‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ते तरुणाईला आपल्या आवाजाने वेड लावणारे के.के
काल रात्री अचानक एक बातमी येऊन थडकली. प्रसिद्ध गायक के.के, म्हणजेच कृष्णकुमार कोन्नत यांचं कोलाकाताच्या एका लाईव्ह कार्यक्रमात, स्टेजवर परफॉर्म करता करता हृदयविकाराच्या झटक्याने निधन. आधीच सिद्धू मूसेवाला प्रकरण गाजत असताना आता दुसऱ्या गायकाचा मृत्यू ऐकला आणि फार हळहळ वाटली. कलाकाराला त्याच्या आयुष्यातली सगळ्यात प्रिय गोष्ट करताना मृत्यू येणं म्हणजे ‘चांगला मृत्यू आला’ असं म्हटलं जातं. पण, मृत्यू कधी चांगला असतो का? तो कधीही, कुठेही आणि कसाही आला तरी वाईटच असतो, असो. (Musical Journey of KK)
माणूस प्रसिद्धीच्या शिखरावर कधी थेट पोहोचत नाही. उंचावर असला की वरुन हात करताना आपल्याला थेट दिसतो इतकंच. पण ही उंची गाठताना माणूस अनेक उतार पचवतो, तसंच के.के. यांचंही आयुष्य अनेक चढ उतरांचं होतं.
के.के. यांचं संपूर्ण नाव कृष्णकुमार कोन्नत. के.के. यांचा जन्म झाला एका मल्याळी कुटुंबात. के.के. यांना लहानपणापासूनच संगीताची प्रचंड आवड आणि संगीताची गोडी लागण्यामागचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांच्या घरातच गाणं होतं. के.के. यांची आई स्वतः गाणारी होती आणि त्यांनी गायनाचं प्राथमिक शिक्षण आपल्या आईकडून घेतलं.
पण आईकडून पुरेसं शिक्षण घेतल्यानंतर मात्र केके यांनी गाण्यातलं उच्च शिक्षण कधी घेतलं नाही. संगीतातलं पुढलं कुठलंही प्रशिक्षण न घेता के.के. आपली संगीताची आवड फक्त नेटाने आणि जिद्दीने जोपासत राहिले. शाळेत गाणी म्हणणं, छोटं छोटे कार्यक्रम करणं किंवा इतर मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणं या सगळ्याची के.के. यांना भयंकर आवड होती. (Musical Journey of KK)
कॉलेजचं शिक्षण पूर्ण करता करता के.के. यांनी एका हॉटेलमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणूनही काम पाहिलं. पण आपलं अंतिम ध्येय गाणंच आहे हे त्यांना कळून चुकलं होतं. पुरेसा संघर्ष करण्याची त्यांची तयारी सुद्धा होती. १९९४ साली त्यांनी आपलं राहतं घर सोडलं आणि गाणं जोपासायला ते मुंबईला आले. सुरुवातीचा, म्हणजे काम मिळेपर्यंतचा काळ अर्थातच खडतर होता. पण त्यांनी कधी हार मानली नाही आणि आपला प्रवास सुरू ठेवला.
पुढे के.के. यांची ओळख झाली, प्रतिथयश आणि हिंदी सिनेसृष्टीतले एक ख्यातनाम गायक हरिहरन यांच्या सोबत. आणि हरिहरन यांच्यामुळेच के.के. यांची सिनेइंडस्ट्रीतल्या बऱ्याच मातब्बर लोकांशी ओळख वाढली. याच दरम्यान के.के. यांना यूटीव्हीतर्फे एका जाहिरातीसाठी जिंगल गाण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सांगीतिक प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. (Musical Journey of KK)
आवाज, आवाजाचा पोत आणि आवाजाची रेंज अतिशय उत्तम असल्याने, के.के. यांचं इंडस्ट्रीत नाव मोठं व्हायला फार वेळ लागला नाही. ते म्हणतात तसं, कलाकाराला एका संधीची गरज असते. ती मिळाली की जो सच्चा असतो तो कलाकार कधीच मागे वळून पाहत नाही. के.के. यांच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं. बरं एक दोन नाही तर के.के. यांनी त्या एका जिंगलनंतर जवळ जवळ दहा ते बारा इतर भाषांमध्ये सुद्धा, सुमारे चार हजार जिंगल्स गायल्या. (Musical Journey of KK)
के.के. यांनी नंतर टीव्हीवर चालणाऱ्या अनेक मालिकांची शीर्षक गीतं सुद्धा गायली. प्रामुख्याने जर नावं घ्यायची झाली तर; जस्ट बूस्ट, शाका लाका बूम बूम अशा त्यावेळी गाजलेल्या मालिकांची शीर्षक गीते, के.के. यांनी गायली.
के.के. यांचं पहिलं गाणं हे प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी माचिस या सिनेमासाठी गाऊन घेतलं होतं. ‘छोड आये हम वो गलीया’ असे या गाण्याचे बोल होते.
१९९९च्या आसपास केके यांचा ‘पल’ नावाचा अल्बम रिलीज झाला आणि मग प्रेक्षकांनीच कृष्णकुमार कोन्नत उर्फ के.के. या गायकाला उचलून धरलं, आणि प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं ते कायमचं. शिवाय त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सोलो अल्बमचा पुरस्कारही के.के. यांना ‘पल’ या अल्बमसाठी मिळाला होता. (Musical Journey of KK)
पुढील काळात प्रीतम या संगीतकारासाठी सुद्धा केलेली त्यांची बरीच गाणी हीट झाली. के.के. यांनी गायलेलं ‘ओम शांती ओम’ या सिनेमातलं ‘आंखो मे तेरी’ हे गाणं तर कधी जुनंच होत नाही. आजही लोकं ते आवडीने गुणगुणताना दिसतात. शिवाय ‘तडप तडप के इस दिल से’ हे गाणं म्हणजे विरह अनुभवणाऱ्या प्रत्येकाच्या काळजातलं गाणं आहे आणि हे गाणं सुद्धा के.के. यांचं देण आहे.
आज के.के आपल्यात नाही. पण त्यांचा आवाज आपल्यात आहे. आपल्या कानात आहे, आपल्या मनात आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर हाच आवाज आपली कायम साथ राहणार आहे हे नक्की.