गीतांमधूनही महाराष्ट्राची गौरवगाथा
संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासूनच महाराष्ट्राची गौरव गाथा संगीताच्या रूपाने उलगडण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील शाहिरांनी, गीतकारांनी, संगीतकारांनी आपल्या स्वतःच्या शैलीत महाराष्ट्राचे वर्णन केले आहे. संयुक्त महाराष्ट्राचे पोवाडे असतील किंवा मग अगदी अलीकडे भाडीपाच्या माध्यमातून आलेलं महाराष्ट्रदेशासारखं एखादं गाण असेल या प्रत्येक माध्यमातून समृद्ध आणि वैविध्यपूर्ण महाराष्ट्राचेच दर्शन आपल्याला घडत आले आहे. याच गीतपरंपरेचा मागोवा
‘महाराष्ट्र’ हे नाव एक राज्य म्हणून उच्चारतानाच इथल्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडते. आज वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल आहे. साहित्य, कला, क्रीडा, संगीत, शिक्षण, व्यवसाय सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला एक विशिष्ट स्थान आहे. विविध कलाकारांनीसुद्धा या महाराष्ट्राच वर्णन आपल्या लेखनामध्ये, आपल्या गीतांमध्ये, कवितांमध्ये केलेलं आहे. कदाचित पारंपारिक साहित्यामध्ये एखाद्या राज्याबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणावर खचितच लिहिलेले असेल.
जय महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या गाऊ गाना।
गाऊ उंचावूनी माना। घेऊ तानावर ताना॥
यासारख्या गीतामधून संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याला खऱ्या अर्थाने बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा परिणाम अधिकाधिक लोकांमध्ये ही चळवळ पोचण्यासाठी नक्कीच झाला.
अण्णाभाऊ साठे, गवाणकर, अमर शेख या शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. आपल्या लेखणीतून आणि पोवाड्यांमधुन त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या सत्य परिस्थितीचे वर्णन केले आणि संपूर्ण महाराष्ट्राला साद घातली.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अमर शेखांनी मांडलेला ‘जागा मराठा आम जमाना बदलेगा’ हा पोवाडा आजही त्या परिस्थितीचे वर्णन करतो.याचबरोबर ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय सरकारा खुशाल कोंबडं झाकून धरा’ हा गोंधळसुद्धा तितकाच त्याकाळात गाजला होता.
याचबरोबर या काळामध्ये शाहिरी, लोकनाटय़े, पोवाडे, लावणी, कवने, गीते यांतूनही महाराष्ट्राची गौरवगाथा आणि त्यावेळेची परिस्थिती मांडली गेली. माझी मैना गावाकडं राहिली ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील मुंबईसाठी लिहिलेली प्रसिद्ध लावणी हे त्यातीलच उदाहरण.
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर त्यावेळी बाळ कुडतरकर आकाशवाणीवर कार्यक्रम अधिकारी होते. पोवाडय़ामध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचा उल्लेख आधीच नको अशा सरकारच्या सूचना होत्या. पण त्या सूचना शाहीर साबळेंनी जुमानल्या नाहीत आणि आत्माराम पाटलांचा पोवाडा त्यांनी सादर केला, ज्यामध्ये महाराष्ट्राचा पूर्ण उल्लेख होता.
यापुढेही महाराष्ट्राची अस्मिता गाण्यांमधून आणि कवितांमधून मांडली गेली. १९६० मध्ये राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीते लिहिली त्यांपैकी एक म्हणजे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे गीत घराघरामध्ये पोचले. आजही महाराष्ट्र गीत म्हणून घराघरात हे गीत लोकांच्या तोंडी आहे. यातीलच दुसरे गीत ‘महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान’ हे गीतसुद्धा खूपच गाजले.
राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज हे आपल्या काव्यात प्रमाण घ्यावा म्हणताना हा देश दगडासारखा कणखर, फुलासारखा कोमल, करवंदीसारखा काटेरी आणि बकुळप्राजक्तांनी फुललेला आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या “महाराष्ट्र गीतात’ बहु असोत सुंदर असं वर्णन ते करतात. या कवितेत येथील संपन्न भूमीचे दर्शन घडते.
‘महाराष्ट्र लक्ष्मी’ ही विनायकांची कविता. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या विविध गौरवशाली बाबी मांडल्या आहेत.महाराष्ट्राचे गुणगान करताना ते म्हणतात,
महाराष्ट्र लक्ष्मी माते जगी धन्य वाटे।
यशोगीत तिचे गाता मनी हर्ष दाटे।।
गायक संगीतकार अवधूत गुप्ते याने जय जय महाराष्ट्र माझा हे गीत स्वतःच्या शैलीमध्ये काही वर्षांपूर्वी पुन्हा प्रसिद्ध केले होते. याचबरोबर भाडीपाच्या माध्यमातून समृद्ध महाराष्ट्राची परंपरा मांडण्यासाठी मिथिला पालकर हिने कपसॉंग सादर करत महाराष्ट्र देशा हा व्हिडीओ प्रस्तुत केला होता. एकंदरच साहित्य, कवितेतून आपल्याला समृद्ध महाराष्ट्राचे दर्शन नक्कीच घडते. महाराष्ट्र राज्य यासाठी नक्कीच समृद्ध आहे.
– आदित्य बिवलकर