गुरू ने दिला ज्ञान रूपी वसा….
चांगला गुरू मिळायला भाग्य लागतं. गुरू शिष्याची भेट कशी कुठे कधी होईल हे ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाही. ख्यातकिर्त गायक मन्ना डे यांच्या संगीतातील गुरू बाबतचा एक किस्सा फार भावस्पर्शी आहे. मन्ना डे हे मूळचे कलकत्त्याचे. त्यांचे काका अंध गायक के सी डे तेंव्हा मुंबईत होते. त्यांनी मन्नाला मुंबईला बोलावून घेतले. मन्ना मायानगरीत येऊन संगीत क्षेत्रात उमेदवारी करीत होते. आकाशवाणीवर गाण्याची संधी त्यांना मिळाली होती. एकदा असेच रेडिओचे रेकॉर्डिंग आटोपून मन्ना स्टुडिओबाहेर पडले. त्यांनी टॅक्सी केली, तोच एका वृद्ध गृहस्थांनी त्यांना हात केला. मन्नांनी टॅक्सी थांबवली. ते गृहस्थ थेट टॅक्सीत येऊन बसले व म्हणाले, “चलो!” मन्ना गोंधळले. त्यांनी त्यांना विचारलेही- “आपको कहां जाना है ?” ते वृद्ध गृहस्थ म्हणाले “जहां आपको जाना है जनाब”. काय बोलावं, मन्नांडॆंना कळेना. टॅक्सी धावू लागली. काही वेळानं ते गृहस्थ म्हणाले, “मैने आपका गाना सुना हैं, आप की आवाज बडी अच्छी है मै आपको गाना सिखाउंगा.”
मन्नांना ते फार विचित्र तर वाटलंच… चीड ही आली. एक तर हा टॅक्सीत घुसून लिफ्ट मागतोय. वर मलाच गाणं शिकवीन म्हणतोय… हा समजतो कोण स्वतःला? मन्ना म्हणाले “माफ किजिए पर मैने आपको पहचाना नही.” त्यावर ते वृद्ध गृहस्थ उद्गारले, “मैं अब्दुल रहमान खॉं!” आता मात्र मन्ना ओशाळले. अब्दुल रहमान खॉं – पतियाळा घराण्याचे बुजुर्ग उस्ताद होते. त्या काळात मिडीया एवढा प्रभावशाली नव्हता, त्यामुळे मन्ना डे यांनी त्यांच्याबाबत केवळ ऐकलं होतो. त्यांना फोटोत देखील पाहीलं नव्हतं. मन्नांनी त्यांना नमस्कार करीत म्हटलं, “खॉंसाहेब आप इतने ज्ञानी है, बडे है .. लेकीन आपको देने के लिए मेरे पास इतने पैसे नही है.” खॉंसाहेब म्हणाले, “मैने कहां आपसे पैसे मांगे है? ये संगीत की तालीम मै आपको मुफ्त मे दूंगा वो भी आपके घर आकर! इसी लिए तो मुझे आपका घर देखना है!” मन्ना अवाक् झाले. त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी नम्रपणे इतक्या प्रेमाचं कारण विचारलं. तसं खॉंसाहेबांनी म्हटलं, ” मै अपनी सारी संगीत की विद्या तुम्हे देकर जाउंगा क्यूं की वो आपही शख्स है जिसकी आवाज में मैने वो कशीश देखी हैं… कल मै इस दुनिया मे नही भी रहा तो मेरे सूर तुम्हारे गले में जिंदा रहेंगे.’ त्यानंतर खरोखरीच खॉंसाहेब मन्नांच्या घरी येऊन त्यांना आपली विद्या देत राहिले. (त्या काळात ते सुरेश कुमार या नावाने ते ऑल इंडिया रेडीओ वर गात असत)
मन्नाडॆ यांनी शास्त्रीय संगीतावर आधारीत असंख्य गाणी गावून आपल्या गुरूचे सूर अमर ठेवले. वयाच्या नव्वदीतही ते त्याच तडफेने गात असत. आज मन्ना डे यांच्या जयंती दिनी त्यांच्या गुरूचे देखील स्मरण!
धनंजय कुलकर्णी