
Kurla To Vengurla Marathi Movie: लग्न व्यवस्थेतील गुंतागुंतीचा वेध घेणारी हलकीफुलकी गोष्ट आता मोठ्या पडद्यावर !
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान, शिक्षण, आर्थिक स्थिती आणि दळणवळणात मोठे बदल झाले आहेत. याचबरोबर नव्या पिढीच्या विचारसरणी, जीवनशैली आणि त्यांच्या आशा आकांक्षा मध्ये लक्षणीय फरक पाहायला मिळतो. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण पिढी आता शिक्षण, करिअर आणि लग्नाच्या बाबतीत अधिक सजग आणि जागरूक झाली आहे. या बदललेल्या मानसिकतेचा आणि लग्न व्यवस्थेतील गुंतागुंतीचा वेध घेणारा एक हलकाफुलका आणि रंजक चित्रपट “कुर्ला टू वेंगुर्ला” प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.(Kurla To Vengurla Marathi Movie)

१९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स या बॅनर्स अंतर्गत तयार झाला असून अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे आणि एम. व्ही. शरतचंद्र या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाच्या कथानकाची मांडणी, पटकथा आणि संवाद अमरजित आमले यांनी लिहिले असून, दिग्दर्शनाची जबाबदारी विजय कलमकर यांनी पार पाडली आहे. ‘कुर्ला टू वेंगुर्ला’मध्ये प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर आणि वैभव मांगले प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबतच सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत यांच्यासारखी मातब्बर स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळेल.

छायांकन रंगनाथ बाबू गोगीनेनी यांचे असून, संकलन स्वतः दिग्दर्शक विजय कलमकर यांनी केले आहे. ध्वनिआरेखन अविनाश सोनावणे यांनी तर गीतलेखन चंचल काळे आणि अमरजित आमले यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन व पार्श्वसंगीताची जबाबदारी अक्षय खोत यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे वितरण पिकल इंटरटेनमेंट करणार आहे. या चित्रपटात गावातील तरुणांच्या लग्नाच्या अडचणी, शहर आणि गावातील मानसिकतेतील तफावत, तरुणाईच्या अपेक्षा, पालकांची विचारधारा यासारखे मुद्दे अत्यंत हलक्या फुलक्या आणि विनोदी पद्धतीने मांडले आहेत. मालवणी भाषेची चव, नात्यांची गुंफण आणि ग्रामीण जीवनाचं वास्तव यातून उभं राहतं एक भन्नाट मनोरंजन!(Kurla To Vengurla Marathi Movie)
============================
============================
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ ही कथा केवळ एका लग्नाची नसून, ती आहे आजच्या काळातील प्रत्येक घरातील संघर्षाची.बदलत्या सामाजिक वास्तवाचा आरसा दाखवत हा चित्रपट प्रेक्षकांना हसवत, भावनिक करतो आणि विचार करायला भाग पाडतो. चित्रपटाचं नाव ऐकल्यावरच उत्सुकता निर्माण होते, आणि त्यामागे लपलेली गोष्ट प्रेक्षकांना एका मजेदार प्रवासावर घेऊन जाणार आहे. १९ सप्टेंबरपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे, आणि ग्रामीण,शहरी अनुभवांची ही कहाणी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक उत्सुक असतील.