ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
अभिनेत्यापेक्षा चार पट जास्त मानधन घ्यायचा हा विनोदाचा बादशहा! अमिताभ बच्चनलाही केली होती मदत
उत्तम अभिनय, उत्तम आवाज आणि विनोदाचे अचूक टायमिंग असलेले अभिनेते मेहमूद (Mehmood) यांनी एक काळ गाजवला. त्यांचे प्रचंड चाहते त्यांना पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत असत. कित्येक चित्रपट त्यांच्यामुळे सुपरहिट झाले. दिग्दर्शकदेखील आधी मेहमूद यांना कास्ट करत नंतर इतरांची निवड करत. अशा हरहुन्नरी विनोदी अभिनेत्याच्या पुण्यतिथीनिमित्त (२३ जुलै) त्यांच्या बॉलीवूडमधील कारकिर्दीविषयी काही रोचक तथ्ये जाणून घेऊया….
भारतीय सिनेसृष्टीत नायकाइतकेच विनोदी अभिनेत्यांनाही महत्त्व आहे. आतापर्यंतच्या सर्वच विनोदवीरांमध्ये मेहमूद अली यांचे नाव सर्वोच्चस्थानी आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना ‘किंग ऑफ कॉमेडी’ म्हणून ओळखले जाते. अशा या विनोदवीराचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ मध्ये मुंबईत झाला. त्यांनी जवळपास ४ दशके सिनेसृष्टीत काम केले. आपल्या अभिनयाने लाेकांना पोट धरून हसण्याला भाग पाडले. (Lesser known stories of Mehmood)
बालकारापासून केली कारकिर्दीची सुरुवात
अभिनेते आणि नृत्य कलाकार मुमताज अली यांच्या नऊ मुलांपैकी मेहमूद एक हाेते. आपल्या वडिलांसोबत ते अनेकदा फिल्म स्टुडिओमध्ये जात असत. एकदा अशोक कुमार यांच्या बालपणाची भूमिका साकारण्यासाठी एक खोडकर मुलगा हवा होता. शोधूनही कोणी सापडले नाही. मात्र स्टुडिओ बाहेर खेळत असलेल्या मेहमूद यांच्यावर अशोक कुमारांची नजर पडली. त्यांनी मेहमूद यांची निवड केली. अशा प्रकारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘किस्मत’ चित्रपटात बालकलाकार म्हणून झाली.
मेहमूद यांनी उपजीविकेसाठी केली लहान मोठी कामे
अभिनयाच्या क्षेत्रामध्ये बस्तान बसवीत असताना मेहमूद यांनी उपजीविकेसाठी बरीच लहान मोठी कामे केली. त्यांनी लहानपणी रेल्वे स्टेशनवर गोळ्या-बिस्किट विकली. मोठे झाल्यावर चालक म्हणूनही काम केले. निर्माते ज्ञान मुखर्जी यांच्या गाडीवरही चालक म्हणून त्यांनी नोकरी केली होती. शिवाय आपल्या जमान्याची प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांना टेबल टेनिस शिकवत होते. पुढे मेहमूद यांनी अभिनेत्री मीना कुमारी यांची बहिण मधुसोबतच लग्न केले.
केले ३०० चित्रपटात काम
अभिनेते मेहमूद यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. ते अभिनेते, गायकाबरोबरच दिग्दर्शक आणि निर्माते म्हणूनही नावारूपाला आले. आजही मेहमूद बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय विनोदवीर म्हणून ओळखले जातात. मेहमूद अली यांच्याविषयी बोलेले जाते की, सीनसाठी ते कधीच रिहर्सल करत नव्हते. जो सीन करायचा तो थेट सेटवर करत. विशेष म्हणजे एका टेकमध्येच सीन ओके करत. ते जास्त रिटेक घेत नसत. मेहमूद यांच्या भाषेतील हैदराबादी लहेजा प्रेक्षकांना आवडायचा. त्यांची संवादफेकी आणि अभिनयाच्या पराक्रमाने लाखो लोक त्यांचे चाहते बनले. त्यामुळे हास्य अभिनेता, विनोदवीर, विनोदाचा बादशहा अशी अनेक विशेषणे त्यांना लाभली. मेहमूद यांनी आपल्या कारकिर्दीत ३०० चित्रपटात काम केले. (Lesser known stories of Mehmood)
नायकापेक्षा मिळायचे चार पट मानधन …
मेहमूद यांना नायकापेक्षा दुप्पट नव्हे तर तीन ते चार पट मानधन मिळत असे. १९७१ मध्ये आलेल्या ‘मै सुंदर हू’ या चित्रपटासाठी मेहमूद यांनी मुख्य नायक विश्वजीत यांच्यापेक्षाही जास्त मानधन घेतले होते. विश्वजीत यांना २ लाख, तर मेहमूद यांना ८ लाख रुपये मिळाले होते.
मात्र ‘कुंवारा बाप’मधून रडवले…
‘कुंवारा बाप’ चित्रपटातून मेहमूद यांनी पोलिओग्रस्त मुलाची कथा मांडली होती, लाचार बापाची व्यथा पाहून लोक रडल्याशिवाय राहिले नाहीत. या चित्रपटातील कथा मेहमूद यांच्या जीवनावर आधारित असल्याचे बोलले जाते. कारण त्यांच्या दुसऱ्या मुलाला पोलिओ होता, लाखो रुपये खर्च करुनही तो शेवटपर्यंत बरा होऊ शकला नाही. (Lesser known stories of Mehmood)
जमीनीशी जोडलेले होते मेहमूद
प्रसिद्धीच्या झोतात असूनही मेहमूद नेहमी जमीनीशी जोडलेले राहिले. त्यांनी बऱ्याच कलाकार आणि लोकांची मदत केली. ते स्वत: गरीबीतून आले असल्याने त्यांना गरीबीची जाण होती, त्यामुळे त्यांनी बऱ्याच लोकांना आर्थिक मदतही केली. संगीतकार राहुलदेव बर्मन यांना ‘छोटे नवाब’ चित्रपटातून कामाची संधी दिली. त्या काळात हा चित्रपट प्रचंड गाजला होता.
अमिताभ बच्चन स्ट्रगल करत असताना एकामागून एक चित्रपट अपयशी होऊ लागले होते. हळूहळू त्यांना काम मिळायचं बंद झालं, तेव्हा हताश होऊन ते मुंबई सोडण्याचा विचार करत होते. त्यावेळी मेहमूद यांनी खास अमिताभ यांच्यासाठी ‘बॉम्बे टू गोवा’ हा चित्रपट बनवला. त्यात मुख्य भूमिका देऊन त्याच्या कारकिर्दीला आधार दिला. हा चित्रपट अमिताभ यांच्या जीवनातला मैलाचा दगड ठरला.
पटकावले अनेक पुरस्कार
मेहमूद यांना १९६३ मध्ये आलेल्या ‘दिल तेरा दीवाना’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय ‘प्यार किए जा’, ‘वारिस’, ‘पारस’साठी सर्वोत्कृष्ट हास्य अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. (Lesser known stories of Mehmood)
========
हे देखील वाचा – मधु सप्रे: नव्वदच्या दशकात न्यूड फोटोशूट करुन खळबळ माजवणारी ‘सुपरमॉडेल’ सध्या काय करते?
=======
अशा या अप्रतिम विनोदी कलाकाराने २३ जुलै २००४ रोजी अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया शहरात झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एरवी खळखळून हसवणारा हा कलाकार जाताना सर्वांना मात्र रडवून गेला.
– राजेश्वरी बोर्डे