कुठे धुणीभांडी तर कुठे जोर बैठका
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या विविध स्तरावर काळजी घेण्यात येत आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणं बंद केली गेली आहेत. याशिवाय सिनेमा, मालिकांचे शूटिंगही ३१ मार्च पर्यंत थांबवण्यात आले आहे. याचमुळे सगळे अभिनेते – अभिनेत्री घरातच बसून या वेळेचा सदुपयोग करताना दिसताय. कुणी वाचन करतंय, कुणी घरच्यांसोबत वेळ घालवतंय तर कुणीच घरातच छोटेखानी जिम थाटली आहे. जाणून घेऊया अशाच काही कलाकारांबद्दल जे मिळालेल्या या क्वारंटाईन वेळेचा छान पद्धतीने वापर करून घेत आहेत…
बॉलिवूडमध्ये काम करायचं, टिकून राहायचं म्हणजे तुम्ही जितके हँडसम दिसणं अपेक्षित आहे, तितकंच सुधृड राहणंही अपेक्षित असतं. हीच गोष्ट लक्षात घेऊन बॉलिवूडचा सुपरस्टार विकी कौशल स्वतःवर भारी मेहनत घेताना दिसतोय. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहे. यात जिम्सचाही सहभाग आहे. पण जिम बंद म्हणून व्यायाम बंद असं न करता, विकीने स्वतःच्या घरात विविध वस्तूंचा वापर करून जिमची निर्मिती केली आहे. रोज न चुकता दंड, बैठका यांसह इतर व्यायाम प्रकार तो करताना दिसतो. इतकंच नाही तर आपल्या सोशल मीडिया वॉलवरून विकी त्याच्या चाहत्यांना त्याच्या या वर्कआउट विषयीची माहितीही देताना दिसतो आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन त्याच्या चाहत्यांनीही ते फॉलो करावं अशी विकीची इच्छा आहे. पुढचे काही दिवस तरी विकी त्याचं हे शेड्युल फॉलो करणार असल्याचं समजतं.
– विकी कौशल
राजमा चावलं अन् बरच काही
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या अनेक वेगवेगळ्या कामांमध्ये बिझी आहे. टीव्ही आणि सिनेमा अशा दोन्ही माध्यमांमध्ये व्यग्र असलेली सोनाली सध्या मात्र आणखी एकाठिकाणी बिझी असल्याचं समजतं. आता हे जाणून तुम्ही थक्क व्हाल की पडद्यावर जादू करणारी सोनाली सध्या बिझी आहे ती तिच्या स्वयंपाक घरामध्ये. ऐकून नवल वाटलं ना? त्याचं झालं असंय की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी सोनाली स्वतः घरीच आहे. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा म्हणून ती वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकते आहे म्हणे. या आशयाची एक पोस्ट तिने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोनालीची आई उत्तम जेवण बनवते. त्याचं सोनालीला कौतुक होतं, पण तिने स्वतः मात्र कधी या वाटेल जाणं पसंत केलं नव्हतं. आता मिळालेल्या वेळेचा उपयोग करून सोनाली तिच्या आईकडून हे खास पदार्थ शिकून घेते आहे. अगदी साध्या वरण भातापासून बटाट्याची भाजी, राजमा- चावलं, पोहे, पालकपनीर, मटारपनीर असे वेगवेगळे पदार्थ ती बनवून तिच्या कुटुंबियांना खाऊ घालते आहे.
– सोनाली कुलकर्णी
कतरीना बनली कामवाली
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आपण तर बाहेर पडू शकत नाहीच, शिवाय बाहेरची कुणी व्यक्तीही आपल्याकडे येऊ शकत नाही. यात सगळ्यात मोठी पंचाईत आहे ती आपल्याला घरकामात मदत करणाऱ्या बायका कामावर न येऊ न शकण्याची. याचाच परिणाम म्हणून बॉलिवूडची शीला अर्थात कतरीना कैफ ही स्वतः कामवाली बाई मोडमध्ये गेली आहे. आपल्याला घरातल्या प्रत्येक कामात मदत करणाऱ्या मावशींनाही स्वतःचं कुटुंब आहे, त्याची काळजी आहे आणि म्हणूनच माझ्या घरी येणाऱ्या मावशींना मी सुट्टी दिली आहे. आणि मी स्वतःच घरकाम करायला सज्ज आहे असं कतरीनाचं म्हणणं आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर घरातली भांडी घासतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कतरीनाचं हे स्पिरिट बघून तिच्या चाहत्यांची घरकामात सक्रिय सहभाग घेतील यात शंका नाही.
– कतरीना कैफ
माझा वेळ कुटुंबासाठी
बॉलिवूडचे अभिनेते-अभिनेत्री किती बिझी असतात हे आपल्याला नव्याने सांगायला नको. त्यात आपली सगळ्यांची लाडकी धक धक गर्ल माधुरी दीक्षित हीसुद्धा बिझी अभिनेत्रींनमधली एक आहे. हिंदी सिनेमांसोबतच रिऍलिटी शोमध्ये सुद्धा तिचा सहभाग बघायला मिळतो. या सगळ्यात आपल्या कुटुंबाला वेळ देणं मात्र तिच्यासाठी अवघड होऊन बसतं. साध्या मिळत असलेला वेळ मात्र माधुरीने पूर्णपणे तिने तिच्या कुटुंबाला द्यायचं ठरवलं आहे. दोन मुलं आणि नवरा असा माधुरीचा परिवार आहे. धकाधकीच्या जीवनात त्यांना फार वेळ देणं जमत नसल्याने आताच माझा वेळ हा मात्र पूर्ण त्यांचा असेल असं माधुरी सांगते. तुम्हीही हा वेळ तुमच्या कुटुंबियांना द्या, त्यांच्याशी बोला, त्यांना नव्याने जाणून घ्या असं आवाहनही माधुरी तिच्या चाहत्यांना करते.
– माधुरी दीक्षित
फोटो सौजन्य- कलाकारांच्या सोशल मिडिया प्रोफाईल
– भूषण पत्की Twitter @bhushanpatki