Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

Laal Singh Chaddha Movie Review: भूतकाळाच्या ‘गोष्टी’ची पाने अलगद उलडून सांगणारा
कोणत्याही चित्रपटाच्या अडॉप्टेशनमध्ये सर्वात मोठी समस्या असते; ती म्हणजे त्या रिमेक चित्रपटाची मूळ चित्रपटाशी तुलना केली जाते. आजच्या ओटीटीच्या जमान्यात तर असे कित्तेक प्रेक्षक किंवा सिनेप्रेमी असतील ज्यांनी ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. म्हणून अगोदर ‘फॉरेस्ट गंप’ चित्रपट पाहिला असेल. का? तर या दोन सिनेमांची तुलना करण्यासाठी. आणि ते करण्यातही काही गैर नाही. कारण, तुलना केल्या शिवाय कोण सरस, याचं उत्तर प्रेक्षकांना कसं मिळणार? (Laal Singh Chaddha Movie Review)
जेव्हा सिनेमा सहा ऑस्कर ॲकेडमी पुरस्कार जिकंतो तेव्हा तो सिनेमा निश्चितच सूक्ष्मपणे पाहिला गेला असणार. अशा सिनेमाचा रिमेक करणं हेच मुळात धाडसाचे काम आहे. जे लेखक अतुल कुलकर्णी यांनी करुन दाखवले आहे. स्वतंत्रपणे लेखक ही पदवी कुलकर्णी यांना पहिल्यांदाच मिळाली आहे. एक कुशल नट म्हणूनच आजवर अतुल कुलकर्णी प्रेक्षकांना परिचित आहे. पण, आता त्यांच्या या धाडसामुळे त्यांच्या नावा पुढे ‘लेखक’ असं ठळकपणे यापुढे लिहिले जाईल. जो सिनेमा मुळात अमेरिकेत घडलेल्या घटनांच्या अवतीभवती लिहिला गेला होता. तो सिनेमा भारतीय अवकाशात लिहिताना कुलकर्णी यांनी दाखवलेली लेखनातील कल्पकता नक्कीच कौतुकास्पद आहे.
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘टॉम हँक’ अभिनित ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाची अधिकृत भारतीय आवृत्ती म्हणजे ‘लाल सिंह चड्ढा’. मूळ अमेरिकी सिनेमांचे भारतीयकरण करताना लेखनाच्या पातळीवर पटकथाकाराने पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने हा चित्रपट भारतीय सामाजिक-राजकीय वातावरणात भारतीय पात्रांसह संपूर्ण संवेदनशीलतेने मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे यात शंका नाही. पण, सिनेमा दिग्दर्शकीय पातळीवर काहीसा कमकुवत ठरतो. परिणामी चित्रपटाला त्याची अपेक्षित प्रभावी उंची गाठण्यात अडथळा निर्माण होतो.

चित्रपटाची कथा शतकाच्या आठव्या दशकापासून सुरू होते आणि आजपर्यंत येऊन थांबते. साधारण १९८३ पासून ते २०१८ पर्यंत. कथेतील मुख्य पात्र लाल सिंह चड्ढा (आमिर खान) याला ट्रेनने कुठेतरी पोहोचायचे असते. कुठे? का? कोणाला भेटायला? याचं उत्तर तुम्हाला प्रवासा दरम्यान मिळेल. पण, ही सिनेमांची गोष्ट नाहीय. सिनेमांची गोष्ट वेगळीची आहे. लाल सिंह प्रवासादरम्यान जी ‘गोष्ट’ आपल्या सहप्रवाश्याना सांगतो. ती या सिनेमाची ‘मूळ गोष्ट’ आहे. “भूतकाळाच्या ‘गोष्टी’ची चाळता पाने..” या एका धाग्याचा आधार घेत हा सिनेमा आपल्यासमोर उल’घडत’ जातो. सिनेमा पूर्वार्धात आपल्याला स्वतःशी गच्च धरुन ठेवतो. पण, उत्तरार्धात तो रटाळ होतो. ताणलेले प्रसंग आणि सिनेमाचा वेग; प्रेक्षकांना विचलित करणारा आहे. (Laal Singh Chaddha Movie Review)
लाल सिंह आपल्या ट्रेनच्या प्रवासात त्याच्यासोबत असलेल्या सहप्रवाशांना आपल्या जीवनाची कहाणी सांगतो. देशाच्या अनेक कालखंडातून या गोष्टीचा प्रवाह सुरु आहे. वास्तविक कथेचा मूळ आधार प्रेम, निस्वार्थी भाव, कोणत्याही अपेक्षेपलीकडचे प्रेम, यश-अपयश, आकांशा असा आहे. लालसिंह, ज्याला समाज हिणवत असतो परंतु, त्याच्या आईच्या (मोना सिंग) नजरेत तो सर्वात खास आहे. तीच त्याला स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास देत असते. सोबतच लालच्या आयुष्यात येणारी त्याची मैत्रीण रुपा (करीना कपूर खान) ही त्याच्यासाठी सर्वस्व असते. वरकरणी तुम्ही लाल सिहला दिव्यांग म्हणू शकता, पण त्याच्यात स्वतःचे असे वेगळे गुण आहेत. हेच गुण त्याला त्याच्या जीवनप्रवासात इतरांपासून वेगळं आणि पुढे ठेवतात. तो ज्या क्षेत्रात कार्यरत होतो; त्यात त्याला यश मिळत असते. ‘लक फॅक्टर’ असं याला म्हणता येणार नाही. कारण, तो त्या क्षेत्रात अनावधानाने जीवापाड मेहनत करत असतो. फळाची अपेक्षा न करता; तो कृती करण्याकडे अधिक भर देत असतो.
साधारण १९८३ च्या वर्ल्डकप विजयापासून ते अमृतसरमधील गोल्डन टेंपलची घटना, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निधन, लालकृष्ण अडवाणी यांची अयोध्या रॅली, बाबरी मशिद, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, बॉम्बब्लास्ट, कारगिलमधील दहशदवाद्यांच्या घुसखोरी, मुंबईमधील २६/११ हल्ला, रामलीला मैदानावरील उपोषण, ‘अपकी बार मोदी सरकार’ पर्यंत महत्वपूर्ण घटनांची पार्श्वभूमी लाल सिंहच्या कहाणीला आहे. उपरोक्त काही घटना लेखक-दिग्दर्शकाने ठळकपणे दाखवल्या आहेत, तर काही घटनांचा ओघवता उल्लेख कथानकात करण्यात आला आहे. पण, आमिर खान, सिनेमाचे लेखक अतुल कुलकर्णी आणि दिग्दर्शक अद्वैत चंदन यांचे कौतुक करावे लागेल की, त्यांनी या सर्व मुद्द्यांवर सिनेमात ‘आपले’ मत लादलेलं नाही. निखळतेने यासर्व मुद्द्यांचे दर्शन सिनेमा आपल्याला घडवतो. त्यावर अवाचवि भाष्य करण्यास सिनेमा टाळतो.

