‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘या’ महान व्यक्तीच्या सल्ल्यामुळे राहुल देशपांडे ‘सी ए’ चा अभ्यास सोडून गाण्याकडे वळले
राहुल देशपांडे (Rahul Deshpande)! खरंतर त्यांची ओळख पंडित वसंतराव देशपांडे यांचा नातू अशीच आहे. अनेकजण त्यांच्यामध्ये पंडितजींना बघतात, पण तरीही राहुल देशपांडे म्हणून त्यांचं स्वतःचं असं वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांची गायन शैलीही स्वतंत्र आहे. अलीकडेच आलेल्या मी वसंतराव या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला आहे.
१० ऑक्टोबर १९७९ रोजी पुण्यनगरीत जन्मलेल्या राहुल यांचं शालेय शिक्षण कर्नाटक हायस्कुलमध्ये (इंग्लिश मिडीयम) झालं आहे. राहुल अवघ्या ६ वर्षांचे असतानपासून पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे शास्त्रीय संगीताच्या क्लासला जात असत. त्यावेळी ते मुलींच्या बॅचला बसत असत कारण वय खूप लहान असल्यामुळे त्यांचा आवाज फुटला नव्हता.
एका मुलाखतीत बोलताना राहुल यांनी सांगितलं होतं, त्यांच्या आजोबांची अशी इच्छा होती की, त्यांनी गायनाचे प्राथमिक धडे पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे घ्यावेत. ते नेहमी म्हणायचे, “राहुलचं प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्याला गायनाचे पुढचे धडे मी स्वतः देईन. मग आपण असा एक कार्यक्रम करू. ज्यामध्ये आम्ही दोघेही गाऊ. त्या कार्यक्रमात लोकांना तरुणपणीच्या वसंतरावांचं गायन ऐकायला मिळेल.” परंतु दुर्दैवाने राहुल खूप लहान असतानाच ते गेले.
पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे खरंतर लहान मुलांना शिकवत नसत. परंतु वसंतरावांची इच्छा म्हटल्यावर त्यांनी आनंदाने राहुलला शिकवायची तयारी दाखवली. पण राहुल यांना गाणं शिकण्यात अजिबात रस नव्हता. त्यांना तबला मात्र प्रचंड आवडायचा. त्यामुळे त्यांनी तबल्याचा क्लासही लावला. परंतु ते दुसरीत असताना त्यांच्या वर्गशिक्षकांनी त्यांच्या पालकांना सांगितलं, “हा मुलगा सतत बाकावर तबला वाजवत बसतो. यामुळे बाकीचा वर्ग डिस्टर्ब होतो. त्यामुळे त्याचा एकतर तबल्याचा क्लास ठेवा नाहीतर शाळा.” झालं तिथेच राहुल यांचा तबल्याचा क्लास सुटला. परंतु गाण्याचा क्लास मात्र चालू होता. (Childhood stories of Rahul Deshpande)
साधारण सहा वर्ष गाण्याचा क्लास चालू होता. परंतु नंतर मात्र राहुल यांनी तो क्लास सोडला कारण त्यांचं मन गाण्यात रमतच नव्हतं. त्यानंतर एक दिवस घरी एकटं असताना घरातल्या कुमार गंधर्वांच्या भजनाच्या नवीन कॅसेट्सवर त्यांचं लक्ष गेलं. गाण्याचा क्लास आवडत नसला तरी त्यांना गाणं ऐकायची मात्र प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी कुमार गंधर्वांच्या इंदोरी भजनाच्या कॅसेट लावल्या. या कॅसेट्समधील गाणी ऐकून खास करून त्यामधील “सुनता है गुरुग्यानी…” हे गाणं ऐकल्यावर मात्र त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल झाला. पंडित कुमार गंधर्वांच्या सुरांनी ते भारावून गेले. अवघ्या चार /पाच दिवसात त्यांनी दोन्ही कॅसेट्स तोंडपाठ केल्या. या प्रसंगानंतर त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला आणि राहुल यांनी गाणं शिकण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं.
राहुल यांच्या गाण्यामध्ये अनेकदा कुमारजींच्या गाण्याचा भास होतो. यासंदर्भातील एक किस्सा एका मुलाखतीदरम्यान राहुल यांनी सांगितला होता. नागपूरला त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. नागपूर म्हणजे वसंतरावांचं जन्मस्थान. त्यामुळे वसंतरावांच्या नातवाचा कार्यक्रम म्हटल्यावर श्रोते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु कार्यक्रमानंतर मात्र तिथले प्रेक्षक नाराज झाले.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन झळकली, “नातू वसंतरावांचा, बाज मात्र कुमारांचा..” पंडित वसंतराव देशपांडेंचा नातू म्हटल्यावर राहुल यांच्या गाण्यावर वसंतरावांची छाप असेल अशी श्रोत्यांची अपेक्षा होती. परंतु तसं झालं नाही. त्यामुळे कार्यक्रम संपल्यावर ते नाराज झाले. (Journey of Rahul Deshpande)
राहुल यांना शास्त्रीय संगीतासोबतच पॉप गाण्यांचीही आवड आहे. ते अभ्यासातही हुशार होते. बारवीनंतर ते सी ए करत होते. त्यातच एक दिवस राहुल भाईंच्या (पु. ल. देशपांडे) घरी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. त्यावेळी भाई त्यांना म्हणाले, “वकील, सी ए, डॉक्टर, इंजिनिअर यांच्या पाट्या तुला गल्लोगल्ली दिसतील. त्यासाठी अख्खी दुनिया पडली आहे. तुझा जन्म फक्त गाण्यासाठीच झाला आहे. त्यामुळे तू गाणं सोडू नकोस.” यानंतर राहुल यांनी घरी आई, वडील व आजीशी चर्चा करून सी ए सोडण्याचा निर्णय घेतला.
=======
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध गायक मुकेश यांनी एका टांगेवाल्यासाठी गायली गाणी कारण..
=======
राहुल यांचे आजोबा वसंतराव देशपांडे संगीतातले सर्व प्रकार उत्तमपणे गात असत. म्हणूनच त्यांनी वसंतोत्सव सुरु केला. एकप्रकारे या कार्यक्रमातून वसंतरावांच्या स्मृतींना अभिवादन केलं जातं. एकेकाळी गाणं शिकायचा कंटाळा करणाऱ्या राहुल देशपांडे (Rahul Deshpande) हे नाव आज शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रामध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं. नुकताच त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी (मी वसंतराव) राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्थात यामागे त्यांची प्रचंड मेहनत आणि साधना आहे, हे देखील तितकंच खरं आहे.