दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
१९४२: ए लव्ह स्टोरी – प्रीमिअर शो साठी गेलेले सेलिब्रेटी राहिले थिएटरबाहेर कारण….
१९९४ साली आलेला म्युझिकल सिनेमा म्हणजे १९४२: ए लव्ह स्टोरी (1942: A Love Story). खरंतर हा सिनेमा १९४२ सालच्या आंदोलनावर आधारित होता. या सिनेमाच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर डी बर्मन यांचा हा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमासाठी त्यांना सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पण पुरस्कारांची ही हॅट्रिक त्यांना पाहता आली नाही. कारण दुर्दैवाने सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच ते हे जग सोडून गेले होते.
सिनेमाच्या नावावरून सर्वांना अंदाज आलाच होता की, हा ऐतिहासिक सिनेमा असणार. तसा तो होताही, पण ऐतिहासिक घटनेला काल्पनिक प्रेमकथेची जोड देऊन दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी इतिहासाच्या चित्रातही प्रेमाचे गुलाबी रंग भरले आणि त्याला साथ मिळाली ती सुमधुर गाण्यांची. सिनेमामधली सर्वच गाणी अप्रतिम आहेत आणि आजही ती तितक्याच आवडीने ऐकली जातात.
ही कहाणी आहे रज्जो (मनीषा कोईराला) आणि नरेनची (अनिल कपूर). दोन विभिन्न विचारसरणी असलेल्या कुटुंबात वाढलेल्या या दोघांची कहाणी स्वातंत्र्याच्या लढाईच्या चक्रव्युहामध्ये अडकते. नरेनचे वडील दिवाण हरी सिंग (मनोहर सिंग) निष्ठावान ब्रिटिश कर्मचारी, तर रज्जोचे वडील रघुवीर पाठक (अनुपम खेर) हे ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणारे क्रांतिकारक. नरेन रज्जोला लग्नासाठी मागणी घालतो तेव्हा अर्थातच रज्जोच्या वडिलांना हे मान्य होत नाही, पण शेवटी नरेन त्यांचं मन वळवण्यात यशस्वी होतो. नरेन आपल्या वडिलांशी रज्जोबद्दल बोलतो. आपल्या मुलाने एका क्रांतिकारकाची मुलीची निवड केली ही गोष्ट त्यांना अजिबातच आवडत नाही. परंतु नरेनच्या आनंदासाठी ते आपली सहमती दर्शवतात. अर्थात यामागे त्यांचा वेगळाच डाव असतो.
हरी सिंह नरेनचा वापर करून आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांना क्रांतिकारी योजनांची सर्व माहिती देतात. पोलीस रघुवीरला अटक करायला जातात तेव्हा रघुवीर घरात बॉम्ब फोडतो आणि त्यामध्ये रघुवीरसह सर्वजण मारले जातात. रज्जो मात्र त्यावेळी बाहेर असते. त्यामुळे ती वाचते. वडिलांच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या रज्जोला शुभंकर (जॅकी श्रॉफ) सहारा देतो. नकळत तो तिच्या प्रेमात पडतो. नरेनला वास्तव समजल्यावर त्याला धक्का बसतो व तो क्रांतिकारी होण्याचा निश्चय करतो. कथानकात अनेक घडामोडी घडतात आणि नायक नायिका एकत्र येऊन सिनेमा संपतो.
विधू विनोद चोप्रा यांनी एक वेगळ्या वळ्णावरची प्रेमकहाणी अत्यंत सुंदर पद्धतीने दिग्दर्शित केली होती. या सिनेमाला फिल्मफेअर पुरस्कारासाठी एकूण १३ नॉमिनेशन्स मिळाली होती. त्यापैकी ९ पुरस्कार मिळाले. सिनेमाला सर्वात मोठी स्पर्धा होती ती ‘हम आपके है कौन’ या सिनेमाची. अन्यथा या सिनेमाच्या पुरस्कारांची संख्या अजून वाढली असती. आता थोडंसं सिनेमाच्या मेकिंग दरम्यानच्या किस्स्यांबद्दल (Lesser Known facts about 1942: A Love Story)-
नायिकेच्या भूमिकेसाठी माधुरी होती पसंती
राजेश्वरी म्हणजेच ‘रज्जो’ पाठकच्या भूमिकेसाठी विधू सिनोद चोप्रा यांची पहिली पसंती होती ती माधुरी दीक्षित. इतकंच काय तर, त्यांनी माधुरीला डोळ्यासमोर ठेवून सिनेमाची कथा लिहिली होती. तसंच जावेद अख्तर यांनी माधुरीला डोळ्यासमोर ठेवून ‘एक लडकी को देखा तो… ’ हे गाणं लिहिलं होतं. परंतु माधुरीकडे तारखा उपलब्ध नसल्यामुळे या सिनेमात तिच्या जागी मनीषा कोईरालाची निवड करण्यात आली.
