Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Daya Dongare : ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
मराठी चित्रपटसृष्टीतील खाष्ट सासू अशी ओळख आपल्या कसदार अभिनयातून निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं आज ३ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या दया डोंगरे यांच्या नकात्मक भूमिका विशेष गाजल्या. वयाच्या ६व्या वर्ष रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या दया डोंगरे यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजनसृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

दया डोंगरे यांचा जन्म अमरावतीचा… परंतु, लहानपणी काही वर्ष त्या मराठी चित्रपटसृष्टीच्या मायानगरीत अर्थात कोल्हापूरात राहायला होत्या… त्यावेळी वयाच्या ६व्या वर्षी त्यांनी ‘खबरदार जर टाच मारुनी’ हे गाणं सादर करत रंगभूमीवर पहिली पाऊल टाकलं होतं… आईकडूनच गायन आणि अभिनयाचे संस्कार दया यांच्यावर लहानपणापासून होत गेले; आणि भविष्यात मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीत एक अष्टपैलु कलावंत त्यांच्या रुपात घडला…
अभिनयासोबतच दया डोंगरे यांनी हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून नाट्यसंगीताचे धडे घेतले होते… दया यांना वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ऑल इंडिया रेडियोच्या सुगम संगीत स्पर्धेत राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिकदेखील मिळाले. त्या स्पर्धेच्या परीक्षक पॅनलवरील पु. ल. देशपांडेंनी ‘ही पुण्याहून आलेली, नाट्यसंगीत गाणारी मुलगी कोण?’ अशी त्यांच्याबाबत खास विचारणा केली. आणि पु.लंनी हेरलेल्या या गायिकेची पुढे अभिनेत्री झाली…
दया डोंगरे यांनी ‘बिऱ्हाड वाजलं’, ‘चंपा गोवेकर’ ही नाटके, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘संकेत मीलनाचा’, ‘मंतरलेली चैत्रवेल’ अशा अनेक नाटकांमध्ये कामं केली… तसेच, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांव्यतिरिक्त दूरदर्शनवरील मालिकांतूनही त्यांनी काम केले. दिल्ली दूरदर्शनमध्ये १९६४ सालापासून काम करत होत्या. त्यांनी मुंबई दूरदर्शन सुरू झाल्यावर ‘गजरा’, ‘बंदिनी’, ‘आव्हान’ या मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला होता… तसेच, ‘स्वामी’ या मालिकेत गोपिकाबाईंचे पात्र लोकप्रिय झाले होते…
================================
हे देखील वाचा : Marathi Movies : मराठी चित्रपटसृष्टीचं नेमकं अडतंय कुठे?
================================
उत्कृष्ट गायिका, नृत्यांगना आणि अभिनेत्री असणाऱ्या दया डोंगरे यांनी जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.. पुढे ‘मायबाप’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ अशा विविध मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले… इतकंच नाही तर, ‘दौलत की जंग’ या चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिका देखील त्यांनी साकारली होती… याशिवाय ‘आश्रय’, ‘नामचीन’, ‘जुंबिश’ या हिंदी चित्रपटांतही त्या दिसल्या होत्या… २०१९ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कारकिर्दिचा सन्मान केला होता… भारतीय चित्रपट-नाट्यसृष्टीला आपल्या कलेने समृद्ध करणाऱ्या दया डोंगरे यांना ‘कलाकृती मीडिया’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi