Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

माध्यमांतर – नाटक ते सिनेमा
नटसम्राट
कुसुमाग्रज यांची गाजलेली नाट्यकृती म्हणजे ‘नटसम्राट ‘. यातील ‘आप्पासाहेब बेलवलकर’ ही व्यक्तिरेखा डॉक्टर श्रीराम लागू यांनी साकारली होती आणि ‘कावेरी’ ही भूमिका केली होती शांता जोग यांनी. पुढे बेलवलकरांची भूमिका अनेकांनी केली. सतीश दुभाषी, यशवंत दत्त, उपेंद्र दाते, दत्ता भट यांनी सुद्धा ही व्यक्तिरेखा साकारली होती. गेल्या वर्षी जेव्हा हे नाटक पुन्हा रंगमंचावर आले, तेव्हा मोहन जोशी आणि रोहिणी हट्टंगडी यांनी प्रमुख भूमिका केल्या.
ज्या वेळी या नाटकावर चित्रपट निर्माण झाला, तेव्हा नाना पाटेकर आणि मेधा मांजरेकर यांनी प्रमुख भूमिका केल्या. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अजित परब याने या चित्रपटाला संगीत दिले होते.

टाइम प्लिज
क्षितिज पटवर्धन लिखित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. त्यात उमेश कामत, प्रिया बापट, हेमंत ढोमे आणि ऊर्जा देशपांडे यांच्या भूमिका होत्या.
पुढे तेच कथानक घेऊन ‘टाइम प्लिज – गोष्ट लग्नानंतरची’ हा चित्रपट आला. त्यात उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्याच प्रमुख भूमिका होत्या. पण यात सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर हे कलाकार होते. या चित्रपटाला ऋषिकेश कामेरकर याचे संगीत होते. ‘नवा गडी अन राज्य नवं’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते.
उत्तरायण
जयवंत दळवी यांनी लिहिलेले ‘दुर्गी’ नाटक रंगभूमीवर लोकप्रिय झाले होते.
ते कथानक घेऊन बिपीन नाडकर्णी यांनीं ‘उत्तरायण’ या चित्रपटाची निर्मिती केली. शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय मराठी चित्रपट हा पुरस्कार देखील मिळाला होता. यातील ‘धुंद होते शब्द सारे’ हे बेला शेंडे हिने गायलेले गीत विशेष लोकप्रिय झाले. अमर्त्य राहुत या संगीतकाराने हे गीत स्वरबद्ध केले असून कौस्तुभ सावरकर याने ते लिहिले होते.

चांदणे शिंपीत जा
आता थोडेसे जुन्या काळात जाऊया. मधुसूदन कालेलकर लिखित ‘चांदणे शिंपीत जा’ हे नाटक रंगभूमीवर आले. पुढे याच शीर्षकाचा चित्रपट निर्माण झाला. चित्रपटात आशा काळे यांची भूमिका होती. त्यांच्या जोडीला चित्रपटात मधुकर तोरडमल, रवींद्र महाजनी, महेश कोठारे, अरुण सरनाईक, आशालता वाबगावकर अशी कलाकारांची फौज होती. चित्रपटाचे दिग्दर्शन कमलाकर तोरणे यांचे होते. ‘हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाशवेडी ओल्या दवात न्हाली’ हे अनुराधा पौडवाल यांनी गायलेले गीत विशेष लोकप्रिय झाले.
पुढचं पाऊल
जयवंत दळवी यांनी ‘हुंडाबळी’ समस्येवर आधारित ‘पर्याय’ हे नाटक लिहिले. हेच कथानक घेऊन ‘पुढचं पाऊल’ हा चित्रपट निर्माण झाला. सुधीर मोघे यांनी या चित्रपटासाठी गीते लिहिली होती. डॉक्टर मानसी मागीकर, अर्चना पाटकर, यशवंत दत्त, सुमंत मस्तकार यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. सुधीर फडके यांचे संगीत या चित्रपटाला लाभले. ‘एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी’ हे आशा भोसले यांच्या स्वरातील गीत विशेष गाजले.
गणेश आचवल