मीनाक्षीच्या आयुष्यात वेडा झाला होता हा प्रसिद्ध गायक… दिला होता पत्नीला घटस्फोट
मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri)! नव्वदच्या दशकांतील एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री. मीनाक्षी तशी नंबर १ च्या स्पर्धेत कधीच नव्हती. पण तिने ज्या भूमिका केल्या त्या मनापासून केल्या. तिचा स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग होता.
16 नोव्हेंबर 1963 रोजी झारखंडमधील सिंद्री येथे जन्मलेल्या मीनाक्षीचं खरं नाव होतं शशिकला शेषाद्री. तिचं बहुतांश शिक्षण झारखंड आणि दिल्लीमध्ये झालं आहे. लहानपणापासूनच ती भरतनाट्यम शिकत होती. सन 1981 मध्ये वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मीनाक्षीने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि ती भारताची सर्वात तरुण मिस इंडिया बनली. मिस इंडिया झाल्यानंतर मीनाक्षी शेषाद्रीकडे मॉडेलिंग आणि चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या.
1982 मध्ये ‘पेंटर बाबू’ या चित्रपटातून मीनाक्षीने फिल्मी करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. परंतु 1983 मध्ये आलेल्या ‘हीरो’ या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. सुभाष घई दिग्दर्शित हा चित्रपट ‘ब्लॉकबस्टर’ ठरला. मीनाक्षी हळूहळू बॉलिवूडमध्ये स्थिरावत होती. पण तिची जोडी विशेष कुठल्या नायकाशी जुळली नाही. याच काळात तिच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली असती, पण तिच्या प्रसंगावधानाने ती टळली. (Lesser known story of Meenakshi Seshadri)
ही घटना आहे १९८९ सालची. त्यावेळी मीनाक्षी शेषाद्री आणि कृष्णा फेम नितीश भारद्वाराज यांच्या ‘नाचे नागीन गली गली’ या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण जुहू मधील एका बंगल्यामध्ये चालू होते. चित्रीकरणांनंतर बंगल्यातल्याच एका खोलीमध्ये जात असताना मीनाक्षीला एका माणसाने अडवले आणि तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या अनपेक्षित घटनेनं मीनाक्षी घाबरली. परंतु क्षणात तिने स्वतःला सावरलं आणि अंगातली सगळी ताकद एकवटून त्या माणसाला दूर लोटलं, त्याच्या कानाखाली मारून जोरजोरात मदतीसाठी ओरडली.
मीनाक्षीचा आवाज ऐकून आजूबाजूची माणसं तिथे धावत आली. त्यांनी त्या माणसाला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलीस तपासणीत तो मीनाक्षीचा फॅन असणारा एक माथेफिरू असल्याचं समजलं. या घटनेबद्दल नितीश भारद्वाज यांना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारल्यावर त्यांनीही ही घटना खरी असल्याची माहिती दिली होती. अर्थात तेव्हा सोशल मीडिया नसल्यामुळे ही बातमी फारशी ‘व्हायरल’ झाली नाही.
मीनाक्षी शेषाद्रीची कारकीर्द घडवण्यात राजकुमार संतोषी यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी त्यांच्या घायल, दामिनी, घातक यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिला संधी दिली होती. ‘दामिनी’ हा तर संपूर्णपणे स्त्री प्रधान चित्रपट होता. हा चित्रपट राजकुमार संतोषी यांनी केवळ मीनाक्षीसाठीच बनवल्याच्या चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. (Lesser known story of Meenakshi Seshadri)
मीडिया रिपोर्टनुसार, राजकुमार संतोषी मीनाक्षी शेषाद्रीवर मनापासून प्रेम करत होते. त्यांनी मीनाक्षीसमोर आपले प्रेम व्यक्तही केले होते, परंतु मीनाक्षीने त्यांना नकार दिला. कारण याच दरम्यान मीनाक्षी दुसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. ती व्यक्ती होती गायक कुमार सानू. त्या काळात मीनाक्षी आणि कुमार सानू यांच्या अफेअरच्या चर्चेलाही उधाण आलं होतं. इतकंच काय तर, मीनाक्षीने कुमार सानूवरच्या प्रेमामुळेच राजकुमार संतोषींना नकार दिल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या.
कुमार सानू मीनाक्षीच्या प्रेमात पूर्णपणे वेडे झाले होते. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. यानंतर दोघे लवकरच लग्न करतील अशी अटकळ बांधली जात होती. परंतु तीन वर्षांतच या चर्चा थांबल्या कारण 1997 साली मीनाक्षी इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश म्हैसूर यांच्याशी लग्न करून अमेरिकेला निघून गेली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मीनाक्षीचे लग्न झाल्यानंतर कुमार सानूच्या आयुष्यात सर्व काही ठीक झाले आणि त्यांची पत्नीही त्यांच्याकडे परत आली. (Lesser known story of Meenakshi Seshadri)
=========
हे देखील वाचा – तब्बेत ठीक नसतानाही मोहम्मद रफी यांनी ‘या’ अभिनेत्यासाठी केले पुन्हा रेकॉर्डिंग
=========
सध्या मीनाक्षी शेषाद्री पती हरीश म्हैसूर, मुलगा जोश आणि मुलगी केंद्रा यांच्यासह अमेरिकेतील डलास शहरात सुखाने आयुष्य व्यथित करत आहे. मध्यंतरी तिचा एक लेटेस्ट फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.