विनोदाचा गोलमाल “लोच्या झाला रे”!
तुफान विनोदी चित्रपटाच्या धाटणीतला असा हा ‘लोच्या झाला रे’. चित्रपटाचे ट्रेलर ज्यांनी पाहिलं असेल त्यांना या विनोदी मेजवानीचा अंदाज नक्कीच आला असेल. एखाद्या ‘क्ष’ व्यक्तीची होणारी फजिती सर्वांनाच पाहायला आवडते.
लंडनसारख्या निसर्गरम्य ठिकाणी चित्रित झालेला हा सिनेमा मनाला आनंद देणारा आहे. कारण, तो आपल्याला पोट धरुन हसायला भाग पाडतो. ही गोष्ट मुख्यतः चार पात्रांची आहे. आदी (अंकुश चौधरी), आदीचा मित्र मानव (सिद्धार्थ जाधव) त्याची बायको डिंपल (वैदेही परशुरामी) आणि आदीचा काका (सयाजी शिंदे).
आदी लंडनला स्थायिक आहे. त्याचा उदरनिर्वाह त्याला त्यांच्या काकांकडून मिळणाऱ्या ‘पॉकेट मनी’मधून होतोय. आपल्याला मिळणारी पॉकेट मनी वाढावी म्हणून तो काकांना स्वतःच लग्न झाल्याचं खोटं सांगतो. कारण, तशी अटच काकांनी ठेवलेली असते. पुजा नामक एका मुलीशी त्याचं लग्न झालं आहे; हे खरं समजून काका आदीला पॉकेट मनी वाढवून देतात. पण, शिताफीने काहीबाई कारणं आणि खोट सांगून आदीने त्यांच्या काकांपासून पुजाचा फोटोही लपवलेला आहे.
आता पुजा कशी दिसते हे काकांना ठाऊक नसतं. काकांना आपल्या पुतण्याला आणि सुनेला भेटण्याची खूप इच्छा असते. पण, कामाच्या व्यग्रतेमुळे त्यांना भारतातून लंडनला येता येत नसतं. पण, अचानक एके दिवशी लंडनला आदीला भेटण्यासाठी भारतातून त्याचे काका येतात.
आता काका घरी येतायेत म्हंटल्यावर पुजाची आणि त्यांची भेट करुन द्यावीच लागणार. त्यामुळे आता आदी एक खोटं लपवण्यासाठी दहा खोटं बोलतो. हा खोट्याचा सिलसिला पुढे कथानकात धमाल आणतो. जे खरंखूर जोडपं आहे अर्थात डिंपल आणि मानव यात आदीची मदत करतात. ते सुद्धा या खोट्याच्या विहिरीत गोता मारतात. पण, आता हा रचलेला खोट्याचा डोंगर का? कधी? कसा? कोसळतो; हे पाहणं विनोदी आहे. सिनेमाच्या पटकथेचा वेग आणि संकलकाची त्यावर शिताफीने चाललेली कात्री; प्रेक्षकांना सिनेमात गुंतवून ठेवते.
तद्दन व्यावसायीक असा हा सिनेमा निखळ हसवत मनोरंजन करतो. विशेष म्हणजे आता मराठी सिनेसृष्टीला अशा सिनेमांची गरज आहे; जेणेकरून प्रेक्षक आनंद लुटण्यासाठी सिनेमागृहात येतील. हा सिनेमा प्रेक्षकांना खळखळून हसवतो. यातच त्याचं यश मानायला हवं.
बाकी सिनेमातील घटनांची, प्रसंगांची तर्कशून्य मांडणी किंवा होणाऱ्या ‘गोलमाल’कडे दुर्लक्ष केलेलंच बरं. सिनेमात फार काही सामाजिक संदेश किंवा उपदेश नाही. सरळ सोपी गंमतीशीर गोष्ट दिग्दर्शक परितोष पेंडर आणि रवी अधिकारी यांनी ‘लोच्या झाला रे’ सिनेमात मांडली आहे.
अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे यांनी पडद्यावर अक्षरशः विनोदाचा कल्ला केला आहे. ज्येष्ठ लेखक सुरेश जयराम यांच्या ‘पती सगळे उचापती’ या मराठी नाटकावर हा सिनेमा आधारित आहे. याच नाटकावरुन काही वर्षांपूर्वी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ हा हिंदी सिनेमा देखील आला होता. लोच्या झाला रे’ हा सिनेमा याच श्रेणीतील आहे.
