
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ Movie Review; आता मराठी शाळा ‘Housefull’ होणार…
गेल्या २ वर्षात ३० ते ४० मराठी शाळा बंद पडल्या… जवळपास ३९४ मराठी शाळांमध्ये शिकण्यासाठी विद्यार्थीच नाही आहेत… आणि ८००० शाळांमध्ये तर प्रत्येकी १० पेक्षा कमी विद्यार्थी शिकत आहेत… “मराठी भाषा अभिजात झाली, पण मग मराठी शाळांचं काय? कारखाना आणि छापखाना यात अंतर असतं आणि मराठी शाळा या कारखाना आहेत”… असले आणि यापेक्षा तगडे डायलॉग्स असलेला लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या क्रिएटिव्ह कारखान्यात तयार झालेला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रिलीज झालेला हा सिनेमा मराठी इंडस्ट्रीला एक भन्नाट सुरुवात देणारा ठरला आहे… या चित्रपटातून हेमंत ढोमे आता प्रत्येक मराठी माणसाच्या काळजातला विषय, पण काळजीचा नाही अशा मराठी शाळांच्या वास्तवावर बोलत आहे… पण कंटाळवाण्या लेक्चरसारखं नाही. तर त्या शिक्षकांच्या तासासारखं ज्यांचा तास कधीच संपू नये असं वाटायचं. चला तर जाणून घेऊयात. कसा आहे हा चित्रपट आणि तुम्ही तो थिएटर मध्येच तो का बघावा?

तर चित्रपटाची गोष्ट सुरू होते अलिबागजवळील नगाव गावातील क्रांतिज्योती विद्यालयापासून एक जुनी मराठी माध्यमाची शाळा. पटसंख्या कमी होत चालली आहे, इमारत जुनी झाली आहे आणि जमीन मालक आता तिथे इंटरनॅशनल स्कूल बांधायचं प्लॅनिंग करतोय. मुख्याध्यापक शिरके सर म्हणजे सचिन खेडेकर हे ही शाळा पडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांना बोलवायचं ठरवतात. मग येतात या शाळेचे माजी विद्यार्थी शाळा वाचवण्यासाठी नाही तर, शिरके सरांच्या आदराखातर! मग पुढे काय काय होतं? त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनाच समजावताना शिर्के सरांचा काय गोंधळ उडतो. शाळा वाचवण्याची धडपड आणि ती शाळा वाचते का? हे सारं काही बघण्यासाठी तुम्हाला थिएटर गाठावच लागेल.
================================
हे देखील वाचा : Nana Patekar करणार होते वर्ल्ड रेकॉर्ड पण नेमकं अडलं कुठे?
================================
खरंतर या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच तुम्ही चित्रपटाचा प्लॉट प्रेडिक्ट करू शकता… पण या चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा प्रवास इतका मजेशीर आहे की तुम्ही कुठेच बोर होणार नाहीत. इतके बारीक बारीक विनोद आहेत की ते तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडतात. त्यात या चित्रपटाची ट्रीटमेंट अशी आहे की तुम्ही थेट तुमच्या शाळेत पोहचता. एवढंच काय तुमच्या शाळेबाहेर चिंचा, बोरं विकणाऱ्या काकाची सुद्धा तुम्हाला आठवण येईल. इतका हा चित्रपट तुम्हाला नोस्टेलजियामध्ये घेऊन जातो. शाळेतील फ्लॅशबॅक, मित्रांची केमिस्ट्री, रिलेटेबल विनोद, सगळं इतकं खऱंखुरं वाटतं की आपण स्वतः त्या वर्गामध्ये बसलो आहोत आणि हे मित्र आपलेच वर्गमित्र आहेत असं जाणवतं!

