मराठी संस्कृतीचं ‘बॉलिवूडकरण’ होतंय का?
भारतीय लोकांना सर्वात जास्त ‘क्रेझ’ कसली असेल तर ती मनोरंजनाच्या दुनियेची, खास करून बॉलिवूडची आणि सध्याच्या काळात मालिकांची. साधारणतः ८० ते ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये उत्तर भारत, पंजाब आणि काही प्रमाणात गुजरात, राजस्थानकडील संस्कृती मोठ्या प्रमाणावर दाखवली जात असे. त्यामुळे भारतभर खास करून महाराष्ट्रामध्ये त्याच संस्कृतीची पाळंमुळं रुजू लागली. पुढे बॉलिवूडमध्ये दाखविण्यात येणारी संस्कृती व्हाया हिंदी मालिका घराघरात पोचली आणि या राज्यांमधली संस्कृती ही भारतीय संस्कृतीचं ओळख बनली. (Maharashtrian culture and bollywood)
शोले मधलं “होली के दिन दिल खील जाते हैं” असो किंवा अगदी अलीकडे आलेल्या वॉर (War) मधलं “जय जय शिव शंकर, आज मूड है भयंकर” असो अगदी संपूर्ण उत्साहाने होळीच्या सणाचा जल्लोष दाखविण्यात आला आहे. पण गाण्यांमधली संस्कृती मात्र उत्तरेकडचीच!
हिंदी मालिकांमध्येही सर्व सण – समारंभ मोठ्या उत्साहात अगदी बॉलिवूड स्टाईलमध्ये साजरे करताना दाखविण्यात येतात. महाराष्ट्रातील सण समारंभाच्या परंपरेचं स्वरूप हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून फारसं अधोरेखित केलं जात नाही. याला अपवाद फक्त गणेशोत्सवाचा. हा, काही प्रमाणात मात्र मराठी मालिका मराठी संस्कृतीचं खरंखुरं दर्शन घडवताना दिसत आहेत, हे नाकारता येणार नाही.
सणांच्या उत्साहाला कायम ठेवण्यात मनोरंजनाच्या दुनियेचा मोठा वाटा आहे, हे मान्य करावंच लागेल. परंतु, यामध्ये दुर्दैवाने सणांचा मूळ उद्देश बाजूला राहून सणांचं ‘बॉलिवूडकरण’ झालं आहे आणि हे कुठंतरी खटकतंय. उदाहरण द्यायचं झालं तर, महाराष्ट्रामध्ये पूर्वी रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळले जात असत. परंतु, आता होळीच्या दिवशी रंग खेळले जातात. हा प्रभाव बॉलिवूड आणि हिंदी मालिकांचा आहे याबाबत कोणाचंही दुमत असू शकत नाही.
याचबरोबर ‘दांडिया’ हा गुजराती संस्कृतीचा भाग आहे. परंतु, नवरात्रात केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात अनेक ठिकाणी ‘दांडिया नाईट्स’ खेळल्या जातात. महाराष्ट्रातली भोंडला संस्कृती मात्र महाराष्ट्रातही अभावाने आढळते. कारण ती बॉलिवूडमध्ये दाखविण्यात येत नाही ना! (Maharashtrian culture and bollywood)
दुसरी गोष्ट आहे दहीहंडीची. मोठ मोठ्या उंचीची हंडी, त्यासाठीचे बक्षीस हा सणांपेक्षा जास्त राजकारणाचा भाग तर झालाच आहे. पण त्याहीपेक्षा जास्त त्याचं बाजारीकरण झालं आहे.
केवळ सणवारच नाहीत तर आपल्याकडच्या समारंभांमध्येही बॉलिवूडच्या ‘फॅशन’ आवर्जून ‘फॉलो’ केल्या जातात. उदा. ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील बूट चोरण्याचा प्रसंग किंवा लग्नाच्या वेळी वधू वरांना उचलून घ्यायची पद्धत महाराष्ट्रात कुठेही नव्हती. परंतु, या पद्धती महाराष्ट्रातील लग्न समारंभांमध्ये रुजू लागल्या.
