दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जेव्हा सुनील बर्वे यांनी नोकरी सोडल्याचं होणाऱ्या सासऱ्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले…
सुनील बर्वे (Sunil Barve)! मराठी चित्रपटसृष्टीमधला एक चिरतरुण अभिनेता. चिरतरुण यासाठी की, आजही हा अभिनेता पूर्वीइतकाच तरुण दिसतो. गोरेगाव मध्ये जन्मलेल्या आणि शिकलेल्या सुनील बर्वे यांचं शिक्षण ‘सेंट थॉमस हायस्कुल’ या कॉन्व्हेंट स्कुलमध्ये झालं आहे. यानंतर त्यांनी पाटकर कॉलेजमधून केमिस्ट्री हा विषय घेऊन बीएससी पूर्ण केलं.
सुनील बर्वे यांची आई मुंबईमधील अभि गोरेगावकर शाळेमध्ये ‘संस्कृत’ विषयाच्या शिक्षिका होत्या. त्यामुळे त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषेप्रमाणेच संस्कृत भाषेवरही प्रभुत्व आहे. आठवीत असताना रामकृष्ण मिशनतर्फे घेण्यात आलेल्या संस्कृत भाषिक वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता. यामध्ये त्यांना दुसरं पारितोषिक मिळालं, तर नववी आणि दहावी मध्ये असताना याच स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक मिळवला.
सुनील बर्वे यांना संगीताचीही चांगली जाण आहे. गोरेगावमधील सामंत गुरुजींकडे त्यांनी तबल्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतलं आहे. तबल्याचा क्लास झाल्यावर ते थांबून राहत असत कारण तबल्याच्या क्लासनंतर गाण्याचा क्लास असायचा. त्यामुळे सुनील तेव्हा त्या क्लासला तबल्याची साथ द्यायचे. घरी आल्यावर ते या गायकांच्या गाण्याची नक्कल करायचे, ते पाहून त्यांच्या आईने त्यांना गाण्याच्या क्लासला घातलं. त्यांच्या गंधर्व महाविद्यालयाच्या गायनाच्या तीन परीक्षाही झाल्या आहेत. परंतु पुढे मात्र दहावीच्या अभ्यासामुळे त्यांना गाणं सोडावं लागलं. ( Lesser Known story of Sunil Barve)
खरंतर कलाक्षेत्रात येण्याचा सुनील बर्वे यांचा कुठलाही विचार नव्हता. बारावीच्या सुट्टीमध्ये बहिणीच्या आग्रहाखातर ते एका थिएटरच्या वर्कशॉपमध्ये दाखल झाले. तिथे त्यांची ओळख संजय क्षेमकल्याणी यांच्याशी झाली. त्यांनी सुनील यांना सांगितलं, “विनय आपटे एक प्रोफेशनल नाटक करतायत. त्यांना नायक म्हणून गाण्याची उत्तम जाण असणारा एक तरुण कॉलेजवयीन मुलगा नायक म्हणून हवा आहे, तर तू ते नाटक करशील का?”
सुनीलजींना खरंतर नाटकाशी दुरान्वयेही संबंध नव्हता, पण तरीही ते विनय आपटे यांच्याकडे गेले. तिथे आनंद मोडक यांना त्यांनी गाणं म्हणून दाखवलं आणि त्यांची निवड झाली. इथूनच त्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरु झाला. कुटुंबाकडून या क्षेत्रात येण्यासाठी विरोध अजिबात झाला नाही. परंतु ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचा सल्ला मात्र दिला होता. त्यामुळे एकीकडे नाटकात काम करत असताना सुनील यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.
कॉलेजमध्ये असतानाच सुनील प्रेमात पडले होते. ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते मुलीच्या घरी तिच्या वडिलांना भेटायला गेले. ते बिझनेसमन होते. त्यांनी सुनीलला काही वर्ष नोकरी करून बिझनेस करायचा सल्ला दिला. सुनील सहाजिकच त्यांना पसंत पडले होते त्यामुळे लगोलग त्यांचा साखरपुडाही ठरला.
साखरपुडा ठरला तेव्हा सुनील नोकरी करत नव्हते. पण साखरपुड्याच्या आठ दिवस आधी त्यांना नोकरी मिळाली. त्यामुळे घरचेही सगळे खुश झाले. यासंदर्भात बोलताना सुनीलने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, “मला नोकरी लागल्याची बातमी ऐकून घरच्यांना आनंद तर झालाच शिवाय साखरपुडा ठरला आहे तर त्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना किमान मुलगा नोकरी करतोय हे तरी सांगता येईल, या विचाराने ते सुखावले होते.” (Lesser Known story of Sunil Barve)
यु एस व्हिटॅमिन्समध्ये मेडिकल रिप्रेसेंटेटिव्ह म्हणून सुनील नोकरीवर रुजू झाले. परंतु या नोकरीत काही त्यांचं मन लागेना. अखेर त्यांनी एका महिन्यातच नोकरीचा राजीनामा दिला. ही गोष्ट ऐकून आई वडील घाबरले. “हा मुलगा असा कसा?” हा प्रश्न त्यांना पडला. एकीकडे साखरपुडा झाला होता. सुदैवाने म्हणावं अशी चांगली नोकरीही मिळाली होती. ती देखील साखरपुड्याच्या आधी. सगळं स्थिरस्थावर होत असताना सुनील यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या आई वडिलांना अजिबात पटला नाही. पण तरीही त्यांनी कोणताही आकांडतांडव न करता शांतपणे त्यांच्या या निर्णयावर नापसंती दर्शवली.
==========
हे देखील वाचा – हृता दुर्गुळे: अनन्या साकारताना शिकले ‘अशा’ गोष्टी ज्याची कधी कल्पनाच केली नव्हती..
==========
आई वडिलांशी बोलून झाल्यावर सुनील आपल्या होणाऱ्या पत्नीच्या घरी गेले. तिथे त्यांनी तिच्या वडिलांना म्हणजेच त्यांच्या होणाऱ्या सासऱ्यांना नोकरी सोडल्याचं सांगितलं. सुनील यांनी नोकरी सोडल्याचं सांगितल्यावर त्यांचे सासरे म्हणाले, “व्हेरी गुड! आत्ता तू काहीतरी करून दाखवशील. धंद्यामध्ये वर खाली होतच असतं त्याला घाबरून जायचं नसतं. आपण चांगलं काम करत राहायचं.” (Lesser Known story of Sunil Barve)
सासऱ्यांच्या बोलण्यामुळे सुनील यांना धीर आला. ते पाठीशी उभे राहिल्यामुळे मी आयुष्यात काहीतरी करू शकलो, असं ते आवर्जून सांगतात. आयुष्यात अनेकदा योग्य वेळी निर्णय घेणं आवश्यक असतं आणि तो सुनील यांनी घेतला. त्यामुळेच आज ते यशस्वी आहेत.