरे खाबो मे तुम…. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं.
=============
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=============
या गाण्याच रेकॉर्डिंग नंतर शमशाद म्हणाली, ”मी म्हटलं होतं न तू एक उत्तम गायक आहेस. एक दिवस तुझे नाव संपूर्ण देशात अग्रक्रमाने घेतले जाईल. कारण तुझ्या आवाजामधील जी कशीश आहे ती फार कमी पार्श्वगायकांच्या स्वरात असते. त्यामुळे गाणं कंटिन्यू कर. यश तुला नक्की मिळणार आहे!” शमशाद बेगम यांचे शब्द पुढे पंधरा वर्षानंतर खरे ठरले.
‘आराधना’ या चित्रपटानंतर जळी, स्थळी काष्टी पाषाणी किशोर कुमारचा स्वर ऐकू येऊ लागला. शमशाद बेगम आणि किशोर कुमार यांनी वीस अधिक युगल गीते गायली. किशोर कुमारने एकूण ७६ पार्श्वगायिकांसोबत युगलगीत गायली. हा देखील कदाचित विक्रम असावा. शमशादला किशोरच्या स्वराची महती १९४८ सालीच लक्षात आली होती. तिने किशोरला जो सल्ला दिला होता तो त्याने मानला आणि पार्श्वगायनात आपली करिअर करण्याचा निर्णय घेतला.