आता वळूयात कास्टिंगकडे.. ही तर या सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद आहे. सचिन खेडेकर सर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत कमाल करतात. त्यांचा तो एक मोनोलॉग, जिथे ते शाळेच्या आणि मराठी भाषेच्या महत्वावर बोलतात तो थेट काळजाला भिडतो. शब्दांची निवड इतकी परफेक्ट की टाळ्या वाजल्याशिवाय राहात नाहीत. मग अमेय वाघ त्याने साकारलेलं आग्री मुलाचं पात्र कधी तुमच्या काळजात घर करेल तुम्हाला ही कळणार नाही. त्याच्यासोबतीला सिद्धार्थ चांदेकरने साकारलेलं मराठी इंडस्ट्रीतल्या अभिनेत्याचं कॅरेक्टर तेवढंच दमदार आहे. आणि या दोघांना तोडीसतोड म्हणजे प्राजक्ता कोळी हिचं कॅरेक्टर. प्राजक्ता कोळीचं काम पाहून तुम्हाला वाटणारच नाही की हा तिचा पहिला मराठी चित्रपट आहे. इतकं उत्तम काम तिने केलं आहे. या तिघांची केमिस्ट्री बघताना तुम्हाला तुमच्या शाळेत तुम्ही किती धमाल केली होतीहे आठवल्यशिवाय राहणार नाही… शिवाय, चेरी ऑन द टॉप म्हणजे क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर यांची पात्रं… या सर्वांनी मनापासून काम केलं आहे. ही पात्रं इतकी रिलेटेबल आहेत की तुम्हाला तुमचे शाळेतले वर्गमित्र आठवतीलच. विशेष म्हणजे क्षिती जोग आणि अनंत जोग या बापलेकींची जुगलबंदीसुद्धा भारी आहे.
या चित्रपटाची टेक्निकल बाजूही कमाल आहे. सिनेमॅटोग्राफी म्हणजे सुंदरच… कोकणचा सुंदर भाग इतका फ्रेश अँड व्हायब्रंट दाखवला आहे की कोणताच शॉट अजिबात रटाळ वाटत नाही. नारळाच्या बागा, समुद्र, शाळेचा वरांडा सगळं सुंदर पद्धतीने चित्रित केलं गेलं आहे. एडिटिंग क्रिस्प इतकी वेगळी आहे की एकाच फ्रेममध्ये कधी तुम्ही वर्तमान आणि भुतकाळही बघता. तसेच, चित्रपटाचा कलर पॅलेट इतका देखणा आहे की स्क्रीनवरून तुमची नजर हटत नाही.

चित्रपटाच्या गाण्यांबद्दल बोलायचं तर, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं ‘स्वर्गात आकाशगंगा’ या गाण्याने धुमाकूळ घातलाच आहे. बाकीची गाणी लिहिली आहेत ईश्वर अंधारे यांनी ज्यांनी महाराष्ट्रात गाजत असलेल्या फॉल्क आख्यानची सुद्धा गाणी लिहिली आहेत आणि फॉल्क आख्यानची गाणी ज्यांनी संगीतबद्ध केली आहेत त्यानीच या चित्रपटालाही संगीत दिलं आहे. ती म्हणजे हर्ष-विजय ही जोडी. यांचं सुद्धा हे मराठी चित्रपटसृष्टीतलं पदार्पण आहे.
================================
हे देखील वाचा : Shah Rukh Khan : डायलॉगमध्ये छोटीशी चूक आणि सेटवर किंग खानने मागितली सगळ्यांची माफी!
================================
बरं, फार नाही पण थोड्यापार नकारात्मक गोष्टीही सिनेमात आहेत पण त्या सिनेमाच्या महत्त्वाच्या विषयासमोर आणि मनोरंजनासमोर इतक्या छोट्या वाटतात की त्याचा एकूण प्लॉटवर परिणाम होत नाही… महत्वाचं म्हणजे मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळा टिकवल्या गेल्या पाहिजेत हा विचार हा चित्रपट एकदम परफेक्ट पद्धतीने मांडतो. त्यासोबतच पोटभाषा हा मुद्दाउसद्धा चित्रपटाने उचलून धरला आहे. हा सिनेमा कुटुंबासोबत बघायला अगदी योग्य आहे. हसता हसता अलगद डोळ्यातून कधी पाणी येईल कधी तुम्हाला तुमच्या शिक्षकांची, शाळेची, शाळेतल्या मित्रांची आठवण येईल… सगळं मिळून एक पैसा वसूल अनुभव. नवीन वर्षाची सुरुवात जबरदस्त करायची असेल तर हा सिनेमा नक्की बघा. मराठी इंडस्ट्रीला अशाच हटके सिनेमांची गरज आहे आणि हेमंत ढोमे पुन्हा सिद्ध करतात की ते प्रेक्षकांना नेमकं काय हवं ते समजतात. एकंदरीत हा चित्रपट नाही तर मराठी शाळा वाचवण्यासाठी सुरू केलेली चळवळ आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ला ‘कलाकृती मीडिया’ देत आहे पाचपैकी साडेचार स्टार्स!
–सुशांत अभंग