‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
जादू सी.आय.डी ची…
अजरामर गाण्यांनी सजलेला सीआयडी हा चित्रपट 65 व्या वर्षात पदार्पण करतोय…पहिला भारतीय क्राईम थ्रिलर चित्रपट असलेल्या सीआयडीनं प्रेक्षकांना अक्षरश मोहीनी घातली होती…
सी आय डी ची गाथा….
कहीं पे निगाहे कही पे निशाना, लेके पहला पहला प्यार, जाता कहा है दिवाने, ऑंखो ही ऑंखो मै इशारा हो गया….या अजरामर गाण्यांची देणगी देणारा…देवआनंद, वहिदा रहेमान, शकीला यांच्या अभिनयानं सजलेला….आणि गुरुदत्त यांची निर्मिती असलेला सी.आय.डी चित्रपट 65 व्या वर्षात पदार्पण करतोय. भारतीय चित्रपट सृष्टीत पहिला क्राईम थ्रिलर म्हणून सीआयडीचा उल्लेख होतो. याशिवाय या चित्रपटाला एका नाजूक प्रेमाची किनारही लाभली. याच चित्रपटापासून गुरुदत्त आणि वहिदा रहेमान यांच्या अबोल प्रेमाची सुरुवात झाल्याचे बोलले जाते….एकूण काय आज एवढ्या वर्षानंतरही हा कृष्णधवल चित्रपट पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो…यातील गाणी कितीही वेळा ऐकली तरी ती कंटाळवाणी वाटत नाहीत…अर्थात सीआयडी नं शंभर वर्ष पूर्ण केली तरी या गाण्याची आणि चित्रपटाची जादू कायम रहाणार आहे.
30 जुलै 1956 रोजी सीआयडी चित्रपट प्रदर्शित झाला. मुंबईतल्या सिनेमागृहावर याचे मोठमोठे पोस्टर लागले. त्यात देवआनंद, शकीरा यांच्यासह वहिदा रहेमान यांचा समावेश होता. वहिदा यांचा हा पहिलाच चित्रपट. त्यात पोस्टरवर त्यांचे डोळे ज्याप्रमाणे दाखवण्यात आले, त्यावरुन वहिदाच या चित्रपटात व्हिलन आहे की काय अशी चर्चा होती. नवोदीत असलेल्या अभिनेत्रीनं थेट व्हिनलची भूमिका करावी ही तेव्हा मोठी गोष्ट झाली. याशिवाय मेहमूद आणि जॉनी वॉकर, कुम कुम यांचीही छायाचित्र पोस्टरवर झळकली होती. यात महत्त्वाचे म्हणजे गुरुदत्त यांचे नाव. गुरुदत्त या चित्रपटाचे निर्माते. त्याकाळी गुरुदत्त यांचा चित्रपटावर रसिकांच्या उड्या पडत. त्यात ओंकर प्रसाद नय्यर…अर्थात ओपी नय्यर यांचं सदाबहार संगित या चित्रपटाला लाभलं होतं. मजरूह सुलतानपुरी, जान निसार अख्तर यांच्या गाण्यांना ओ. पी. नय्यर यांचे संगीत आधीच प्रेक्षकापर्यंत पोहचलं होतं. त्यामुळे या क्राईम थ्रिलर चित्रपटाला पहाण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती.
एका वृत्तपत्राच्या संपादकाची हत्या….त्या खुनाचा शोध घेणारा इंस्पेक्टर शेखर…त्याची प्रेयसी रेखा….आणि कामिनी ही गुढ व्यक्तिरेखा….ही या चित्रपटाची स्टोरी लाईन…प्रेक्षकांना या कथेनं आपल्यात गुंतवून घेतलं. आणि त्यातील गाण्यात हरवून टाकलं…त्यात वहिदा रेहमान यांचा हा पहिलाच चित्रपट. गुरुदत्त यांनी वहिदा रहेमान यांचा तेलगू चित्रपट बघितला होता. त्यातून त्यांनी वहिदाला हिंदीमध्ये आणलं. त्यांच्या बहुचर्चित प्यासा या चित्रपटात वहिदा या महत्त्वपूर्ण भूमिकेत होत्या…मात्र त्याआधी सीआयडीमध्ये घेऊन गुरुदत्त यांनी त्यांच्या अभिनयाची परीक्षा बघितल्याची चर्चा होती. गुरुदत्त यांच्या पत्नी गीता दत्त यांनी या चित्रपटातील बहुतांशी गाणी गायली आहेत. नवोदीत अभिनेत्रीला गुरुदत्त देत असलेले महत्त्व त्यांना खटकले होते. पुढे सीआयडी तील थ्रिलर आणि सस्पेंन्स दुर्दैवानं या गुरुदत्त आणि गीता दत्त यांच्या नात्यासोबत कायम राहीला.
गुरुदत्त आणि देवआनंद हे खास दोस्त…आपल्या मित्राला गुरुदत्त यांनी संधी दिली…मुंबईच्या फेमस स्टुडीओमध्ये गुरुददत्त, ओपी नय्यर, मजरूह सुलतानपुरी यांनी काही तासाभरात गाणी तयार केली होती. त्यात प्रसिद्ध हार्मोनोयम वादक मिलन गुप्ता यांनी हार्मोनियमची साथ दिली. अभिनेता-चित्रपट निर्माते टिन्नू आनंद यांचे वडील इंद्रराज आनंद हे या चित्रपटाचे पटकथा लेखक. या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन जोहरा सहगल यांनी केले. राज खोसला दिग्दर्शित सीआयडी एका भव्य सोहळ्यात प्रदर्शित झाला…या चित्रपटाच्या यशानंतर गुरु दत्तने राज खोसला यांना कारची भेट दिली.
सीआयडीच्या यशात शमशाद बेगम, महमंद रफी, गिता दत्त, आशा भोसले या गायकांच्या स्वर्गीय गळ्याचाही तेवढात वाटा आहे, असं देवआनंद हे नेहमी सांगायचे. सुमधूर गाण्यांनी नटलेल्या सीआयडीतील गाण्यांची जादू, रसिकांच्या मनावर अशीच अबाधिक राहणार हे नक्की…