मुळात ही संकल्पना केवळ हिंदी, किंवा मराठीच कलाकृतीच्या रुपात प्रेक्षकांमध्ये यापूर्वी आलेली नसून; ती तमिळ, कन्नडा आणि इंग्रजी भाषेतही निर्मिली गेली आहे. पण, यावेळी मूळ मराठी नाटकांच्या कथानकावर मराठीत सिनेमासाठी संवाद लेखन करताना ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम’ प्रसाद खांडेकर याने कमाल केली आहे. संवादातील हलकाफुलका साज आणि शाब्दिक प्रासंगिक विनोद त्यानं त्याच्या लेखणीत उतरवले आहेत. ज्यांना कलाकार मंडळींनी देखील पडद्यावर योग्य न्याय दिला आहे. शाब्दिक कोटी संवादात त्याने उत्तमरीत्या जुळवून आणला आहे. परिणामी सिनेमा आपलं मनोरंजन करण्यात अधिक सक्षम होतो.
अंकुश चौधरी या कलंदर अभिनेत्यानं सिनेमात फुल्ल टु रंगत आणली आहे. कथानकात होणाऱ्या ‘गोलमाल’चं मुळ अकुंश साकारत असेलला ‘आदी’ आहे. परिणामी सुरुवातीपासून कथानकाचे धागेदोरे त्याच्याच हातात आहेत. इतक्या वर्षांचा त्याचा अभिनय क्षेत्रातील अनुभव आणि स्वतःची अशी खास विनोदशैली ‘आदी’ ही भूमिका अधोरेखित करतात. अशा प्रकारची भूमिका अंकुशनं त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या वर्षांमधील अनेक सिनेमांमध्ये साकारली आहे. पण, जुना उत्साह आणि सहजता आजही त्यांच्या अभिनयात दिसते.
सिद्धार्थ जाधवनं नेहमीप्रमाणे यावेळीही विनोदाचं टायमिंग अफलातून साधलं आहे. सिद्धार्थनं स्वतःची अशी एक वेगळी शैली गेल्या काही वर्षांमध्ये विकसित केली आहे. जी केवळ तोच साकारू शकतो आणि त्यांच्या अंगीच ती शोभून दिसते. तो सिनेमात किंवा कोणत्याही कलाकृतीत हास्याचे रंग भरते.
=====
हे देखील वाचा: चिन्मय मांडलेकर: मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलावंत
=====
वैहेही परशुरामीनं मिळालेल्या संधीचं सोनं केलंय, असं म्हणता येईल. तिचं काम अत्यंत सहज आणि नितळ आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘झोंबिवली’ सिनेमांच्या विरुद्ध यावेळी तिनं ‘डिंपल’ ही भूमिका साकारली आहे. अभिनय कारकिर्दीच्या बाबतीत बोलायचं झालं तर; वैदेही लंबी रेस का घोडा आहे; असं म्हणायला हरकत नाही. कारण, याहूनही अधिक चांगल्या कामाची अपेक्षा आपण तिच्याकडून नक्कीच ठेवू शकतो.
सयाजी शिंदे यांनीही त्यांच्या नावाला आणि अनुभवाला साजेचे काम सिनेमात केले. एकंदरच हे सर्व कलाकार सिनेमात अक्षरशः धमाल करतात; तो धमाल कारभार आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटवतो. त्यामुळे नक्कीच हा ‘लोच्या’ आपण सिनेमागृहात जाऊन नक्कीच अनुभवायला हवा. पण, ज्यांना निखळ मनोरंजन हवंय त्यांनीच हा सिनेमा पाहावा. वास्तविक, समांतर धाटणीची सत्यात पाहणाऱ्या प्रेक्षकांना हा सिनेमा पचणार नाही.
सिनेमा : लोच्या झाला रे
निर्मिती : नवीन चंद्रा, नितीन केनी
दिग्दर्शक : परितोष पेंटर, रवी अधिकारी
संवाद : प्रसाद खांडेकर
कलाकार : अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, सयाजी शिंदे
छायांकन : संजय मेमाणे
संकलन : निलेश गावंडे
दर्जा : तीन स्टार
– आरमार