
‘आंदोलकांनी कार अडवली, घोषणा केल्या आणि…’अभिनेत्रीचा गाडी रोखून आंदोलनकर्त्यांची हुल्लडबाजी
मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीमुळे ठिकठिकाणी कोंडी निर्माण झाली आहे. या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी गैरवर्तन केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. हिंदी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) हिने स्वतःसोबत घडलेला असा धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर उघड केला आहे. (Actress Sumona Chakravarti)

सुमोना हिने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ती कुलाबा ते फोर्टदरम्यान कार चालवत असताना अचानक तिची गाडी आंदोलकांनी अडवली. भगव्या उपरणा घातलेल्या एका तरुणाने तिच्या गाडीवर हात आपटत, विचित्र नाच करत तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्याचे मित्र गाडीच्या काचांवर हात आपटत, “जय महाराष्ट्र” अशी घोषणा देत हसत होते. काही मिनिटांत हा प्रकार दोनदा घडला.

या प्रसंगादरम्यान जवळपास पोलीस दिसले नाहीत. जे काही पोलीस होते, तेही निवांत गप्पा मारताना दिसले, असा आरोप अभिनेत्रीने केला. तिने लिहिले की, “मी आयुष्यभर मुंबईत राहिले आहे आणि नेहमी सुरक्षित वाटले. पण आज, दिवसाढवळ्या, दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर मला पहिल्यांदा खऱ्या अर्थाने असुरक्षित वाटले. माझ्या सोबत एक पुरुष मित्र असल्याने मी सुदैवी ठरले, पण जर मी एकटी असते तर काय घडलं असतं, याची भीती वाटली.”(Actress Sumona Chakravarti)
=============================
हे देखील वाचा: Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं !
=============================
सुमोना पुढे म्हणाली की, आंदोलकांनी रस्त्यावर कचरा टाकणे, अंघोळ करणे, शौचास जाणे, स्वयंपाक करणे, रील्स बनवणे अशा प्रकारे नागरी जबाबदारीची पायमल्ली केली. आंदोलनाच्या नावाखाली शहराचे पर्यटन सुरू आहे, हे पाहून मन खिन्न झाले. “शांततापूर्ण आंदोलने मी पाहिली आहेत, पण आज पूर्ण अराजकता होती. एक कर भरणारी नागरिक, एक महिला आणि मुंबईवर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून मला याचा प्रचंड त्रास झाला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, कारण आपल्या स्वतःच्या शहरात सुरक्षित वाटण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. दरम्यान, या आंदोलनावर अभिनेत्री Sumona Chakravarti हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सनसनाटी आरोप केल्यानंतर अभिनेत्रीने हिने पोस्ट डिलिट केली.