
“अभिनयला टार्गेट करणाऱ्या लोकांमध्ये आमच्याही क्षेत्रातली लोकं…”; Kshitij Patwardhanची पोस्ट चर्चेत
लेखक-गीतकार अशी ओळख असणाऱ्या क्षितीज पटवर्धन यांनी नुकतीच ‘उत्तर’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनय बेर्डे आणि रेणूका शहाणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सगळीकडेच दिग्दर्शक आणि अभिनेत्याचं कौतुक होत असताना अभिनय लक्ष्मीकांत बेर्डेसाठी क्षितिजनं एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी असं लिहिलं आहे की, “सोशल मिडियावर अभिनय टार्गेट केलं गेलं ज्यात दुर्देवाने आपल्याच क्षेत्रातील काही मंडळी होती”… आणखी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे जाणून घेऊयात…
क्षितिज पटवर्धन यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, “सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत थांबलो होतो… अभिनयला मी कास्ट केलं तेव्हा भुवया खूप उंचावल्या होत्या. सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीसुद्धा काही जणांनी सोशल मीडियावर त्याला टार्गेट केलं (ज्यात आमच्या क्षेत्रातलेसुद्धा लोक होते.) ‘अभिनय’ शब्दावर कोट करून तुला हे जमत नाही, ते जमत नाही वगैरे बडबड केली; पण आम्ही दोघेही शांत राहिलो.” (Kshitij Patwardhan)
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “दहा महिने फक्त निनाद (‘उत्तर’मधील पात्र) कसा असेल, कसा बोलेल, बघेल, वागेल यावर काम केलं, त्यानं कठोर मेहनत घेऊन १२-१३ किलो वजन कमी केलं आणि हाऊसफुल गर्दीतून ‘नन्या सुपर्ब’ अशी दिलखुलास आरोळी आम्ही ऐकली तेव्हा एकमेकांकडे फक्त पाहिलं आणि हसलो. त्याला लोकांचा गराडा पडला. मी बाजूला झालो. अनेक आया त्याच्याशी बोलता बोलता रडायला लागल्या आणि पुढे अर्धा तास मी हे सुखावून टिपत राहिलो. सगळ्या परीक्षणांमध्ये त्याचं भरभरून कौतुक आलंय. दोनच दिवसांत मराठीतले उत्तमोत्तम दिग्दर्शक त्याचं काम बघून खुश झालेत आणि त्याला ‘डिस्कव्हरी’ म्हणतायत आणि प्रेक्षक तर त्याला आपला घरचाच मुलगा मानतात, त्यामुळे त्याच्या यशाने तेही आनंदून गेलेत याची जाणीव पुन्हा एकदा लख्खपणे झाली.”

क्षितिज पुढे लिहितात, “टिपिकल पुणेरी मराठी मुलाचा मोल्ड आम्हाला मोडायचा होता, तरुण पिढीला आपला वाटेल असा नवा इंजिनीयर उभा करायचा होता आणि मराठीत दीर्घ पल्ल्यात काम करू शकेल असा नायक दाखवायचा होता. त्याची ही सुरुवात आहे. हाऊसफुल शोजना जाऊन आल्यानंतर मी म्हटलं, “तुझ्यावर लोकं एवढं प्रेम करतात, याचाही बाकीच्यांना त्रास होत असेल की! आणि तुझ्या बाबांच्या बाबतीतसुद्धा असंच होतं!” त्यावर तो म्हणाला “आपल्या क्षेत्रात एक तर उगवतीचा किंवा मावळतीचा सूर्य बघायला आवडतो सर, दुपारी १२ चा कोणाला नको असतो!” तो सत्तावीसचा आहे; पण सत्तरीच्या अनुभवासारखं बोलला.”
शेवटी पटवर्धन लिहितात, “अभिनयला जे मिळतंय; ते फार कमी लोकांना मिळतं. कारण- कदाचित त्यानं जे पाहिलंय, ते फार कमी लोकांनी पाहिलंय. तेवढी शक्ती, संयम आणि तयारी त्याच्यात आहे, म्हणूनच तू जे काम केलंयस; त्याइतकंच तू जसं हे सगळं हाताळलं आहेस, त्याचा लक्ष्मीकांत सरांना प्रचंड अभिमान वाटत असणार आहे.”
================================
हे देखील वाचा : Marathi Movie Review : प्रत्येक आई आणि तिच्या मुलाने पाहावा असा ‘उत्तर’
================================
हिंदीप्रमाणे मराठीतही कलाकारांची पोरं इंडस्ट्रीत बरीच वर्ष काम करत आहेत. मातब्बर कलाकारांची मुलं असल्यामुळे नक्कीच त्यांना त्यांच्या पालकांच्या स्टारडमची जबाबदारी असणार यात शंकाच नाही. दरम्यान, ‘उत्तर’ चित्रपट महाराष्ट्रात १२ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झाला. GenZ मुलगा आणि सतत काळजीत असणारी आई अशा या माय-लेकाची आजच्या काळतली कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली तरी आईच्या मायेची उब आणि तिची माया इंटरनेटवर मिळत नाही हे चित्रपट प्रेक्षकांना सांगून जातो…. दरम्यान, अभिनय बेर्डे, रेणूका शहाणे, ह्रता दुर्गुळे, निर्मिती सावंत यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi