ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
मराठीला मिळालेला उमदा, देखणा, गुणी अभिनेता: वरद विजय चव्हाण
जमा झालेली नाणी घेऊन वरद घराखालच्या बारमध्ये गेला. त्या नाण्यांच्या बदल्यात पन्नास रुपये मिळायचे. ती नोट हाती घेऊन पायऱ्या चढत असताना वरदच्या मनात विचार आला, “एकेकाळी बऱ्यापैकी सुसंपन्न जीवन जगत असताना आता बाबांवर ही वेळ आली. खरंच, मनोरंजन क्षेत्राचं भवितव्य असेल का? या क्षेत्रात मी जावं का?”
काही क्षण विचार करत तो तिथंच थांबला. नंतर नव्या उर्मीनं उठला. “परिस्थिती कशीही असली तरी हार मानायची नसते”, ही बाबांचीच शिकवण त्याला आठवली. सगळेच दिवस सारखे नसतात, हे वास्तव मनात ठासवून नव्या जोमानं झेपावण्याचं त्यानं तिथंच ठरवलं.
वरद विजय चव्हाण (Varad Chavan)…… मराठीला मिळालेला एक उमदा, देखणा आणि गुणी अभिनेता. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचा तो मुलगा. तमाम मराठी रसिकांचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे विजय चव्हाण. त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून रसिकांना भरभरून दिलं. रसिकांनीही त्यांच्यावर अतोनात प्रेम केलं. याच सहृदयी अन् उपजत कलेचे धनी असलेल्या महान कलावंताचा पुत्र असणं वरदचं भाग्यच.
विजय चव्हाण सुरुवातीच्या काळात मफतलाल मिलमध्ये काम करायचे. रात्री ड्युटी आणि दिवसा ‘मोरूची मावशी’चे प्रयोग चालायचे. सतत व्यस्त असायचे ते. कालांतरानं मिल बंद पडली. तोवर नाटकांत चांगला जम बसला होता. मराठी चित्रपटांतूनही कामं मिळत होती.
८ फेब्रुवारी १९८७ रोजी वरदचा जन्म झाला. विशेष म्हणजे, विजय यांचाही वाढदिवस ८ फेब्रुवारीलाच. त्यामुळे वरदच्या जन्माचा आनंद दुप्पट होता. छोटा वरद बरेचदा बाबांसोबत तालमींना, शूटिंगला जायचा. त्यामुळे अभिनयकलेचे संस्कार लहान वयातच रुजू लागले होते. आपणही अभिनेता व्हायचं, हे त्यानं मनोमन ठरवलं होतं.
साधारणत: नव्वदीचा काळ असेल. मराठी चित्रपटसृष्टीवर अवकळा आली होती. नाटकांचेही प्रयोग म्हणावे तसे होत नव्हते. त्यामुळे विजय चव्हाण यांना काम मिळणं मुश्किल होऊन बसलं होतं. आर्थिक स्थितीही तंग होत चालली होती. त्याकाळी नाटकांच्या व्हीसीडी काढून ते विकणं सुरू झालं होतं. त्या शूटिंगपुरतं काम तेवढं मिळायचं. त्यातून मिळकत म्हणावी तेवढी नव्हतीच.
वरद सांगतो, “दिवस कठीण होते. त्यावेळी आम्ही अंधेरीला राहायचो. काही नाणी गोळा करून ते घराखालच्या बारमध्ये विकायचो. त्यातून पन्नास रुपये मिळायचे. त्यावरच कित्येक दिवस काढावे लागायचे. परिस्थिती बिकट होती तरी बाबांनी माझे लाड पुरविले नाहीत, असं कधी झालं नाही. मी एखादं खेळणं घेऊन मागितलं, तर बाबा ते घेऊन द्यायचे. त्याची तजवीज ते कशी करीत, हे त्यांचं त्यांनाच ठाऊक.
मी मोठा होत गेलो. बरेचदा मनात विचार आले की, बेभरवशाच्या या मनोरंजन क्षेत्रात जायचं की नाही? शेवटी विचार केला, स्वप्न हे स्वप्नच राहू नये. अन्यथा पन्नाशी-साठीत गेलो तर पश्चातापाची वेळ येईल. त्यादृष्टीनं प्रवास सुरू केला. बीएससी कम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. त्यानंतर घरी सांगून टाकलं की, मीही अभिनयक्षेत्रात जाणार.
