मुक्तनाट्याचे शिल्पकार शाहीर साबळे
३ सप्टेंबर १९२३. साता-यातील पसरणी गावच्या लक्ष्मीबाईंनी कृष्णाष्टमीच्या मुहुर्तावर पुत्ररत्नाला जन्म दिला. कृष्णाचा जन्म कोठडीत तर लक्ष्मीबाईंच्या सुपुत्राचा जन्म गोठ्यात झाला. या साधर्म्यामुळे या मुलाचं नाव ठेवलं गेलं कृष्णराव साबळे. महाराष्ट्र शाहीर म्हणून ज्यांना अलम दुनियेने ओळखलं तेच हे शाहीर साबळे. त्यांचा आज जन्मदिन.
पसरणी गावात लहानाचं मोठं होताना शाहीरांच्या घरची परिस्थिती बेताची होती. मुलाचं शिक्षण व्यवस्थित व्हावं या हेतूने त्यांच्या आईंनी शाहीरांना आजोळी अमळनेर येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. साधारण इयत्ता तिसरीत असताना आपला आवाज चांगला आहे याची शाहीरांना जाणीव झाली. त्यादरम्यान सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांच्यासमोर गाणं सादर करण्याची संधी शाहीरांना मिळाली. हिराबाईंनी त्यांचं खूप कौतुक केलं पण मुलगा शिक्षणाऐवजी गाण्यात रमेल या भीतीनं त्यांच्या आजीने त्यांना परत आपल्या आईबाबांकडे पाठवून दिलं. या गडबडीत शाहीरांची सातवीची परीक्षा हुकली.
पुढे शाहीरांनी लोककलेचा वसा स्वीकारला. शाहीर साबळे यांच्या जय जय महाराष्ट्र माझा, विंचु चावला या गीतांची मोहिनी आजही आपल्याला जाणवते. पण याचसोबत नाट्यकलेतील त्यांच्या योगदानाची दखलही तितकीच महत्त्वाची आहे.
‘यमराज्यात एक रात्र’ ‘आबुरावाचं लगीन’, ‘आंधळं दळतंय’, ‘ग्यानबाची मेख’, ‘बापाचा बाप’ या त्यांच्या मुक्तनाट्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. मुळात लोकनाट्य या शब्दाऐवजी ‘मुक्तनाट्य’ हा शब्दप्रयोगही शाहीर साबळे यांनी मराठी रंगभूमीला दिला. मुक्तनाट्य म्हणजे नाटकासारखा कोणताही सेट किंवा प्रॉपर्टी न वापरता सादर केलेलं नाटक. तमाशा प्रकारात जसं केवळ हातवा-यातून हे पहा जंगल, ही पहा नदी, हा पहा महाल अशी वातावरणनिर्मिती कलाकार करतात,तसंच मुक्तनाट्यातही शब्दांच्या माध्यमातून तो अनुभव प्रेक्षकांना दिला जातो. शाहीर साबळे यांच्या मुक्तनाट्यांनी समाजातील दु:ख वेदना यांना रंगमंचावर वाट करुन दिली.
‘आंधळं दळतंय” नाटकाने तर शिवसेना या पक्षाच्या विस्ताराची भूमिका तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
‘यमराज्यातील एक रात्र’ इतकं गाजलं की त्या काळी या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाची एक सीट लता मंगेशकर यांच्यासाठी राखीव असायची. त्यांचं रेकॉर्डींग संपलं की त्या असतील तिथून येऊन हे मुक्तनाट्य अनुभवायच्या.
शाहीरांनी मुक्तनाट्याच्या माध्यमातून पांढरपेशा समाजाला लोकनाट्याकडे वळवण्याचं बहुमोल काम केलं.त्यांच्या डफासोबत कडाडणा-या शाहीरी कवनांइतकंच हे कार्यही मोठं आहे. शाहीरांच्या जन्मदिनी त्यांना मानाचा मुजरा!