माणसाने माणसाशी माणसासम वागणे
ज्या प्रार्थनेच्या बाबतीत हे घडले, ती प्रार्थना म्हणजे ‘उबुंटू’ चित्रपटातील प्रार्थना. पुष्कर श्रोत्री हा अभिनेता ‘उबुंटू’ चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत होता. या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी कौशल इनामदार यांच्यावर सोपवण्यात आली होती. पुष्कर कौशलला म्हणाला,” या चित्रपटासाठी एक प्रार्थना करायची आहे. शाळेतील मुले प्रार्थना म्हणत आहेत, असा प्रसंग आहे. “गीतलेखन समीर सामंत करणार होते. कौशल, पुष्कर आणि समीर सामंत यांच्यात गप्पा सुरु झाल्या. कौशल समीर सामंत यांना म्हणाला की आधी शब्द लिही, मग मला चाल करायला आवडेल. पुष्करने समीरला सांगितले होते की “प्रार्थनेचे शब्द सोपे हवेत आणि त्यात एखाद्या विशिष्ट देवाचा उल्लेख नको. “गप्पा सुरु असताना समीरला शब्द सुचले, “हीच
आमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे”. शब्द खूपच उत्तम होते. ज्यावेळी प्रार्थना संगीतबद्ध करायची असे ठरले, तेव्हा कौशलने संगीतकार
या नात्याने काय विचार केला हे सांगताना कौशल म्हणाला, “मुळात प्रार्थना म्हटले की त्यात भाव आला तो नम्रतेचा. या दोन ओळीत ‘हीच’ आणि ‘हेच’ अशी शब्दांची पुनरावृत्ती होती. शब्द खूप साधे आणि सोपे होते. इथे संगीतकार म्हणून मी प्रार्थनेतील समर्पणाचा भाव लक्षात घेतला. मी
अनेक चित्रपटातील प्रार्थना यापूर्वी ऐकल्या होत्या. मग ती उंबरठा मधील ‘गगन सदन तेजोमय’ असेल किंवा ‘अंकुश’ या हिंदी चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमें दे ना दाता’ ही प्रार्थना असेल. प्रार्थनेला चाल देताना तिथे एखादा संगीतकार कमी दिसला पाहिजे आणि
ज्या व्यक्तिरेखेवर ते गीत चित्रित होत आहे, त्या व्यक्तिरेखा, ती पात्रे दिसली पाहिजेत. तिथे संगीतकाराचा अहंगंड बाजूला ठेवून पूर्ण महत्व हे शब्द आणि व्यक्तिरेखांना द्यायला हवे. हे समर्पण प्रार्थनेत महत्वाचे आहे. प्रार्थना म्हणणारी मुले शाळेत आहेत, त्यांच्या मनातील, चेहऱ्यावरील निरागसता या भावना सुद्धा लक्षात घ्यायला हव्यात. कौशलला ही चाल सुद्धा अगदी पटकन सुचली होती. कौशल, पुष्कर आणि समीर यांच्या गप्पातून एक अतिशय उत्तम प्रार्थना रचली गेली. एखादी सोपी चाल करणे हे अधिक कठीण असते, आव्हानात्मक असते, असेही कौशल सांगतो. चालीची गंगोत्री शोधणे कठीण असते आणि आतापर्यंत ज्या प्रार्थना ऐकलेल्या असतात, त्या ऐकण्याचे संस्कार सुद्धा संगीतकाराच्या चालीतून दिसत असतात, हे सुद्धा तो म्हणाला. ‘उबुंटू’ चित्रपटातील ही प्रार्थना अजित परब आणि मुग्धा वैशंपायन आणि सहकारी यांनी गायली आहे. अनेक शाळेत आणि विद्यापीठात हे अधिकृत प्रार्थनागीत म्हणूनही वापरले जात आहे. मुख्य म्हणजे करोनाच्या सध्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी सुद्धा ही प्रार्थना काही ठिकाणी ऐकवली गेली, असे म्हणतात.