बाबांनी नकार दिला नाही. मात्र, ‘मी कुणाकडे तुझी शिफारस करणार नाही. तुझी लढाई तुलाच लढायची आहे. हार-जीतची जबाबदारी सर्वथा तुझी असेल. मेहनत कर’, असं त्यांनी सांगितलं.”
काळ बदलला. ‘श्वास’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठीला पुन्हा चांगले दिवस येऊ लागले. त्यादरम्यान चव्हाण कुटुंबीय मुलुंडला स्थायिक झाले. मुलुंडचं घर आमच्यासाठी ‘लकी’ ठरलं, असं वरद सांगतो. विजय चव्हाण यांना आणखी चांगली कामं मिळू लागली. परिस्थिती सुधारू लागली होती. त्यादरम्यान वरदचाही संघर्ष सुरू झाला.
वरद अनेकदा बाबांसोबत सेटवर जायचा. युनिटमधले लोक विचारायचे, “हा कोण?” तेव्हा विजय “हा माझा मुलगा वरद चव्हाण (Varad Chavan)”, एवढीच ओळख करून द्यायचे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी दासबाबू एक सीरियल करीत होते. त्यावेळी वरदला पाहून त्यांनी त्याला दोन सीन देऊ केले.
पहिला सीन बाबा अर्थात विजय चव्हाण यांच्यासोबतचा होता. त्यामुळे फारसं दडपण आलं नाही. मात्र, दुसरा सीन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबतचा होता. एरवी विक्रम गोखले यांच्यासोबत बोलण्याचीही अनेकांना धास्ती होती, तिथं तर त्यांच्यासोबत सीन करायचा होता. त्यामुळे साहजिकच मनावर ताण होता. अखेर तो सीन चांगल्या रीतीनं आटोपला. वरदचा कॅमेऱ्यासमोरचा हा पहिला अनुभव. त्यानंतर नितीन कांबळे दिग्दर्शित ‘चंद्रकला’, केदार शिंदे दिग्दर्शित ‘ऑन ड्युटी २४ तास’ हे चित्रपट मिळाले.
वरदने २०१० ते २०१४ या काळात सुमारे तीस चित्रपटांमधून कामं केली आहेत. मात्र, त्यातील कित्येक प्रदर्शित झालेच नाहीत. यांपैकी अर्ध्याअधिक सिनेमांत दिग्गज कलावंतांसोबत काम करण्याची संधी मिळाली, असं वरद सांगतो.
२०१२ च्या सुमारास तो मालिकांकडे वळला. यादरम्यान ‘मंगळसूत्र’, ‘अजूनही चांदरात आहे’, ‘हंड्रेड डेज’, ‘रुंजी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘ललित २००५’, ‘जीवलगा’ अशा कित्येक मालिकांमधून कामं केली. सध्या कलर्स मराठीवरील ‘आई मायेचं कवच’मध्ये त्याची भार्गवी चिरमुलेसोबतच महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
मालिकांनी खूप दिलंय…
सिनेमाच्या तुलनेत मालिका अधिक रोजगार देतात, असं वरद सांगतो. सिनेमा हे काही दिवसांपुरतं काम असतं. शिवाय, अनेक चित्रपट मध्येच बंद पडतात. काही तर प्रदर्शितही होत नाहीत. मालिका मात्र सुरू असतात. त्या माध्यमातून तुम्ही घराघरांत पोहोचता.
डेली सोप्समध्ये दगदग अधिक होते. मात्र, काही काम नाही अशा स्थितीत रिकामं बसण्यापेक्षा मालिकांमध्ये व्यग्र राहणं कधीही चांगलं. मालिकांमध्ये अभिनय करताना कस लागतो. तिथं तुम्ही अधिक पॉलिश्ड होत असता, स्वत:ला अधिक ग्रूम करू शकता. तिथं पाठांतर चोख लागतं. याशिवाय, विविध तंत्रेही शिकायला मिळतात. मोठमोठे कलावंतही आता मालिकांकडे वळत आहेत. कदाचित, पुढचं भवितव्य मालिकांचं असेल, असं म्हणायला हरकत नाही, असंही त्याचं मत आहे.