अर्थात, या पद्धतींमुळे कित्येक लग्नांमध्ये वादविवाद झाले. मंगल प्रसंगी दोन कुटुंबामध्ये मस्करीची कुस्करी होणे किंवा वधू वराला उचलून घेताना होणारे अपघात या गोष्टींमुळे काही मंगल कार्यालयांमध्ये या पद्धतींवर बंदी घालण्यात आली आणि त्यासंदर्भातील नोटीसही कार्यालयांच्या भिंतीवर झळकू लागली. (Maharashtrian culture and bollywood)
महाराष्ट्रात साखरपुडाही अगदी साध्या पद्धतीने होत असे. परंतु, आता तर साखरपुडा म्हणजे लग्नासारखा एक मोठा ‘इव्हेन्ट’ असतो कारण आजकाल साखरपुडा नाही तर, सगाई किंवा एंगेजमेंट होते.
हिंदी चित्रपट आणि मालिकेमध्ये दाखविण्यात येणारा ‘मांग भरणे’ हा प्रकार महाराष्ट्रीयन संस्कृतीचा भाग कधीच नव्हता. परंतु, साधारणतः २००० सालानंतर पुढे काही वर्ष नवीन लग्न झालेल्या मुली आवर्जून मांग भरत असत. त्यासाठी स्पेशल सिंदूरही बाजारात आले होते. नंतर मात्र कालानुरूप ही क्रेझ कमी झाली.
केवळ पद्धतीच नाही, तर कपड्यांची फॅशनही बॉलिवूड आणि मालिकांमधूनच सर्वदूर पसरत चालली आहे. लग्न अथवा रिसेप्शनच्या वेळी घागरा-चोली किंवा वनपीस नाही, तर ‘शालू’ हा महाराष्ट्रीयन परंपरेचा भाग होता. जो काही दिवसांत इतिहासजमा होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर संगीत- मेहंदी नाईट्स या गोष्टीही महाराष्ट्रीयन संस्कृतीचा भाग कधीच नव्हत्या.
खरं सांगायचं तर, एखाद्या लग्नात नऊवारी साडी नेसून नाकात नथ घातलेली मराठमोळी नववधू तेवढीच सुंदर दिसते जेवढी ती रिसेप्शनला घागरा-चोली किंवा वनपीस घालून आल्यावर दिसते. कारण पेहराव कोणताही असो नववधूच्या चेहऱ्यावरचं तेज सारखंच दिसतं. असो. (Maharashtrian culture and bollywood)
====
हे ही वाचा: मनोरंजन आणि राजकारणाची सरमिसळ होतेय का?
====
होळीला आजही प्रत्येक मराठी घरात आवर्जून पुरणपोळीचा नेवैद्य केला जातो. तसंच, गणपतीत मोदक, तर दिवाळीत फराळाला महत्व दिलं जातं. आणि हे चित्र प्रचंड सुखद आहे. परंतु, गणपतीच्या मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर, लेझीमचा आवाज आणि आरतीच्या सुरांऐवजी ‘डी जे वाले बाबू किंवा “चलती हैं क्या नौ से बारा” वर थिरकरणारी पावलं दिसली की ते मनाला खटकतं.
हा जो बदल झाला आहे तो स्वागतार्ह आहे किंवा नाही हा मुद्दा इथे गौण आहे. ‘हौसेला मोल नसतं’ या नियमानुसार ज्याला जे आवडतं आणि परवडतं तो ते करतो आणि ते करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. या लेखाचा उद्देश फक्त एवढाच आहे की, हे सर्व करताना आपली मूळ संस्कृती काही प्रमाणात का होईना, पण जपायला हवी, कारण ती जपली तरच पुढच्या पिढीला आपली संस्कृती समजेल. नाहीतर आपली संस्कृती आपल्याही नकळत विस्मृतीत जाईल. (Maharashtrian culture and bollywood)
====
हे ही वाचा: खुशखबर, नाटकं बहरली! आता हवी फक्त माध्यमांची साथ
====
बाकी समोर जे काही घडताना दिसतंय त्यावरून हा लेख लिहिला आहे. लेखाचा मुद्दा पटला तर ठीक आहे. नाही पटला तर, “बुरा ना मानो होली हैं…!”