‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
लता मंगेशकर यांचा जयकिशनबद्दल झाला गैरसमज!
पहिली भेट ही प्रत्येकाला कायमस्वरूपी लक्षात राहणारी असते. सूर सम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) आणि संगीतकार शंकर-जयकिशन यांच्यातील जयकिशन यांची पहिली भेट लता मंगेशकर यांना कायम लक्षात राहिली. याचं कारण लताने जयकिशन यांना संगीतकार न समजता वेगळेच काहीतरी समजलं होतं आणि तेच गृहीत धरून ती त्यांच्यासोबत गेली होती. लता मंगेशकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात हा भन्नाट किस्सा सांगितला आहे.
१९४८ सालची ही गोष्ट आहे. तेव्हा लता मंगेशकर(lata mangeshkar) अनिल विश्वास यांच्या ‘गजरे’ या चित्रपटातील एका गाण्याचे रेकॉर्डिंग करत होत्या. गाण्याचे बोल होते ‘बरस बरस बदल गई रे…’ लताचा कोवळा स्वर संगीतकार अनिल विश्वास यांना खूपच आवडला होता. त्यांनी लताला सांगितले की या गाण्याच्या रेकॉर्डिंगला मी राज कपूर यांना देखील बोलणार आहे. त्या वेळी लता नौशाद यांच्या ‘अंदाज’ साठी देखील गात होती. राज कपूर त्या वेळी आपल्या ‘बरसात’ या चित्रपटाच्या तयारीत होते. लताचा स्वर ऐकून राजकपूर देखील खूप प्रभावी झाले आणि त्यांनी ‘बरसात’ या चित्रपटात लता मंगेशकर यांच्याकडून गाणी गाऊन घ्यायचे ठरवले.
तेव्हा आर के स्टुडिओ बनायचा होता. महालक्ष्मी जवळच्या फेमस स्टुडिओमध्ये राज कपूर यांच्या चित्रपटाचे ऑफिस होते. गाण्याच्या रेकॉर्डिंग रिहर्सलला बोलवण्यासाठी राज कपूर यांनी संगीतकार शंकर जयकिशन यांच्यातील जयकिशन या तरुणाला लता मंगेशकर(lata mangeshkar) यांच्या घरी त्यांना आणण्यासाठी पाठवले. लता मंगेशकर त्यावेळी नाना चौकात राहत होत्या. जयकिशन तेव्हा अवघे १९ वर्षाचे तरुण होते. दिसायला अतिशय सुंदर, रुबाबदार, कुरळे केस आणि स्वप्निल डोळे! जयकिशन लता मंगेशकर यांच्या घरी गेले आणि दारावर टकटक केले.
लता मंगेशकर(lata mangeshkar) यांना वाटले राज कपूरने कोणीतरी ऑफिस बॉय किंवा ड्रायव्हर पाठवला असेल. त्यांनी दार उघडून पाहिले तर दारात एक उमदा तरुण हसऱ्या चेहऱ्याने उभा होता. लताने त्यांना आत बसवले आणि आत जाऊन मीना मंगेशकरांना सांगितले, “मला बाहेर बसलेला तरुण ऑफिस बॉय किंवा ड्रायव्हर तर वाटतच नाही. राजकपूर यांच्या घरातील आणि ऑफिसमधील सर्वच जण इतके सुंदर कसे काय असतात गं?” कारण राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर यांचे नाटक लता मंगेशकर यांनी बघितले होते. तेंव्हा राज, पृथ्वीराज सर्वच जण कमालीचे हँडसम होते. जयकिशन देखील त्यांना भयंकर सुंदर भासले होते. गंमत म्हणजे लता आणि जयकिशन दोघांनी एकमेकांची ओळख करून घेतलीच नाही. जयकिशन आणि लता टॅक्सीने महालक्ष्मीला फेमस स्टुडिओमध्ये गेले. संपूर्ण टॅक्सी प्रवासात ते परस्परांशी एक शब्द देखील बोलले नाहीत. आत गेल्यानंतर राजकपूर यांनी लताचे स्वागत केले.
थोड्या वेळाने मघाचा तो तरुण हार्मोनियम घेऊन समोर आला. तेव्हा लताला कळाले की ज्याला आपण ऑफिस बॉय किंवा ड्रायव्हर समजत होतो ते संगीतकार जयकिशन आहेत. लताला खूप कौतुक वाटले एवढ्या लहान वयामध्ये इतका सुंदर हार्मोनियम वाजवणारा कलाकार आहे. नंतर ‘बरसात’ या चित्रपटापासून आर के ची संपूर्ण टीम तयार झाली. लता मंगेशकर, मुकेश, हसरत जयपुरी, शैलेंद्र, आणि शंकर जयकिशन! या टीमने पुढची वीस वर्ष भारतीय चित्रपट संगीतामध्ये सुरांची बरसात केली. ‘बरसात’ चित्रपटातील पहिले गाणे जे लता मंगेशकर(lata mangeshkar) यांनी रेकॉर्ड केले ते गाणे होते ‘जिया बेकरार है छाई बहर है…’ हा किस्सा लता आणि जयकिशन पुढे नेहमी आठवून हसत असत.
=======
हे देखील वाचा : यामुळे लता मंगेशकर आणि रफी एकमेकांसोबत गात नव्हते…
=======
लता मंगेशकर(lata mangeshkar) आणि शंकर जयकिशन हे कॉम्बिनेशन प्रचंड लोकप्रिय ठरले. या कॉम्बिनेशनची टॉप गाणी काढायची तर रसिक बलमा (चोरी चोरी) अजी रूठकर अब कहा जाइयेगा(आरजू) मनमोहना बडे झुटे(सीमा) अजीब दास्ता है ये (दिल अपना और प्रीत पराई) रुक जा रात ठहर जा रे चंदा (दिल एक मंदिर) तेरा जाना दिल के अरमानो का लूट जाना (अनाडी) तेरा मेरा प्यार अमर (असली नकली) ये शाम कितना है या ऐसे मे तेरा गम (आह) घर आया मेरा परदेसी (आवारा) मन रे तू हि बता क्या गाऊ (हमराही) जयकिशन यांच्या निधनानंतर (१९७१) देखील लता शंकरजी कडे गात होत्या!