
Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
अभिनेता मनोज कुमार (Manoj Kumar) सत्तरच्या दशकापासून भारत कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले. पण त्यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटातून विविध जॉनरच्या भूमिका साकारल्या होत्या. यात रहस्यपट होते (वह कौन थी?), प्रेमपट (सुहाग सिंदूर, हनीमून), सामाजिक पट (कांच की चुडीया). या काळात त्याने अनेक अभिनेत्रीसोबत काम केले. Manoj Kumar आणि माला सिन्हा हे दोघे पाच चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आले. मनोज कुमार यांचा पहिला चित्रपट फॅशन या सिनेमाची नायिका Mala Sinha होती. त्यामुळे त्यांच्यासोबत मनोज कुमार यांचे विशेष असोसिएशन होतं. पण एकदा एका चित्रपटाच्या सेटवर मात्र माला सिन्हा यांनी त्यांचा सेटवरच जाहीर अपमान केला होता. अर्थात याला मनोज कुमार यांनी खूप चांगले उत्तर देऊन परतफेड केली होती! कोणता होता तो चित्रपट आणि कोणत्या चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली होती?

प्रकाश पिक्चर्स यांच्या वतीने १९६१ साली ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटाची निर्मिती चालू होती. या सिनेमाचे दिग्दर्शक होते विजय भट. यात मनोज कुमार आणि माला सिन्हा लिड पेअरमध्ये होते. या चित्रपटात एका शॉटच्या वेळी हा प्रसंग घडला होता. या शॉटमध्ये बर्फवृष्टी होत असताना त्यातून चालत जात काही डायलॉग नायक आणि नायिकांना बोलायचे होते. मनोज कुमार (Manoj Kumar) तोपर्यंत एक फ्लॉप स्टार म्हणून ओळखले जात होते; कारण त्यांच्या यापूर्वीच्या चित्रपटांना अजिबात यश मिळाले नव्हते. माला सिन्हा मात्र तोवर एस्टॅब्लिश स्टार झाल्या होत्या. तिचे अनेक सिनेमे तोवर सुपरहिट झाले होते. त्यामुळे अभिनेता मनोज कुमार थोडेसे तिच्यापासून दबकूनच असायचे.
या शॉटच्या वेळी माला सिन्हा यांनी मनोज कुमार (Manoj Kumar) यांचा जाहीर पाणउतारा केला होता. हा शॉट काश्मीरमधला असला तरी त्याचे चित्रीकरण मुंबईच्या स्टुडिओमध्ये झाले होते. तिथे कृत्रिम बर्फवृष्टी दाखवली होती. माला सिन्हांंनी त्यांचे डायलॉग अतिशय व्यवस्थित बोलून दाखवले. पण मनोज कुमार मात्र त्यांचे डायलॉग बोलताना वारंवार अडखळत होते. याचं कारण असं होतं की तो कृत्रिम बर्फ म्हणजे साबणाचे आणि कापूस मिळून केलेला तो आर्टिफिशियल आईस होता. हा हवेतून उडून यांच्या अंगावर पडत होता आणि मनोज कुमारच्या तोंडात ते कण जात होते! त्यामुळे त्यांना डायलॉग डिलिव्हरी करणं खूप अवघड जात होतं.

चार-पाच रिटेक झाल्यानंतर माला सिन्हा त्याच्यावर खूप चिडली आणि म्हणाली, ”तुला कोणी आमंत्रित केले होते येथे चित्रपटात काम करण्यासाठी? एक साधा डायलॉग बोलता येत नाही?” मनोज कुमार (Manoj Kumar) यांच्यासाठी ही एक अपमानास्पद टिप्पणी होती. पण त्यांनी हा अपमान सहन केला आणि शांत स्वरात उत्तर दिले, ”माला जी तुम्ही कदाचित पैशासाठी सिनेमात काम करत असाल पण मी इथे आलो आहे ते फक्त एक्टिंग करायला! माझ्या स्वत:च्या अभिनयावर जोवर मी समाधानी होत नाही तोवर रिटेक्स होत राहणार. माझ्यामुळे आपल्याला त्रास होतो आहे त्याबद्दल माफ करा.” डायलॉगनंतर पुढचा शॉट व्यवस्थित झाला. माला सिन्हा यांनी देखील फारसे मनाला लावून घेतले नाही.
==============
हे देखील वाचा : Sai Paranjpye यांच्या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी कलात्मक गाणे गायले!
==============
पण गंमत म्हणजे हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्या वेळेला सगळ्यापेक्षा जास्त तारीफ झाली ती मनोज कुमार (Manoj Kumar) यांचीच आणि मनोज कुमार या सिनेमा पासूनच खऱ्या अर्थाने स्टार म्हणून उदयास आले. यानंतर या दोघांनी १९६५ मध्ये ‘हिमालय की गोद मे’ या चित्रपटात एकत्र भूमिका केली. या दोघांनी एकूण पाच चित्रपटात एकत्र काम केले. फॅशन, अपने हुये पराये, हिमालय की गोद मे, सुहाग सिंदूर, आणि हरियाली और रास्ता. विजय भट्ट दिग्दर्शित हरियाली और रास्ता या चित्रपटापासून मनोज कुमार (Manoj Kumar) यांची चलती सुरू झाली. हा सिनेमा सुपर हिट ठरला. लाखो तारे आसमान पर, इब्दीदाये इश्क में हम सारी रात जागे, ये हरियाली और रास्ता, बोल मेरे तकदीर में क्या है ही शंकर-जयकिशन यांनी स्वरबध्द केलेली गाणी प्रचंड गाजली. या नंतर १९६५ साली त्यांनी ‘शहीद’ या चित्रपटापासून देशभक्ती हा जॉनर निवडला. आणि त्यात ते प्रचंड यशस्वी ठरले.