बाबांनी दिलेली साथ…
“बाबा माझे चांगले प्रेक्षक होते. माझा एखादा सीन जमला नाही तर ते परखडपणे सांगत. तर, एखादा सीन आवडला तर मला ५०१ रुपयांचं बक्षीस देत. २०१० पासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यांना फुप्फुसाचा आजार होता. ते कॉलेजमध्ये असतानाच त्यांना त्रास होत होता. मात्र, डॉक्टरांच्याही ते लक्षात आलं नव्हतं. त्यांनी त्यांच्यावर सर्दीचे उपचार केले. कालांतरानं हा त्रास वाढला.
वर्षातून एकदा त्यांना ॲडमिट करावं लागायचं. २०१६ साली ते प्रचंड आजारी पडले. ते वाचतील, याची डॉक्टरांनाही शाश्वती नव्हती. ‘मुलाला बोलवून घ्या’, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी मी ‘रुंजी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. दोनेक दिवसांचं शेड्युल राहिलं होतं. सेटवर त्यांच्या तब्येतीविषयी कळू लागलं. मात्र, बाबांनी फोन करून सांगितलं, ‘तू तुझं काम आटप. ते महत्त्वाचं आहे. मी कुठेही जाणार नाही. आहे मी तुझ्यासोबत.’
मी परतलो. मात्र, बाबांची तब्येत आता आधीसारखी नव्हती. त्यांनी माझी आई विभावरी यांना बोलवून घेतलं. ‘मला वरदचं लग्न बघायचंय’, अशी इच्छा बोलवून दाखविली. तीस ते ३५ दिवस ते रुग्णालयातच होते. नंतर त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली. त्यानंतर प्रज्ञाशी माझा साखरपुडा झाला, लग्नही झालं. सून बघायची त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. तिच्या हातची भाजी-पोळी त्यांनी खाल्ली.
२०१८ साली बाबा समाधानानं गेले. स्मशानात कित्येक तास बसून मी ढसाढसा रडलो. नंतर बाहेर आल्यावर मोकळं वाटलं. बाबांना त्या अवस्थेत मी पाहूच शकत नव्हतो. ताठ बापमाणूस पाहण्याचीच सवय लहानपणापासून होती. अखेर सर्व व्याधींमधून ते मोकळे झाले होते. ते कुठंही असतील तरी इतरांना हसवतच असतील, याची खात्री मला आहे. माझ्यासोबत ते आहेत, याची सतत जाणीव होत राहते…”, वरद हळवेपणांन सांगत होता.
निराश होऊ नका, भविष्याची तरतूद करा…
या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी मेहनतीची तयारी ठेवावी. यशासोबत अपयशही पचवता आलं पाहिजे. समाधानी राहणं शिका. भविष्याची तरतूद करून ठेवली पाहिजे. उगाच शोऑफ करण्यात अर्थ नाही. मिळणाऱ्या पैशांची नीट गुंतवणूक केली पाहिजे, असा सल्ला वरद नवोदितांना देतो.
=====
हे देखील वाचा – बालनाट्य: छोट्या प्रेक्षकांचा कमबॅकही गरजेचा
=====
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्याला आता प्रवेशायचं आहे. भविष्यात विविधांगी भूमिका साकारायच्या आहेत. मराठीतही साउथसारखं ‘हिरोइजम’ यावं, अशी त्याची अपेक्षा आहे. रतन टाटा यांचा त्याच्यावर प्रभाव आहे. ते नुसते व्यावसायिक नाहीत, तर समाजासाठी काहीतरी देणं लागतं, या भावनेतून ते जे काही करतात, ते भावतं, असं तो सांगतो.
वरद चव्हाण (Varad Chavan) कमालीचा नम्र आहे म्हणून तो जमिनीवर आहे. अनुभवलेली परिस्थिती आणि चांगले संस्कार हे त्याचं संचित आहे. यासोबत त्याच्यात असलेले गुण त्याला या क्षेत्रात उंचीवर नेतील, यात शंका नाही.