Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च !
मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर येत असतात. आता एक वेगळा आणि हटके विषय घेऊन “कुर्ला टू वेंगुर्ला” हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.नुकताच या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विजय कलमकर दिग्दर्शित हा सिनेमा हलक्या-फुलक्या विनोदी अंदाजात ग्रामीण भागातील गंभीर सामाजिक वास्तव मांडतो.(Kurla To Vengurla Trailer)

या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे गावातील तरुणांच्या रखडणाऱ्या लग्नांचा प्रश्न. आजच्या काळात शहर आणि गाव यांच्यात एक अदृश्य दरी निर्माण झाली आहे. गावातील मुलींना करिअर, जीवनशैली आणि संधींसाठी शहराचे आकर्षण असते, तर गावातले मुलं परंपरा आणि वास्तवाशी जुळवून घेत असतात. परिणामी ग्रामीण भागात अनेक तरुणांची लग्नं होणं कठीण होतं. ही समस्या केवळ सामाजिक नाही तर कुटुंब आणि नातेसंबंधांवरही परिणाम करणारी आहे. याच विषयाला “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटात विनोदाचा तडका आणि मालवणी बोलीचा गोडवा देत मांडण्यात आलं आहे. त्यामुळे हा सिनेमा गंभीर विषयावर भाष्य करताना प्रेक्षकांना मनमुराद हसवणार आहे. चित्रपटाची निर्मिती सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि एम. व्ही. शरतचंद्र यांनी केली आहे. अमरजीत आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे आणि एम. व्ही. शरतचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. कथा, पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी अमरजीत आमले यांनी पार पाडली असून दिग्दर्शन विजय कलमकर यांचे आहे.

“कुर्ला टू वेंगुर्ला” मध्ये मराठीतील दिग्गज कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वीणा जामकर, वैभव मांगले, स्वानंदी टिकेकर, प्रल्हाद कुडतरकर, सुनील तावडे, साईंकित कामत हे अनुभवी कलाकार आपल्या अभिनयाने हसू आणि भावनिकता दोन्ही आणतील. त्यांच्यासोबत अमेय परब, शेखर बेटकर आणि अनघा राणे हे नवोदित कलाकार या चित्रपटातून आपलं वेगळं स्थान निर्माण करताना दिसतील. तांत्रिक बाबतीतही या चित्रपटाला दमदार साथ लाभली आहे. छायांकन रंगनाथ बाबू गोगीनेनी यांचं, संकलन विजय कलमकर यांचं तर ध्वनिआरेखन अविनाश सोनावणे यांचं आहे. गीतलेखन चंचल काळे आणि अमरजीत आमले यांनी केलं असून संगीत दिग्दर्शन अक्षय खोत यांनी केलं आहे. चित्रपटाचं पार्श्वसंगीतही कथानकाला उठाव देणारं आहे.(Kurla To Vengurla Trailer)
=============================
=============================
“माती आणि नाती जोडणारा, प्रत्येक कुटुंबाची कहाणी सांगणारा” असा हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वास दिग्दर्शक व निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. १९ सप्टेंबरपासून “कुर्ला टू वेंगुर्ला” हा कुटुंबवत्सल आणि मनोरंजनाने भरलेला सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.