किशोरच्या गाण्याचा भावस्पर्शी किस्सा: बडी सुनी सुनी है जिंदगी…
मैने चांद और सितारोंकी तमन्ना की थी……!
हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात ज्या मराठी संगीतकारांनी भरीव योगदान दिले आहे त्या तील एका नाव आहे एन दत्ता (N Datta). गोव्याच्या उत्तर भागातल्या पेडणे तालुक्यातील आरोबा या गावी १२ डिसेंबर १९२७ ला जन्मलेल्या एन. दत्तांच्या (मूळ नाव दत्ता नाईक) घराण्यात पूर्वापार संगीत परंपरा नव्हती, पण अगदी लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत असल्याने जात्याच संगीतात रस असणारे दत्ता नादावून गेले व आपणही संगीताच्या क्षेत्रात काम करायचे हे त्यांनी बालवयातच ठरवले.
सोळाव्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली. सुरूवातीला त्यांनी संगीतकार गुलाम हैदर यांच्यासोबत काम केल्यानंतर एस. डी. बर्मन यांचे सहाय्यक म्हणून प्रदीर्घ काळ काम केले. मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मुकेश, सुमन कल्याणपूर, हेमंतकुमार आदी गायक-गायकांनी एन. दत्ता यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अवीट गोडीची गाणी हिंदी चित्रपटांतून गायली आहेत.
एन. दत्तां (N Datta) चं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते. गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. त्या वेळी गुलाम हैदर बॉम्बे टॉकीज व फिल्मिस्तानच्या चित्रपटांचे संगीत देत असत.
फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात निघून गेले व सचिन देव फिल्मिस्तानचे संगीतकार बनले. त्यानंतर एन. दत्ता (N Datta) त्यांचे साहाय्यक बनले. सचिनदांच्या ‘अफसर’, ‘मशाल’, ‘बाजी’, ‘बहार’, ‘बुजदिल’, ‘एक नजर’, ‘नौजवान’, ‘सजा’, ‘जाल’, ‘लाल कंवर’, ‘अरमान’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुनीमजी’ ते थेट ‘देवदास’पर्यंत त्यांनी सचिनदांकडे साहाय्यक संगीतकाराची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळातल्या एस.डी. बर्मन यांच्या कित्येक चालींवर एन. दत्तांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो.
‘जाल’ (१९५२) या चित्रपटाची पाश्र्वभूमी गोव्याची असल्याने या चित्रपटाचं संगीत गोमंतकीय लोकसंगीतावर आधारित होतं. सचिनदांना एन. दत्ता (N Datta) हे गोवेकर असल्याचे माहीत असल्याने त्यांनी गोवन लोकसंगीतावर आधारित गाण्यांना चाली लावण्याचं स्वातंत्र्य एन. दत्ता यांना दिलं होतं. १९५५ साली ’मिलाप’ या सिनेमाचे संगीत स्वतंत्ररित्या देण्याची जवाबदारी त्यांच्याकडे आली. पदार्पणातच अप्रतिम कामगिरी केली. गीतकार साहिर यांच्याशी त्यांची जोडी जमली. विशेषत: चोप्रा कॅम्पसमध्ये त्यांना यामुळे प्रवेश मिळाला. बी.आर. चोप्रांचा ‘साधना’ (१९५८) हा चित्रपट एन. दत्तांच्या कारकिर्दीच्या दृष्टीने ‘टर्निग पॉइंट’ होता. या चित्रपटात त्यांनी मुजरा, कव्वाली, भक्तिगीत, प्रेमगीत व सामाजिक आशयाची गाणी देऊन आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं होतं.
लता मंगेशकर यांच्या स्वरात ‘कहोजी तुम क्या खरीदोगे’ हा साहिरच्या अभिजात काव्याने नटलेला मुजरा एन. दत्तांच्या लाजवाब प्रतिभेचा उत्तुंग आविष्कारच म्हणावा लागेल. रफीने आशा भोसलेंबरोबर गायलेलं ‘संभल ऐ दिल तडपने और तडपाने से क्या होगा’ या अवीट गोडीच्या गाण्याची खुमारी औरच होती. ‘औरत ने जनम दिया मर्दों को’ हे ठाय लयीतलं अजरामर गाणं एन. दत्तांच्या मुकुटात मानाचं शिरपेच खोवून गेलं. ’धूल का फूल’चं संगीत अप्रतिम होतं. तेरे प्यार का आसरा चाहता हू वफा कर रहा हू वफा चाहता हू, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा , झुकती घटा गाती हवा … मस्त जमून आले होते. (यातील ’लताने गायलेलं ’तू मेरे प्यार का फूल है..’ हे अंगाई गीत पुलंच अतिशय आवडीचं गीत होतं) चोप्रांच्या ‘धर्मपुत्र’ सिनेमाला त्यांचेच संगीत होते . यातील ‘मी जब भी अकेली होती हू…’ हे आशाचे गाणे कोण विसरेल? साहीर लुधियानवी सोबत सर्वात जास्त सिनेमे त्यानीच केले होते. चोप्रांचा ’गुमराह’ त्यांचाकडेच आला होता पण नेमकं त्याच वेळी ते आजारी पडले आणि संगीतकार रविकडे हा सिनेमा गेला.(N Datta)
=============
हे देखील वाचा : राजकपूर यांनी चायनाचे निमंत्रण का नाकारले?
=============
हि माया नगरी मोठी जालीम आहे इथे उगवत्या सूर्याला नमस्काराचाच प्रघात आहे त्याचा फटका एन दत्ता (N Datta) ना बसला. आजारपणा नंतर पुन्हा जेव्हा एन दत्ता संगीताच्या दुनियेत आले तेव्हा सारेच बदलले होते. सत्तर सालच्या ‘नया रास्ता’ (जान गई मै तो जान गई) नंतर त्यांच्याकडील हिंदी सिनेमाची संख्या रोडावू लागल्याने ते मराठीत आले. पण इथेही ते मोठी इनिंग नाही खेळू शकले. ३० डिसेंबर १९८७ रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
’मैने चांद और सितारोंकी तमन्ना की थी’ हे गाणे देणार्या एन दत्ता यांना त्याचीच प्रचिती आली!