तूफान मनोरंजन करणारे बालनाट्य “मंकी इन द हाऊस” लवकरच रंगभूमीवर
बालनाट्ये ही नाट्यक्षेत्रातील एक महत्वाची कलाकृती आहे. नाटकांतील कथानकानुसार पात्रयोजना करून बालकांचे मनोरंजन होईल अशा रितीने ही बालनाट्ये रंगमंचावर दाखविली जातात. या नाटकांत केवळ बालकांनाच प्राधान्य असेल असे नाही. नाटकांमध्ये लहानमोठ्या वयाची माणसे, प्राणी, पक्षी, राक्षस, भुते यांतले काहीही असू शकते. लोककथा, परीकथा, साहसकथा किंवा बालकांच्या समस्या असे या नाटकांचे विषय असतात. अशी नाटके रंगमंचावर सादर करण्यासाठी दिग्दर्शकाला प्रत्यक्ष मुलांच्या डोळ्यांनी व मनाने नाटकाकडे बघावे लागते. बालनाट्य म्हटले की गमती जमती, गिमिक्स हे आलेच. बाल प्रेक्षकांचे मनोरंजन करता करता नाटकांच्या द्वारे त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करणे हे बाल रंगभूमीचे उद्दिष्ट असते. मुलांच्या कल्पनाविश्वातील विषय, त्यांना रुचतील अशा रीतीने सूत्रबद्ध आणि घटनाप्रधान कथानकात मांडल्यास उत्तम बालनाट्य आकाराला येते. अद्भुतरम्यता, वास्तवता, नवीन गोष्टींची माहिती यांचे स्वागत मुले सारख्याच तीव्रतेने करतात. (Marathi Balnatya)
साईराज प्रॉडक्शन निर्मित, ऋषिकेश घोसाळकर दिग्दर्शित “मंकी इन दी हाउस” हे नवीन विनोदी बालनाट्य शनिवार दि. १७ जून, २०२३ रोजी रंगभूमीवर येत आहे. “माय फ्रेंड गोरिला” आणि “चमत्कार” या बालनाट्याच्या यशानंतर निर्माते – दिग्दर्शक ऋषिकेश घोसाळकर यांनी “मंकी इन दी हाउस” हे बालनाट्य रंगभूमीवर आणले आहे.“मंकी इन दी हाउस” या नाटकाच्या विषयातच विनोद दडला आहे. एक माकड चुकून एका सुशिक्षित डॉक्टराच्या घरात शिरते आणि त्याला वाचवण्यासाठी घरातील काही सदस्य जो प्रयत्न करतात, ते या विनोदी बालनाट्यात पाहायला मिळणार आहे. नाटकातील कलाकार मंडळी ही तरुण असून अनेक नाटक आणि मालिकेतून सर्वांच्या परिचयाचे असलेले विनोदी अभिनेते संजय देशपांडे आजोबांच्या भूमिकेत धम्माल उडवणार आहेत. तसेच यावर्षीची सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झालेली हिमांगी सुर्वे डॉक्टर पुर्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेत्री प्रियांका कासले आजीच्या भूमिकेत दिसणार आहे तर मंकीच्या भूमिकेत ‘माय फ्रेंड गोरीला’ या नाटकातील अभिनेते राजेंद्र तुपे दिसतील. बालरंगभूमीवर जळवपास १००० प्रयोग पूर्ण करणारा चिंतन लांबे या नाटकात वेदच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबत अनुप जाधव, मंदार मुसळे, हर्ष पाटील, रमा बेरे या कलाकारांची साथ असणार आहे. लेखक – दिग्दर्शक व निर्माते ऋषिकेश घोसाळकर यांनी आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय बालनाटये व व्यावसायिक नाटकं सादर केली आहेत. (Marathi Balnatya)
==================================
हे देखील वाचा: छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा ‘सिंहासनाधिश्वर’ रुपेरी पडद्यावर
==================================
“मंकी इन दी हाउस” हे त्यांचे १४ वे व्यावसायिक नाटक आहे. या नाटकाचे सुत्रधार गोट्या सावंत आणि शाश्वती सावंत आहेत. शाळेची सुरुवात झाल्यावर रंगभूमीवर आलेलं हे फूल टू मनोरंजन करणारे बालनाट्य, लहानमुलांसह मोठ्यांसाठी देखील आकर्षण ठरणार आहे.