नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर- महाराष्ट्राची नाट्यसंपदा!
नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर (Prabhakar Panshikar) यांचा आज जन्मदिन. कलाकार आणि निर्माता म्हणून त्यांनी रंगभूमीला दिलेलं देणं मोठं आहे. त्याचबरोबर त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची जागतिक रंगभूमीने घेतलेली दखल तितकीच महत्त्वाची आहे. ‘पंत’या संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या आज या नटश्रेष्ठाच्या आठवणींना उजाळा देऊया.
मुलगा नाटकात गेला म्हणजे वाया गेला मानण्याच्या काळात प्रभाकर पणशीकर यांचा जन्म एका विद्वत्ता संपन्न घरात झाला. त्यांचे वडील गिरगावातील काळाराम मंदिरात पुजारी होते. ते उत्तम कीर्तनकार होते.त्यांच्या गायन, पाठांतराचे संस्कार पंतांवर झाले. १९४५ साली पाचवी इयत्तेत असताना पंतांच्या शाळेत नाटक बसवलं जात होतं. पण घरी नाटकात काम करत असल्याचे कळल्यावर ओरडा मिळेल म्हणून पंतांनी ते लपवून ठेवलं. नाटकाच्या दिवशी सांगणं भाग होतं. तेव्हा वर्गातील एक मुलगा आजारी पडल्याने आयत्यावेळी काम करावं लागतंय अशी चक्क थाप पंतांना मारावी लागली. पण ते नाटक छान झालं. पंतांकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टीकोन बदलला.
तारुण्याचा काळ मात्र पंतांसाठी बिकट ठरला. साहित्य संघाच्या कलाशाखेतर्फे नवोदित कलाकारांची निवड केली जायची. त्यात पंतांची निवड झाली. पण नाटकाच्या वेडापायी त्यांना घर सोडावं लागलं. तो अडीज वर्षांचा काळ खडतर होता. रात्री दुकानांच्या फळकुटावर झोपावं लागे. सकाळी थिएटर किंवा रेल्वेस्थानकाच्या प्रसाधनगृहात प्रात:विधी आटपावे लागत. दरम्यान रेल्वेच्या सांस्कृतिक विभागात नाटक तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्याचं किंवा गणपती उत्सवात प्रॉम्प्टरचं काम पंत करत होते. याही काळात नाट्यकलेवरचं त्यांचं प्रेम तसूभर कमी झालं नाही.
आणि मग तो दिवस उगवला. १३ मार्च १९५५ रोजी ‘राणीचा बाग’ नाटकाद्वारे पंतांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकलं. वयाच्या पंचविशीत मो.ग. रांगणेकर यांच्या ‘नाट्यनिकेतन’ सारख्या संस्थेत त्यांना प्रवेश मिळाला. विविध नाटकांतून कामं करत असताना १९६२ साली ‘तो मी नव्हेच’ हे अत्र्यांचं नाटक रंगभूमीवर येऊ घातलं. रांगणेकर यांनी अत्र्यांकडे पंतांच्या नावाचा मुख्य भूमिकेसाठी आग्रह धरला. आणि नंतरचा इतिहास आपण जाणतोच.पाच वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या भूमिका काही क्षणात साकारायचं शिवधनुष्य पंतांनी पेललं. अत्र्यांचा सुरुवातीला पंतांच्या नावाला आक्षेप होता पण पंतांनी लखोबा लोखंडे अशा तडफेने उभा केला की आपल्या पात्रांना पंतच न्याय देऊ शकले अशी अत्र्यांची वाहवा त्यांनी मिळवली.
तो मी नव्हेच, अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, जेव्हा गवताला भाले फुटतात, थॅन्क यू मिस्टर ग्लाड, भटाला दिली ओसरी ह्या नाटकातील पंतांच्या भूमिका म्हणजे मास्टरपीस.
हे देखील वाचा: काही कलाकार केवळ त्यांच्या उपस्थितीने आसपासचं वातावरण भारुन टाकतात. असं उमदं व्यक्तीमत्व म्हणजे श्रीकांत मोघे.
अभिनेता म्हणून समर्थ कामगिरी करतानाच पंतांनी उचललेलं महत्वाचं पाऊल म्हणजे नाट्यनिर्मिती. मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर या स्नेह्यांच्या मदतीने ‘नाट्यसंपदा’ या नाट्यसंस्थेची निर्मिती त्यांनी केली. अंधार माझा सोबती, अश्रूंची झाली फुले, किमयागार, संत तुकाराम, पुत्रकामेष्टी, संगीत मदनाची मंजिरी, संगीत सुवर्णातुला ही नाटकं त्यांनी रंगभूमीवर आणली. ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाची त्यांनी पुनर्निर्मिती केली. आणि या नाटकाने इतिहास घडवला. ‘अश्रूंची झाली फुले’ ‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘संत तुकाराम’ एकाच दिवशी तीन नाटकं तीन नाट्यगृहात लावण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
या सोबत प्रभाकर पणशीकर यांचं रंगभूमीसाठी सर्वात मोठं योगदान म्हणजे पोर्टेबल फिरत्या रंगमंचाची निर्मिती. १९७० मध्ये नाट्यसंपदेच्या माध्यमातून ‘तो मी नव्हेच’चे प्रयोग सुरू झाले तेव्हा हा अनोखा प्रयोग त्यांनी केला. नाटकात रमणा-या पंतांनी मोजक्या चित्रपटात भूमिका केली पण ते तिथे रूळले नाही.
विविध सन्मानांनी पुरस्कृत या नटश्रेष्ठाच्या नावे महाराष्ट्र राज्य सरकारचा नाट्यकलावंतांसाठीचा जीवन गौरव पुरस्कार दिला जातो.
काही कलाकार आपल्या कलेमुळे अजरामर होतात तर काही मंडळी नाट्यकलेला योग्य वळण देत कलेचा प्रवाह योग्य दिशेने नेण्यात यशस्वी होतात. पंतांनी या दोन्ही गोष्टींचा सुरेख मेळ साधला. या नटश्रेष्ठाला कलाकृती परीवाराचा सादर परिणाम.