घे भरारी
सध्या स्टार प्रवाह वर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका खूप चांगला प्रतिसाद मिळवत आहे. त्यातला ‘यश’ च्या भूमिकेत असणारा कलावंत म्हणजे अभिषेक देशमुख.
अभिषेक हा उद्योजकांच्या कुटुंबातला. तो आधी जळगावात राहत होता. त्याच्या वडिलांचं शिक्षण पुण्यात झालं होतं. अभिनयाची अभिषेकला पूर्वीपासूनच आवड होती. त्याच्या आईने सुद्धा राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. अभिषेकचे अकरावी – बारावीतील शिक्षण हे पुण्यात झाले. पुण्याच्या एकांकिका स्पर्धेत तो सहभागी झाला होता,पण मग बारावीनंतर आर्किटेक्चरचे शिक्षण घेण्याकरिता तो मुंबईत आला. तो आर्किटेक्ट झाला. पण अभिनयाची, लेखनाची आवड त्याला खुणावत होती.
पुण्याला अभिषेकने राज्य नाट्य स्पर्धेत काम केलं. ‘एक्स्प्रेशन लॅब’ नावाच्या संस्थेतर्फे एक सोलो थिएटर महोत्सव होत असतो. त्यात अभिषेकने स्वतः ‘र. धों .कर्वे’ यांच्या जीवनावर आधारित ‘कर्वे – बाय दि वे’ असा एक मोनो लॉग लिहिला होता. त्याला खूप यश मिळाले. तसेच ‘दोन गोष्टी’ हे प्रायोगिक नाटक देखील त्याने लिहिले. ‘ओ फ्रिदा’ हे त्याने लिहिलेले नाट्य अनेक ठिकाणी सादर झाले. या नाटकात कृत्तिका देव हिने भूमिका केली होती. या नाटकाच्या निमित्ताने अभिषेकला परदेश दौऱ्याची संधी मिळाली. अनेक आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात हे नाट्य खूप गाजले.
अभिषेकची कृत्तिकाबरोबर मैत्री झाली आणि पुढे त्या दोघांनी लग्न देखील केले. ‘पसंत आहे मुलगी’ नावाच्या मालिकेत त्याची प्रमुख भूमिका होती. अभिषेक सध्या ‘आई कुठे काय करते’ मधील ‘यश’ म्हणून खूप लोकप्रिय आहे. तो म्हणतो, ” आई कुठे काय करते मधील माझ्या ‘यश’ या भूमिकेने मला एक आत्मिक समाधान दिलं. ही माझी आतापर्यंतच्या भूमिकांमधील सर्वात आवडती भूमिका आहे. ही भूमिका मला स्वतःच्या स्वभावाच्या जवळ जाणारी भूमिका वाटते. मुळात ही मालिका आणि यातील व्यक्तिरेखा इतक्या चांगल्या लिहिल्या गेल्या आहेत, की ती भूमिका साकारताना खूप मजा येते.”
हे नक्की वाचा: ऋषी कपूर यांच्या आयुष्यातील या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
‘होम स्वीट होम’ सिनेमात अभिषेकने काम केले असून ‘सेक्स, ड्रग अँड थिएटर’ या वेब सिरीज मध्ये देखील त्याची भूमिका आहे. १५ ऑगस्ट या माधुरी दीक्षित यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटात त्याची भूमिका आहे. अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांतून अभिषेकने त्याच्या अभिनयाचा प्रभाव पाडला
असून त्याचा फॅन क्लब दिवसेंदिवस वाढत आहे.