मेहनत, गुणांचे ‘तेज’ ल्यायलेली तेजश्री: दाक्षिणात्य चित्रपटांमधला मराठमोळा चेहरा
तेजश्री रोजच सायंकाळी बाबांसाठी चहा बनवायची. मात्र, आजचा चहा रोजच्या तुलनेत स्पेशल बनावा, असाच तिचा प्रयत्न होता. कडक शिस्तीचे बाबा सायंकाळी जरा शांत असतात. चहा देऊन त्यांना मनातली गोष्ट सांगायचीच, अशी हिंमत तिनं एकवटली होती. खुर्चीवर बसलेल्या बाबांच्या हातात तिनं कप दिला आणि म्हणाली, “बाबा, काही बोलायचंय.”
वडील आधी चपापले. पण तेजश्रीनं इतकी वर्षं मनात असलेली गोष्ट सांगून टाकली, “मला अभिनय क्षेत्रात जायचंय.”
चहाचे घोट घेत बाबांनी काही वेळ विचार केला. स्मित केलं, अन् म्हणाले, ‘ठीक आहे. पण, पदवीचं शिक्षण पूर्ण कर, चांगले मार्क्स मिळव. याबाबतचं वचन दे, तरच परवानगी देईन.”
तेजश्रीला आकाश ठेंगणं झालं होतं. ‘येस्स, प्रॉमिस’, असं म्हणत तिनं बाबांना मिठी मारली.
तेजश्री जाधव (Tejashree Jadhav) मनोरंजन, ग्लॅमरस क्षेत्रातला चमकता चेहरा. ती जितकी गुणी कलावंत आहे, तेवढीच कमालीची नम्र, सदैव जमिनीवर असणारी सुस्वभावी व्यक्ती आहे. या मराठी कन्येनं पदार्पणातच दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या कलागुणांचा झेंडा रोवला.
मनोरंजन क्षेत्रातला तिचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. शिस्तीच्या वातावरणात ती वाढली. वडील राजेंद्र जाधव हवाई दलातील निवृत्त सार्जंट आहेत. सध्या ते एका खासगी कंपनीत मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून कार्यरत आहेत. भाऊ ओंकार आयटी इंजिनीअर, तर आई शीला गृहिणी आहे. संरक्षण दलाची शिस्त आजही या कुटुंबात कायम आहे.
तेजश्री जाधव (Tejashree Jadhav) काहीच महिन्यांची होती, तेव्हा राजेंद्र यांची पंजाब येथे बदली झाली. त्यामुळे साहजिकच तेजश्री मराठी आधी पंजाबी शिकली. पाच-सहा वर्षांनंतर हे कुटुंब मुंबईत आलं. तेजश्रीचं सीबीएसईमधून शिक्षण सुरू होतं. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच तिच्यात अभिनेत्री बनण्याच्या महत्त्वाकांक्षेनं मूळ धरलं होतं. ती सिनेमे मन लावून पाहायची.
सहावीत असताना ‘कहो ना प्यार हैं’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं तिच्यावर कमालीची जादू केली होती. काहीही करून या क्षेत्रात प्रवेश करायचाच, असं तिनं ठरवलं होतं. सतत हेच विचार डोक्यात असल्यानं म्हणून की काय, अभ्यासात ती काहीशी मागं पडली.
विद्यार्थी तीन विषयांत अनुत्तीर्ण झाला, तर त्या शाळेत पेरेंट-टीचर मीटिंग व्हायची. वडील राजेंद्र आणि आई शीला यांना काही कळतंच नव्हतं. “पोरगी अभ्यासात माघारू कशी शकते”, हा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यांनी तेजश्रीला विश्वासात घेऊन विचारलं, तेव्हाच तिनं अभिनयक्षेत्रातील आवडीबाबत सांगून टाकलं होतं.
आई-बाबांनी स्पष्ट सांगितलं, ‘आधी अभ्यासाकडे लक्ष दे, मग बघू.’ तेजश्रीनं ती आज्ञा पाळली. दहावीनंतर सायन्स शाखेला प्रवेश घेतला. अभिनयक्षेत्रात जम नाहीच बसला तर कम्प्युटर इंजिनीअर, फॅशन डिझायनर व्हायचं, हा पर्याय तिनं ठेवला होता. बारावीचे पेपर सुरू असतानाही डोक्यात अभिनयाचंच वादळ घोंघावत होतं.
पोरगी बापासाठी जास्त महत्त्वाची असते. तेजश्रीही बाबांची लाडकी परी. बाबा वरून कडक असले तरी आपल्यासाठी आतून मृदू स्वभावाचे आहेत, याचा या मुलीला पूर्ण विश्वास. बारावीचा शेवटचा पेपर कधी संपतो अन् बाबांना मनातली गोष्ट सांगते, असं तिला झालं होतं. अखेर, बाबांना तयार करण्यात ती यशस्वी झाली होती.