अश्विनी भावेनेही दिली होती ऑडिशन
माधुरीने नकार दिल्यावर चोप्रा यांनी तिच्या भूमिकेसाठी ऑडिशन प्रक्रिया पुन्हा सुरु केली. या दरम्यान अश्विनी भावेनेही ऑडिशन दिली होती. परंतु तिची निवड होऊ शकली नाही.
मनिषाने दिली पुन्हा ऑडिशन
मनीषा कोईराला या चित्रपटात रज्जोच्या बहिणीची भूमिका करणार होती. परंतु माधुरीच्या नकारानंतर चोप्रांनी ऑडिशन सुरु केली तेव्हा मनिषाने पुन्हा ऑडिशन दिली. यानंतर रज्जोची भूमिका मनीषाला मिळाली व ती साकारत असलेलं रज्जोच्या बहिणीचं पात्र कथानकातून वगळण्यात आलं. (Lesser Known facts about 1942: A Love Story)
आमिर खान होता पहिली पसंती
नायकाच्या भूमिकेसाठी विधू विनोद चोप्रा यांची पहिली पसंती होती ती आमिर खानला. परंतु त्याच्याकडे तारखा उपलब्ध नसल्यामुळे ही भूमिका अनिल कपूरला मिळाली.
रेकॉर्डिंग न करताच परत गेले कुमार सानू
कुमार सानू ‘एक लडकी को देखा तो’ हे गाणं रेकॉर्ड करायला गेले तेव्हा त्यांनी ‘क्लीन शेव्ह’ केलं नव्हतं. विधू विनोद चोप्रांनी जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा त्यांना त्यांचा चेहरा खटकला. हे गाणं एका तरुणाने गायलेलं वाटायला हवं म्हणून गायकाचा चेहराही तसाच दिसायला हवा, असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी कुमार सानू यांना सांगितलं, “घरी जाऊन दाढी करून ये, मगच रेकॉर्डिंग होईल.” कुमार सानू दुसऱ्या दिवशी क्लीन शेव्ह करून रेकॉर्डिंगला गेले. त्यांना पाहून चोप्रा खुश झाले आणि रेकॉर्डिंग व्यवस्थित पार पडलं. हे गाणं कुमार सानू यांच्या उत्तम गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याने त्यांना फिल्फेअर पुरस्कारही मिळवून दिला.
=================
हे ही वाचा: शबाना आझमी यांनी दोन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न कारण…
यश चोप्रांचे चित्रपट म्हणजे अलवार प्रेमकहाणी, नयनरम्य लोकेशन्स; इथे स्वप्नं विकली जात असत…
===================
प्रीमिअर शो साठी गेलेले सेलिब्रेटी राहिले थिएटरबाहेर
मुंबईतील मेट्रो सिनेमात रात्री ९:३० वाजता सिनेमाचा प्रीमियर होणार होता. चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत व्यक्तींना यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. विधू विनोद चोप्रांनी या सिनेमासाठी तब्ब्ल चार वर्ष मेहनत घेतली होती. त्यामुळे हा सिनेमा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. सिनेमा ९:३५ ला सुरू झाला. यांनतर सिनेमा बघणाऱ्यांना उशिरा येणाऱ्यांचा त्रास होऊ नये म्हणून विधू विनोद चोप्रा यांनी थिएटरचे सर्व दरवाजे आतून बंद करायला सांगितले. यामुळे अनेक नामवंत अभिनेते आणि दिग्दर्शक सिनेमागृहाबाहेर थांबले होते. (Lesser Known facts about 1942: A Love Story)
हा सिनेमा नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, युट्यूब आणि गुगल मूव्हीजवर उपलब्ध आहे. IMDB वर या सिनेमाला ७.२ रेटिंग देण्यात आलं आहे.