‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कुमार सानूचे ‘हे’ गाणे तब्बल तीन वर्षानंतर गाजले!
गायक कुमार सानू (Kumar sanu) यांनी गायलेल्या एका गाण्याला तब्बल दोन-अडीच वर्षानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली. तोपर्यंत लोकांनी हे गाणं ऐकलं होतं पण त्या गाण्याला तितकीशी ओळख लाभली नव्हती. त्यानंतर मात्र गेल्या ३५ वर्षांपासून कुमार सानू यांचे ते सिग्नेचर सॉंग बनले आहे. अर्थात हे गाणे ज्या इंग्रजी गाण्यावरून सरळ सरळ कॉपी करून बनवले ते मूळ गाणे जगभर गेली साठ सत्तर वर्षे गाजत आहेच. कुमार सानू यांचे कोणते होते ते गाणे आणि काय होता तो किस्सा?
कुमार सानू १९८३ पासून चित्रपटांसाठी गायला लागले. सुरुवातीला ते बंगाली भाषेत आणि बांगलादेशी चित्रपटांसाठी गात होते. पण ऐंशी दशकाच्या उत्तरार्धात ते मुंबईला आले. गझल सम्राट जगजीत सिंग यांनी त्यांची ओळख संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्याशी करून दिली. त्यांच्यासोबत त्यांनी काही म्युझिकल शो केले. ते प्रामुख्याने किशोर कुमार यांचीच गाणी गात असत. कुमार सानू (Kumar sanu) यांना खरा ब्रेक मिळाला महेश भट यांच्या ‘आशिकी’ या १९९१ साली प्रदर्शित झालेले चित्रपटापासून.
या चित्रपटातील गाण्यांनी इतिहास घडवला. नव्वदच्या दशकातील मेलडीयस म्युझिक सुरू होण्याचे श्रेय ज्या चार-पाच चित्रपटांना जातं त्यापैकी एक ‘आशिकी’ हा चित्रपट होता. पण कुमार सानू (Kumar sanu) यांनी त्यापूर्वी १९८९ साली महेश भट यांच्याच एका चित्रपटात गाणं गायलं होतं. या सिनेमात विनोद खन्ना आणि मीनाक्षी शेषाद्री प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा फारसा चालला नाही आणि त्या मुळेच हे गाणं देखील कुणाच्या लक्षात आलं नाही. पण ‘आशिकी’ प्रदर्शित झाल्यानंतर कुमार सानू यांचे नाव सर्वत्र झाले आणि या गाण्याचं नशीब फळफळलं !
हे गीत इतकं लोकप्रिय झालं की कुमार सानूचे (Kumar sanu) ते सिग्नेचर सॉंग बनले. हे गाणं होतं ‘जब कोई बात बिगड जाये जब कोई मुश्किल पड जाये तुम देना साथ मेरा ओ हमनवा….’ खरंतर हे गाणं एका पाश्चात्य लोकप्रिय गाण्यावरून त्याची चाल घेतली आहे. मूळ गाणे साठच्या दशकात जगभर प्रचंड गाजले होते. “500 Miles Away from Home” हे गीत जगातल्या लोकप्रिय top 100 songs मधील आहे. ‘जुर्म’ चित्रपटाला संगीत राजेश रोशन यांनी दिले होते तर गीत इंदीवर यांनी लिहिले होते!
हे गाणं कुमार सानू यांना कसं मिळालं याची देखील एक स्टोरी आहे. सुरुवातीला स्ट्रगल पिरेडमध्ये एकदा कुमार सानू यांनी स्वत:च्या आवाजात गायलेल्या गाण्यांची एक कॅसेट त्यांनी राजेश रोशन यांना दिली. यातील बहुतेक सर्व गाणी किशोर कुमारची होती. कुमार सानू (Kumar sanu) पहिल्यापासूनच किशोर कुमारचे जबरदस्त चाहते होते. राजेश रोशन यांनी जेव्हा ती कॅसेट ऐकली त्यात पहिले गाणं ‘काश’ या चित्रपटातील होते त्यांना विश्वासच बसला नाही की हे गाणे कुमार सानूने गायले आहे त्यांना वाटले हे गाणे किशोर कुमारचेच आहे. कुमार सानू आपल्याला तसेच ऐकवत आहे!
पण नंतरची गाणी ऐकल्यानंतर लक्षात आलं की कुमार सानूचाच (Kumar sanu) तो आवाज होता. त्यांनी कुमार सोनूला बोलून घेतले आणि त्याचा फोन नंबर द्यायला सांगितले. कुमार सानू म्हणाला “फोन नंबर तर नाहीये माझ्याकडे. माझा पत्ता देऊ का?” राजेश रोशन म्हणाले, ”ठीक आहे. आवश्यकता असेल मी तेव्हा तुला टेलिग्राम करेल.” लवकरच राजेश रोशन यांच्याकडून एक टेलिग्राम कुमार सानू यांना गेला आणि त्यांनी त्याला बोलावून त्याच्याकडून ‘जब कोई बात बिगड जाये….’ हे गाणं गाऊन घेतले. कुमार सानूला वाटलं की आता आपले दिवस सुरू होतील कारण त्यांनी हे गाणं बऱ्यापैकी किशोर कुमारला फॉलो करत गायले होते.
गाणं खरोखरच खूप सुंदर झालं होतं पण पिक्चरच पडल्यामुळे गाणं कुणाच्याच लक्षात आलं नाही. अर्थात हिऱ्याचं तेज फार काळ लपून राहू शकत नाही. पुढे दोन वर्षातच ‘आशिकी’ या चित्रपटातील गाणी त्यांनी गायली. आशिकी सुपरहिट झाला. कुमार सानू (Kumar sanu) देशभर लोकप्रिय झाला. लोक त्याची आधीची गाणी शोधू लागले आणि त्यांना गाणं सापडलं. ‘जुर्म’ या १९९० सालच्या चित्रपटातील ‘जब कोई बात बिगड जाये..!’ त्यानंतर कुमार सानू सांगतात, ”मी जगभरात जितक्या म्युझिक कॉन्सर्टला गेलो तिथे प्रत्येक ठिकाणी मला लोकांनी हे गाणं गायला सांगितलं! आणि प्रत्येकाने सांगितलं ‘या गाण्याने आम्हाला आयुष्यामध्ये ‘सुकून’ दिला,’शांतता’ दिली, ‘समाधान’ दिलं, मनाला ‘उभारी‘ दिली!’
=========
हे देखील वाचा : ‘यु आर सीनियर दॅन मी’ असे अमिताभ बच्चन सचिन यांना म्हणाले !
=========
कुमार सानू (Kumar sanu) त्या काळात प्रचंड बिझी आर्टिस्ट होता. एका महिन्यात त्याने १६१ गाणी रेकॉर्ड केली होती. हा त्याचा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला गेला होता. एका वर्षात त्यांनी अकराशे गाणे रेकॉर्ड केले होते. कुमार सानू यांनी एका इंटरव्यूला सांगितले त्या काळात फंक्शनमध्ये माझीच गाणी एकमेकांसोबत स्पर्धा करत असे. सलग पाच वर्ष बेस्ट मेल फिल्म अवॉर्ड कुमार सानू यांनी १९९१ ते १९९५ या काळात जिंकले होते!