‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘तो’ चित्रपट सुरेश वाडकर यांच्या आयुष्यामधली खूप मोठी चूक होती
सुरेश वाडकर (Suresh Wadkar)! संगीत क्षेत्रामधल्या नामवंत गायकांमध्ये हे नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ हिंदीच नाही तर मराठी, तामिळ, ओडिसी आणि कोकणी भाषेतही त्यांनी गाणी गायली आहेत. तसंच स्वामीनारायण संप्रदाय, वैष्णव आणि शैव संप्रदायांसह इतरही अनेक संप्रदायांसाठी त्यांनी विविध भारतीय भाषांमध्ये असंख्य भक्तिगीते गायली आहेत.
सुरेश वाडकर यांचं बालपण कोल्हापूरच्या गिरणगावामधल्या चाळीमध्ये गेलं आहे. मधुर आवाज आणि सुरांची जाण ही त्यांना मिळालेली ईश्वरी देणगी होती. त्यांच्या चाळीत सर्वजण भजनप्रेमी. त्यामुळे भजनाचे अनेक कार्यक्रम तिथे व्हायचे. अशा संगीतमय वातावरणात सुरेशजींमध्ये उपजतच असणारं सुरांचं ज्ञान वाढतच गेलं. गिरणगावमधल्या चाळीशी त्यांचे भावबंध जोडलेले आहेत. तिथल्या अनेक आठवणी ते आवर्जून सांगतात. चाळीतली घरं अगदी एकमेकांना लागून असतात. त्यामुळे तिथे अनेक किस्सेही घडत असतात. असाच एक किस्सा सुरेशजींनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितला होता.
लहानपणी त्यांना क्रिकेटचा खूप नाद होता. त्यामुळे शाळेतून आल्यावर ते क्रिकेट खेळायचे. एकदा ते असंच क्रिकेट खेळत होते. बॅटिंग करताना त्यांनी जोरात मारलेला बॉल चाळीत राहणाऱ्या ‘तानू’ मावशींच्या घराच्या खिडकीची काच फोडून थेट किचनमधल्या फळीवरच्या गोडंतेलाच्या बाटलीवर आदळला आणि बाटली फुटली. तानू मावशी तावातावाने त्यांच्या घरी आल्या आणि भांडायला लागल्या. नेमकं त्याच वेळी सुरेशींचे वडील कामावरून परत आले. सगळा प्रकार कळल्यावर दरवाज्यावर लटकलेला रबराचा पाईप घेऊन त्यांनी सुरेशजींना भरपूर मारलं. इतकं मारलं की, त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी रक्त आलं होतं. रात्री मात्र त्यांना जवळ घेऊन वडील भरपूर रडले. सुरेशजींची अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटत होतं.
सुरेशजींनी शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे. १९७६ साली ‘सूर-सिंगार’ स्पर्धेचे ते विजेते ठरले. या स्पर्धेचे परीक्षक होते, सुप्रसिद्ध संगीतकार जयदेव आणि रवींद्र जैन. रवींद्र जैन यांना सुरेशजींचं गाणं एवढं आवडलं की, त्यांनी ‘पहेली’ या चित्रपटात गायची संधी दिली. या चित्रपटात ‘सोना करे झिलमिल झिलमिल दृष्टी पडे टपूर तुपूर’ हे गाणं त्यांनी गायलं. यानंतर जयदेव यांनी ‘गमन’ चित्रपटातील “सीने में जलन” हे गाणं त्यांच्याकडून गाऊन घेतलं आणि त्यांचा आवाज घराघरांत पोचला. इतकंच नाही तर, दस्तुरखुद्द लता मंगेशकरही त्यांच्या आवाजाने प्रभावित झाल्या आणि त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, कल्याणजी-आनंदजी यांसारख्या संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज संगीतकारांकडे सुरेशजींची शिफारस केली. (Lesser Known story of Suresh Wadkar)
सुरेश वाडकर हे नाव बॉलिवूडच्या संगीत क्षेत्रामध्ये हळूहळू सर्वांना परिचित झालं. १९८२ साली आलेल्या राज कपूर यांच्या प्रेम रोग या चित्रपटांमध्ये त्यांना स्टारडम मिळवून दिलं. या चित्रपटामुळे त्यांच्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट मिळाला. आणि आर.के. बॅनरच्या चित्रपटांसाठी ते गाऊ लागले. त्या काळात अनेक गायक- अभिनेत्यांच्या जोड्या लोकप्रिय होत असताना सुरेशजींची जोडी विशेष अशी कुठल्याच अभिनेत्यासोबत जमली नाही, हे जरी खरं असलं तरी त्यांनी गायलेली कित्येक गाणी आजही लोकप्रिय आहेत. राम तेरी गंगा मैली, हिना, प्रेम ग्रंथ, बोल राधा बोल, विजय, परिंदा अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं. प्रिंड चित्रपटातील “तुम से मिलके” हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं.
मध्यंतरी मीडियामध्ये, सुरेशजींना माधुरी दीक्षितचं स्थळ आलं होतं, परंतु त्यावेळी त्यांनी नकार दिल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, सुरेशजी तेव्हा संगीत क्षेत्रात स्थिरस्थावर झालेले होते. त्यामुळे त्यांनी लग्न करायचं ठरवलं होतं. तर माधुरी तेव्हा चित्रपटक्षेत्रात लोकप्रिय वगैरे नव्हती पण ती उत्तम नृत्यांगना होती. त्यामुळे यांची जोडी जमेल असं मध्यस्थी करणाऱ्या वाटलं होतं. पण सुरेशजींनी मात्र माधुरीला ती बारीक असल्यामुळे नकार दिला.
सुरेशजींनी एक वेगळा प्रयोग म्हणून चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश करायचं ठरवलं. २००२ साली ‘तनमन डॉट कॉम’ नावाचा एक चित्रपट ते निर्माण करत होते. या चित्रपटातून ते त्यांच्या भाच्याला – बहिणीच्या मुलाला चित्रपटक्षेत्रात आणणार होते. परंतु काही कारणांनी यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. ही आयुष्यातली खूप मोठी चूक असल्याचं सुरेशजी सांगतात. यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सोसावं लागलं आणि वैयक्तिक संबंधही खराब झाले. या गोष्टीबद्दल ते नेहमी खेद व्यक्त करतात. (Lesser Known story of Suresh Wadkar)
===========
हे देखील वाचा – काजोल: गौतम राजाध्यक्षांचं ‘कुरूप वेडे पिल्लू’
==========
सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, इंडियन आयडॉल फेम राहुल वैद्य हे सुरेशजींचेच शिष्य आहेत. अजिवासन म्युझिक अकॅडमी ही सुरेशजींची स्वतःची म्युझिक अकॅडमी असून त्याची न्यू जर्सी/न्यूयॉर्क सिटी परिसरात प्रशिक्षण संस्था देखील आहे. एक उत्तम गायक आणि शिक्षक असणाऱ्या या थोर गायकाचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
– भाग्यश्री बर्वे