ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है…’
पन्नासच्या दशकापासून बी आर चोप्रा (B. R. Chopra) यांचे नाव हिंदी सिनेमाच्या अग्रणी निर्माता दिग्दर्शकांमध्ये घेतले जाते. ज्वलंत सामाजिक प्रश्नावर त्यांनी आपली सशक्त चित्रपट निर्मिती केली. या सर्व कालखंडात त्यांच्या सिनेमाच्या आशयाला साजेशी गाणी साहीर यांनी लिहिली होती. ‘नया दौर’ या १९५७ सालच्या चित्रपटापासून साहिर लुधियानवी त्यांच्या चित्रपट निर्मितीतील प्रमुख घटक बनले. चोप्रा यांनी संगीतकार बदलले पण गीतकार मात्र कायम साहिर हेच ठेवले. १९५७ सालच्या ‘नया दौर’ ते १९८० सालच्या ‘द बर्निंग ट्रेन’ पर्यंत हा त्यांचा साहिरसोबतचा हा प्रवास होता. तो थांबला. साहीर गेल्यानंतरच.
२५ ऑक्टोबर १९८० या दिवशी साहीर गेले आणि चोप्रा यांना नव्या गीतकाराचा शोध घ्यावा लागला. १९८२ साली बी आर चोप्रा (B. R. Chopra) यांनी निकाह हा मुस्लिम सामाजिक विषयावरील एक चित्रपट निर्माण केला या चित्रपटातील गाणी लिहिण्याचा जेव्हा प्रसंग आला त्यावेळी त्यांनी ज्या गीतकाराला निवडलं तो गीतकार देखील साहीर यांचाच पट्ट शिष्य होता, हसन कमाल! बऱ्याच जणांना असं वाटतं की हसन कमाल यांचा पहिला चित्रपट ‘निकाह’ हा आहे पण तसं नाही त्यापूर्वी तब्बल पंधरा वर्षे पूर्वी त्यांनी चित्रपटात गाणी लिहायला सुरुवात केली होती.
हसन कमल यांचा जन्म लखनऊ येथे झाला. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ”त्याकाळी लखनऊमध्ये टिपिकल मुस्लिम सांस्कृतिक जीवन जगलं जायचं. लखनऊच्या हवेमध्येच शायरी होती. पुरा माहौल शायराना था. शहरात सर्वत्र गझल, शायरी, उर्दू साहित्य यांचा मोठा बोलबाला होता!” हसन कमल यांना देखील पहिल्यापासून उर्दू साहित्याची मोठी आवड होती. आपण देखील गीतकार व्हावं अशी त्यांची इच्छा होत. त्यांनी साहित्यामध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर पत्रकारितेची पदवी घेतली आणि मुंबईला ‘ब्लिटस’ या नियतकालिकात त्यांनी उपसंपादक म्हणून नोकरी सुरू केली. या ‘ब्लिटस’ची त्या काळातील वाचकांवर प्रचंड मोहिनी होती.
हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या तीन भाषांतून हे ‘ब्लिटस’ प्रसिद्ध होत होते. यात ख्वाजा अहमद अब्बास हे चित्रपट निर्माते/ दिग्दर्शक एक कॉलम लिहीत असंत. त्यांनी १९६७ साली ‘बंबई रात की बाहो मे’ हा एक चित्रपट निर्मिला होता. या चित्रपटातील गाणी हसन कमाल यांना लिहायला सांगितली. हसन कमाल यांचा हा पहिला हिंदी चित्रपट चित्रपट. सिनेमा अजिबात चालला नाही. पुढे हसन कमाल देखील पत्रकारितेमध्ये व्यस्त झाले.
१९७४ साली ते ‘ब्लिटस’ उर्दूचे संपादक झाले. या काळात त्यांचा साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपूरी, कैफी आजमी , बी आर चोप्रा, दिलीप कुमार या सर्वांशी परिचय झाला. साहिरचे ते खास दिवाने होते. साहीर यांनी देखील त्यांना लिखाणातील खूप बारकावे समजावून सांगितले. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस बी आर चोप्रा एक चित्रपट दिग्दर्शित करीत होते ‘चाणक्य’. हा चित्रपट अर्धवटच राहिला. या चित्रपटातील गाणी हसन कमाल लिहिणारा होते. पण चित्रपट डब्यात गेला.
१९८१ साली बी आर चोप्रा (B. R. Chopra) यांचे धाकटे भाऊ यश चोप्रा यांचा ‘सिलसिला’ हा चित्रपट आला आहे. या चित्रपटात हसन कमाल यांनी ‘सर से सरके सरकी चुनरिया’ हे एकमेव गाणे लिहिले. बी आर चोप्रा यांनी हसन कमाल यांचे काम पाहिले होते. त्यांनी ‘निकाह’ या चित्रपटातील गाणी लिहिण्यासाठी त्यांना बोलावले. यांना हा फार मोठा गौरव वाटला पण त्याचवेळी ते खूप नर्व्हस झाले. कारण बी आर चोप्रा आणि साहीर हे समीकरण रसिकांच्या मनात घट्ट बसले होते.
आपल्या गुरुची जागा आपण घेऊ शकत नाही याची त्यांना नम्र जाणीव होती. त्याचवेळी साहिरच्या जागी आपण काम करतो आहोत जबाबदारी देखील होती. अशा या द्विधा मनस्थितीत त्यांनी ‘निकाह’ चित्रपटातली गाणी लिहिली. या चित्रपटात पाकिस्तानी गायिका सलमा आगा हिने हिंदी सिनेमा आणि पार्श्वगायनात पदार्पण केले होते. या चित्रपटातील सर्वच गाणी प्रचंड गाजली. चित्रपट देखील सुपर डुपर हिट ठरला. हसन कमाल यांच्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.
==========
हे देखील वाचा : अभिनेत्री स्मिता पाटील का खुश होती या दिग्दर्शकावर ?
==========
या चित्रपटाला फिल्मफेअरचे तब्बल ११ नामांकने मिळाली. हसन कमाल यांनी लिहिलेले आणि सलमा आगा हिने गायलेल्या ‘दिल के अरमान आंसू ओ मे बह गये ‘ या गाण्याला पारितोषिक मिळाले. यातील सर्वच गाणी ‘फिजा भी है जवा जवा‘, ‘बीते हुये लम्हो कि कसक साथ तो होगी’, ’चेहरा छुपा लिया है किसीने हिजाब मे’, ’दिल कि ये आरजू थी कोई दिलरुबा मिले’ खूप गाजली. हि गाणी सलमा आगा, महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायली होती. संगीत रवि यांचे होते. या चित्रपटात गुलाम अली यांची एक गझल देखील होती पण ती हसन कमाल यांनी लिहिलेली नव्हती. तर ती लिहिली होती मौलाना हसरत यांनी.
हसन कमाल यांची ही कामगिरी प्रचंड लोकप्रिय ठरली आणि तिथून त्यांचा गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. नंतर त्यांनी ‘ब्लिटस’ची नोकरी देखील सोडली आणि पूर्ण वेळ गीतकार म्हणून त्यांनी हिंदी सिनेमा दुनियेत काम सुरू केले. आज की आवाज, मजदूर, बटवारा, इकबाल या चित्रपटातील गाणी त्यांनी लिहिली.आज हसन कमाल हिंदी सिनेमा पासून दूर आहेत. पण रसिकांना मात्र ‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है…’ असेच वाटते!