हीच कथेतील निरागसता लालच्या व्यक्तिरेखेत देखील दिसून येते. देशात खूप काही घडत आहे, पण लालची निरागसता कायम आहे. जेव्हा आई लालला सांगते की, “देशात मलेरिया पसरला आहे आणि आठवडाभर खोली सोडत जाऊ नको, तेव्हा लालही त्याच चिकाटीने खोलीत स्वतःला डांबून ठेवतो. हीच निरागसता सिनेमातील एका युद्धाच्या दृश्यात देखील दिसते. जेव्हा आपल्या साथीदारांचे तसेच शत्रूचे प्राण वाचवण्यासाठी लाल सिंह हवाई गोळीबारी सुरु असलेल्या युद्धभूमीवर धावत सुटतो. (Laal Singh Chaddha Movie Review)
बहुतांश पातळीवर लाल सिंह ही भूमिका आमिरनं चोख निभावली आहे. पण, काही ठिकाणी त्याचं बेरिंग सुटलेले जाणवते. त्याच्या अभिनयात ‘पिके’ आणि ‘धूम ३’चा आमिर देखील दिसू लागतो. सिनेमातील करीना कपूरची ‘रुपा’ ही भावस्पर्शी झाली आहे. सोबतच अभिनेत्री मोना सिंग हिनं देखील उत्तमरित्या आपली भूमिका निभावली आहे. बालाच्या भूमिकेत असलेला नागा चैतन्य देखील आपल्या स्मरणात रहातो. पण, त्याच्या ‘स्क्रीन टाईम’ अधिक असायला हवा होता; असंही उत्तरार्धारीत वाटू लागते.
दिग्दर्शक अद्वैत चंदन हा चित्रपट संवेदनशीलतेने हाताळला. पण, चित्रपटाची लांबी हा चित्रपटाचा मायनस पॉइंट आहे. धाडसी दिग्दर्शकीय निर्णय घेण्यात कदाचित दिग्दर्शकाचे हात तोकडे पडले असतील. चित्रपटाची तांत्रिक बाजू आणि सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट झाली आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम तुम्हाला कथेच्या जवळ घेऊन जाते, मग ती लडाख, कन्याकुमारी, दिल्लीची असो किंवा शेतामधील लॉन्ग शॉट. सर्व काही नेत्रदीपक आहे.

व्हीएफएक्सच्या माध्यमातून भारतातील ऐतिहासिक, राजकीय आणि धार्मिक घटनांचा या चित्रपटात समावेश करण्यात आला आहे. ऑपरेशन ब्लू स्टार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या, बाबरी मशीद विध्वंस आदी सत्य घटनांनी सिनेमा अधिक प्रभावशाली होतो. पण, त्याकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहा! अशी चेतावणी सिनेमा सुरुवातीलाच आपल्याला देतो. त्यामुळे हा सर्व भूतकाळ केवळ भूतकाळ म्हणूनच सिनेमाचा भाग आहे. (Laal Singh Chaddha Movie Review)
कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची भक्कम बाजू आहे. पण, त्याची तुलना टॉम हँक्सशी होणार हे आमिरला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे त्याने त्याच्या व्यक्तिरेखेला सजवण्यासाठी खूप मेहनत घेतली, तरीही त्याची ‘धूम ३’मधील लकब त्याने इकडेही कायम ठेवली आहे. सोबतच त्याच्या अभिनयात काही ठिकाणी ‘पीके’ची छाप दिसते. परिणामी ही गोष्ट प्रेक्षकांसाठी निराशाजनक आहे.
==========
हे देखील वाचा – De Dhakka 2 Movie Review: निखळ हास्याचे २ तास
==========
जाता जाता.. एक खास गोष्ट सांगतो.. सिनेमात दस्तुरखुद्द अठरा वर्षांचा शाहरुख खान आहे. तो कसा? का? हे जाणून घेण्यासाठी आणि त्याचसोबत निरागसतेचा नवी व्याख्या समजून घेण्यासाठी तुम्ही हा ‘लाल सिंह चड्ढा’ नक्कीच पाहायला हवा. (Laal Singh Chaddha Movie Review)
सिनेमा : लाल सिंह चड्ढा
निर्मिती : आमिर खान, किरण राव
दिग्दर्शक : अद्वैत चंदन
लेखन : अतुल कुलकर्णी
कलाकार : आमिर खान, करीना कपूर, नागा चैतन्य
छायांकन : सत्यजित पांडे
दर्जा : तीन स्टार