किशोरदांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे निर्मात्याने घेतली होती कोर्ट ऑर्डर…
किशोर कुमार! (Kishore Kumar) भारतीय चित्रपटसृष्टी ज्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असं हे. नाव. काही लोकांना देवाने ‘फुरसतसे’ म्हणावं असं बनवलेलं असतं. अशांपैकीच एक किशोर कुमार होते. संगीताचं कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणारा हा गायक म्हणजे एक अष्टपैलू कलाकार होता. किशोर कुमार म्हटलं की हमखास त्यांच्यातला गायकच नजरेसमोर येतो. पण हा महान कलाकार गीतकार, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक आणि संगीतकारही होता. आज या महान कलाकाराचा जन्मदिवस!
गांगुली कुटुंबातील आभास कुमार नावाचा मुलगा सिनेसृष्टीमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईमध्ये आला. बॉम्बे टॉकीजमध्ये कोरस गायक म्हणून आपल्या सिनेमा कारकीर्दीला सुरुवात करताना त्याने आपलं नाव बदलून ‘किशोर कुमार’ असं केलं. संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश यांनी या मुलामधला स्पार्क ओळखला आणि यांना ‘जिद्दी’ चित्रपटात “मरने की दुआएं क्यों मांगू” हे गाणं गायची संधी दिली. यानंतर मात्र त्यांच्याकडे गाण्याच्या प्रचंड ऑफर्स येऊ लागल्या.
किशोरदांच्या सुरुवातीच्या गाण्यांवर गायक ए के सैगल यांची छाप दिसून येते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे किशोरदा सैगल साहेबांना खूप मानत असत. अर्थात नंतर त्यांनी आपली स्वतंत्र शैली निर्माण केली आणि ती प्रचंड लोकप्रियही झाली. किशोरदा खास ओळखले जातात ते त्यांच्या ‘योडलिंग (Yodelling) या शैलीसाठी. या शैलीला संगीतात स्थान दिले ते सचिन देव बर्मन यांनी.
किशोरदांनी (Kishore Kumar) पन्नासच्या दशकापासून गायनासोबतच काही चित्रपटांमध्ये अभिनयही केला होता. अर्थात त्यांना अभिनयामध्ये फारसा रस नव्हता. परंतु मोठ्या भावाच्या म्हणजेच अशोककुमार यांच्या सल्ल्यानुसार ते अभिनय करायचे. कारण त्यावेळी शास्त्रीय संगीताचा अभ्यास नसल्यामुळे संगीतकार त्यांना गाणं द्यायला तयार होत नसत. शिवाय मन्ना डे आणि रफी यांच्यासारखे शास्त्रीय संगीतात मुरलेले प्रस्थापिक गायक सिनेसृष्टीत होते. त्यामुळे किशोरदांना फारशी गाणी मिळत नसत. किशोरदा अभिनय ठीकठाक करायचे. त्यांच्या विनोदी भूमिकाही लोकप्रिय होत होत्या. पण वक्तशीरपणाचा अभाव आणि बिनधास्त जीवनशैली या गोष्टी त्यांच्या यशामधला अडथळा ठरत होत्या.
सुरुवातीच्या काळात किशोर कुमार – देवानंद ही जोडी लोकप्रिय झाली होती. वैयक्तिक आयुष्यातही दोघांची चांगली मैत्री होती. देवानंद तेव्हा स्टार होते. ते आपल्यासाठी किशोरचाच आवाज हवा असा आग्रह निर्मात्यांना करायचे, त्यामुळे नाईलाजाने इच्छा नसूनही अनेकदा निर्माते किशोरदांना संधी द्यायचे. किशोरदा गाणं शिकलेले नसले तरी त्यांचा आवाज आणि त्यांची गाणी देवानंद यांच्या स्टाईलला परफेक्ट सूट व्हायची.
किशोरदा प्रयोगशील होते. १९६१ साली त्यांनी असाच एक प्रयोग केला. त्या वर्षी आलेल्या ‘झुमरू’ या चित्रपटात किशोरदांनी निर्माते, कथाकार, अभिनेते व संगीतकार आणि अर्थातच गायक अशा जवळपास सर्वच महत्त्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.
किशोरदांचे (Kishore Kumar) व्यावसायिक आयुष्य ठीकठाक सुरु होतं. परंतु वैयक्तिक आयुष्यात मात्र ते अपयशी ठरले होते. त्यांनी एकूण चार लग्न केली. पण विशेष चर्चा झाली ती त्यांच्या आणि ‘आरस्पानी सौंदर्य’ लाभलेल्या मधुबालाच्या विवाहाची. किशोर कुमार आणि मधुबाला ही प्रेमकहाणी असफल म्हणावी तर, दोघांनीही विवाह केला होता. पण तरीही ही प्रेमकहाणी नेहमी अधुरीच राहिली. मधुबालाच्या मृत्यूनंतर मात्र किशोरदा एकाकी पडले. पण म्हणतात ना, “उपरवाला एक हाथ से लेता है तो दुसरी हाथ से भरभर के देता है..” किशोरदांचंही तसंच झालं.
१९६८ सालच्या ‘पडोसन’ चित्रपटानंतर किशोरदांची कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. यानंतर १९६९ साली आलेल्या ‘आराधना’ या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला ‘चार चाँद’ लावले कारण. एकतर या चित्रपटामध्ये राजेश खन्नासाठी किशोरदांनी पार्श्वगायन केलं होतं आणि दुसरं म्हणजे यामधील सर्वच गाणी तुफान लोकप्रिय झाली. मग मात्र किशोर नावाचं ‘वादळ’ चित्रपटसृष्टीत घोंगावू लागलं.
किशोरदांबद्दल (Kishore Kumar) लिहायचं तर खूप काही लिहिता येईल. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला होता. पण ते तो नको तिथे वापरत असत. सेटवर वेळेवर न येणं, पूर्ण रक्कम मिळाली नाही तर अर्धाच मेकअप करून चित्रीकरणासाठी जाणं किंवा रेकॉर्डिंग न करता घरी निघून जाणं; अशा अनेक गोष्टींमुळे सहकलाकार, निर्माते व दिग्दर्शक त्यांच्यावर चिडत असत. त्यांच्या तऱ्हेवाईकपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध होते.
===========
हे देखील वाचा – मीनाक्षीच्या आयुष्यात वेडा झाला होता हा प्रसिद्ध गायक… दिला होता पत्नीला घटस्फोट
===========
किशोरदांच्या अशा वागण्यामुळे एका निर्मात्याने “चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक जे सांगतील ते सारं किशोरदांना ऐकावं लागेल”, असा आदेश कोर्टाकडून घेतला होता. पण किशोरदा शेरास सव्वाशेर होते. चित्रीकरणादरम्यान एका दृश्यात गाडी वेगाने पळवून एके ठिकाणी थांबायचे होते. मात्र किशोरदांनी गाडी न थांबवता थेट पांच मैल पुढे नेली. यावर दिग्दर्शकाने संतापून त्यांना कोर्ट ऑर्डरची आठवण करून दिली तेव्हा किशोरदा म्हणाले, “ मी नियम मोडलेला नाही. मला गाडी चालवायला सांगितलं होतं. पण थांबायला नव्हतं सांगतलं …”
आपल्या वैयक्तिक आयुष्यातलं दुःख पचवून सदोदित मिश्किल जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गायकाने १३ ऑक्टोबर रोजी वयाच्या अवघ्या ५८ व्या वर्षी या जगाला कायमचा ‘अलविदा’ केला.
– भाग्यश्री बर्वे