अकरावी-बारावीला असताना दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘युवा चेतना’ या स्पर्धात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तिला मिळाली. कॅमेऱ्याशी पहिला संबंध आला तो इथेच. विशेष म्हणजे, ही स्पर्धा ती जिंकलीही.
तेजश्रीच्या अभिनयक्षेत्रातील महत्त्वाकांक्षेबाबत नातेवाइकांमध्येही चर्चा सुरू झाली होती. काहींनी विरोध केला. कुणी म्हणालं, ‘हे आपलं काम नव्हे, एखादी नोकरी कर, सेटल हो.’ पण, जिद्दी स्वभावाची तेजश्री (Tejashree Jadhav) आपलं आकाश विस्तारू पाहात होती.
माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेत असतानाच ती प्रायोगिक रंगभूमीवर सक्रिय झाली. अभिनयाचे बारकावे तिनं तिथंच टिपले. “रंगमंचावरच माझ्या अभिनयाला पैलू पडले, भरपूर शिकता आलं”, असं तेजश्री सांगते.
दरम्यानच्या काळात तिनं बऱ्यापैकी कामं केली. ‘अकिरा’ या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. या चित्रपटाचं युनिट दक्षिणेतलं होतं. सेटवर त्यातील बऱ्याच जणांशी तिची ओळख झाली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेशण्याचे प्रयत्न सुरू केले. आव्हानांना ती आत्मविश्वासानं सामोरी गेली अन् तिला ‘अट्टी’ हा तमिळ चित्रपट मिळाला. तिनं संधीचं सोनं केलं.
तिचे आणखी काही तमिळ व एक तेलुगू चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. दरम्यानच्या काळात ‘माधुरी टॉकीज’ या वेबसीरिजसह काही प्रोजेक्ट्स तिनं केले. आता आणखी एक वेबसीरिज आणि ऐतिहासिक मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
दाक्षिणात्य आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय फरक जाणवतो, असं विचारल्यावर तेजश्री सांगते, ‘सर्व इंडस्ट्री आपल्याजागी ठीक आहेत. पण, वेळेच्या बाबतीतील शिस्त, सहकलाकारांविषयी असलेला आदर या त्यांच्या बाबी अनुकरणीय अशाच आहेत.
“मी तिथं नवीन होते. पण, कुणीही मला ते जाणवू दिलं नाही. या चित्रपटाचा नायक माकापा आनंद स्वत: माझ्याकडे येऊन आपुलकीनं चौकशी करायचा. मला काय हवं, नको, याकडे युनिटचं लक्ष असायचं. तिथं माणसांची किंमत आहे, कामावर प्रचंड निष्ठा आहे.”
=====
हे देखील वाचा: जानकी पाठक… मनोरंजनाच्या क्षेत्रातील आता सुपरिचित चेहरा.
=====
‘बॅकअप’ तयार ठेवा…
“मनोरंजनाचं हे क्षेत्र असुरक्षित, बेभरवशाचं आहे. त्यामुळे या क्षेत्रात येताना दुसरा पर्याय तयार ठेवलाच पाहिजे. या क्षेत्रात अपेक्षित यश मिळालं नाही, तर नैराश्य येऊ नये, यासाठी हे ‘बॅकअप’ खूप महत्त्वाचं आहे. या क्षेत्रात जरुर या; मात्र शिक्षणही पूर्ण करा”, असा मोलाचा संदेश तेजश्री (Tejashree Jadhav) देते.
एक उदाहरणही तिनं सांगितलं. “माझी नात्यातील एक बहीण कित्येक चित्रपटांचे डायलॉग बोलून दाखवते. तिची या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे. तिच्या आईवडिलांनी माझ्याकडे याबाबत गोष्ट काढली. तेव्हा त्यांनाही मी हेच सांगितलं की, आधी हिच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. वाटल्यास पदवीला शिक्षण घेत असताना सोबतीनं अभिनय केला तर हरकत नाही, पण पदवी मिळवायचीच.”
भविष्यात अभिनयावरच लक्ष केंद्रित करायचंय. मात्र, सोबतच प्रॉडक्शनमध्ये उतरून व्यावसायिकतेकडे वळण्याची तेजश्रीची इच्छा आहे. प्रियंका चोप्रा व दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यांचा तिच्यावर प्रभाव आहे. रणवीर सिंग तसेच दक्षिणेकडील विजय हे तिचे आवडते अभिनेते आहेत.
सामाजिक संदेश देणारे, नायिकाप्रधान चित्रपट भविष्यात तिला करायचे आहेत. तेजश्री (Tejashree Jadhav) प्रचंड मेहनती आहे. सोबतीला गुण आहेत. या भरवशावर तिचा पुढचा प्रवास ‘तेज’ असेल, यात शंकाच नसावी!