मोहब्बते: या चित्रपटात सचिन तेंडुलकर दिसणार होता एका खास भूमिकेत पण…
एकाच चित्रपटात चार प्रेमकहाण्या, रोमँटिक गाणी, नयनरम्य लोकेशन्स आणि नवीन कलाकारांसह बॉलिवूडमधले नामवंत कलाकार; असा सगळा लवाजमा घेऊन २००० साली आलेला ‘मोहब्बते (Mohabbatein)’ हा चित्रपट आजही लोकांच्या स्मरणात आहे.
चित्रपटाची कहाणी म्हणाल तर, हा चित्रपट संपूर्णपणे ‘प्रेम’ या संकल्पनेवर आधारित आहे. ‘गुरुकुल’ नावाचं एक प्रतिष्ठित विद्यापीठ. या विद्यापीठाचे प्राचार्य असतात नारायण शंकर. नारायण शंकर अत्यंत कडक शिस्तीचे. त्यामुळे विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी त्यांना घाबरून असत. विद्यार्थ्यांवर असणाऱ्या अनेक निर्बंधांपैकी एक म्हणजे प्रेमाला असणारा कडक विरोध. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेमात पडायचा अधीकार नसतो. तसं केल्यास त्याला विद्यापीठातून काढून टाकण्यात येतं. इथे घटनेमधील मूलभूत अधिकार ही संकल्पना पद्धतशीरपणे धाब्यावर बसवण्यात आले आहेत. असो.
तर, एवढे कडक नियम असूनही इथले विकी, समीर आणि करण हे विद्यार्थी प्रेमात पडतात. यांच्या मदतीला धावून येतो, गुरुकुलमध्ये संगीत शिक्षक म्हणून नव्याने रुजू झालेला राज आर्यन. राज आर्यनचा स्वतःचा असा एक भूतकाळ असतो.
राजच्या प्रेयसीचा मृत्यू झालेला असतो आणि त्या प्रेयसीचं भूत त्याच्याशी बोलत असतं. त्याच्यासोबत गाणी म्हणत नाचत असतं; अशा बऱ्याच अनाकलनीय गोष्टी चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. असो. विकी कॉलेजमधल्याच एका मुलीवर प्रेम करत असतो, जी त्याला अजिबात भाव देत नसते. समीर त्याच्या बालमैत्रिणीवर प्रेम करत असतो, जिचं दुसऱ्याच मुलावर प्रेम असतं. तर, करण १८ वर्षांच्या एका ‘व्हर्जिन’ विधवेवर प्रेम करत असतो. व्हर्जिन विधवा यासाठी की, तिचा सैनिक नवरा लग्नाच्या रात्रीच लढाईसाठी ड्युटीवर हजर होतो आणि या लढाईत तो शहीद झालेला असतो. मात्र त्याची ‘डेड बॉडी’ न मिळाल्यामुळे त्याचे वडील तो जिवंत असल्याच्या आशेवर जगत असतात. तर अशा या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाण्या.
अखेर प्रेम जिंकतं. राज आर्यन सगळ्यांना त्यांचं प्रेम मिळवून देण्यात आणि नारायण शंकर यांचं मतपरिवर्तन करण्यात यशस्वी होतो. आणि सगळं गोड होऊन चित्रपट संपतो. तर अशा आगळ्या वेगळ्या प्रेमकहाण्या असणाऱ्या चित्रपटाच्या मेकिंगचे किस्सेही हटके आहेत. त्याबद्दलच थोडंसं (Lesser Known Facts About Mohabbatein)-
१. अमिताभ बच्चन यांनी साधला होता यश चोप्रांशी संपर्क
त्यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे कोणताच चित्रपट नव्हता. निर्माते त्यांना संपर्कही करत नव्हते. अशावेळी बिग बी यांनी कमीपणा न घेता स्वतःहून यश चोप्रांकडे भूमिकेसाठी विचारणा केली. त्याच दरम्यान यश चोप्रा मोहब्बतेच्या स्क्रिप्टवर काम करत होते. त्यामुळे त्यांनी लगेच नारायण शंकर यांची भूमिका बिग बी ना दिली.
२. स्क्रिप्टमधून वगळली नारायण शंकर यांच्या पत्नीची भूमिका
नारायण शंकर यांच्या पत्नीची भूमिका श्रीदेवीला ऑफर करण्यात आली होती. परंतु तिने नकार दिला. यानंतर ही भूमिका माधुरी दीक्षितला ऑफर करण्यात आली. परंतु तिनेही नकार दिला आणि अखेर ही भूमिकाच स्क्रिप्टमधून वगळण्यात आली.
३. काजोल आणि करिश्मालाही होती ऑफर
चित्रपटातील इशिका आणि संजना या भूमिका अनुक्रमे काजोल आणि करिश्माला ऑफर करण्यात आल्या होत्या. परंतु दोघीनींही नकार दिला. (Lesser Known Facts About Mohabbatein)-
४. ऐश्वर्या नव्हती पहिली पसंती
चित्रपटातील मेघाची भूमिका आधी राणी मुखर्जीला ऑफर करण्यात अली होती. परंतु ही व्यक्तिरेखा तिच्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या जवळपास जाणारी होती. त्यामुळे तिने नकार दिला आणि मेघाच्या भूमिकेत ऐश्वर्या सर्वांसमोर आली.
५. स्क्रिप्ट न वाचताच दिला होकार
राज आर्यनची भूमिका जेव्हा शाहरुखला ऑफर करण्यात आली तेव्हा या भूमिकेसाठी त्याने स्क्रिप्ट न वाचताच होकार दिला होता. (Lesser Known Facts About Mohabbatein)-
६. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर टाकणार होता अभिनय क्षेत्रात पाऊल
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या सावत्र मुलाच्या भूमिकेसाठी सचिन तेंडुलकरला साइन करण्यात आले होते. परंतु नंतर काही कारणांनी त्याची भूमिका स्क्रिप्टमधून वगळण्यात आली.
=================
हे ही वाचा: दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांचा बोलबाला…. बॉलीवूडला मात्र ठेंगा
जेव्हा ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचे प्रेक्षक भरत जाधव यांच्या वडिलांवर चिडले…
==================
या चित्रपटात अमिताभ बच्चन (नारायण शंकर), शाहरुख खान (राज आर्यन), उदय चोप्रा (विकी), जुगल हंसराज (समीर) जिमी शेरगिल (करण), ऐश्वर्या राय (मेघा), शमिता शेट्टी (इशिका), किम शर्मा (संजना), प्रीती झांगियानी (किरण), अमरीश पुरी (मेजर जनरल खन्ना) इ. कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपटात बघायचा असल्यास अमेझॉन प्राईम आणि यु ट्यूबवर उपलब्ध आहे. IMDB वर या चित्रपटाला ७ रेटिंग देण्यात आलं आहे.