
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री Durga Khote!
मोठ्या पडद्यावर झळकणं काही सोप्पी गोष्ट नाही. त्यातच एका अशा काळात जिथे स्त्री म्हणजे चुल-मुल हे समीकरण पक्क असेल आणि पुरुषप्रधान संस्कृती आपलं वरचस्व गाजवत असेल. अशाच काळात अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दुर्गा खोटे यांनी जवळपास ५ ते ६ दशकं लोकांच्या मनावर आपल्या अभिनयानं अधिराज्य गाजवलं. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. मूकपटांपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास बोलपटांपर्यंत येऊन ठेपला… चित्रपटसृष्टीत महिलांसाठी मार्ग मोकळ्या करणाऱ्या दुर्गा खोटे (Durga Khote) यांचा प्रवास जाणून घेऊयात…

तर, भारतात ज्यावेळी चित्रपट तयार करण्यास सुरुवात झाली तेव्हा पुरुषचं स्त्रियांच्याही भूमिका साकारत होते. त्या काळात दुर्गा खोटे यांनी चित्रपटांत प्रवेश केला आणि नायिका म्हणून आपला खास ठसा उमटवला तो ही कायमस्वरुपासाठीच… वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी लग्न केलं… विश्वानाथ खोटे यांच्याशी विवाहबंधनात अडकत एका श्रीमंत घरात त्यांनी आपल्या संसाराला सुरुवात केली. अवघ्या २४व्या वर्षी त्यांच्या पतीचं निधन झालं आणि आर्थिक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला… आता या कठिण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी दुर्गा चित्रपटांकडे वळल्या…

अगदी कमी वयात लग्न झाल्यामुळे त्यांचं शिक्षण अर्धवटच राहिलं. पण त्या काळात सर्वात जास्त शिकणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांचं नाव सामिल होतं.आर्थिक संकटामुळे त्यांनी इंग्रजी भाषा शिकवण्यास सुरुवात केली. आणि पुढे याच आर्थिक चणचणीमुळे साधारण १९३०-३१ मध्ये ‘फरेबी जाल’ हा मूकपट स्वीकारला आणि तिथून त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली… बरं, ज्या काळात त्यांनी चित्रपटात काम केलं तो काळ स्त्रीयांसाठी फार कठिण होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या शिकवणीवर देखील झाला. परंतु, समाजाच्या विचारसरणीचा परिणाम होऊ न देता पुढे याच क्षेत्रात करिअर करण्याचा त्यांनी विचार केला आणि प्रभात फिल्म कंपनीने दुर्गा यांची ‘अयोध्येचा राजा’ (१९३१) या मराठीतील पहिल्या बोलपटाची नायिका म्हणून निवड केली. या बोलपटात त्यांनी तारामतीची भूमिका केली आणि त्यामुळे दुर्गा यांना चित्रपटसृष्टीत मानाचं स्थान मिळालं…

यानंतर पुढे ‘राजराणी मीरा’, ‘सीता’, ‘इन्कलाब’ आणि ‘जीवन नाटक’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी कामं केली… अभिमानाची बाब म्हणजे ‘सीता’ हा त्यांचा चित्रपट ‘व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दाखवला जाणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला होता… दुर्गाबाईंच्या कारकिर्दीचा १९४० ते १९६० हा सुवर्णकाळ होता. त्यांनी आचार्य प्र.के.अत्रे, सोहराब मोदी, पेंढारकर, ऋषीकेश मुखर्जी यांच्यासोबत काम केले. दुर्गाबाईंचे ‘पायाची दासी’, ‘पृथ्वीवल्लभ’, ‘हम लोग’ यांसारखे चित्रपट गाजले. पृथ्वीराज कपूर यांच्यासोबतच्या ‘मुघल-ए-आझम’मधील जोधाबाईच्या भूमिकेने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख दिली… ‘आनंद’, ‘बावर्ची’, ‘अभिमान’ ‘बॉबी’ आणि ‘बिदाई’मधील भूमिकाही गाजल्या…नायिका ते आई असा भूमिकांचा त्यांनी केलेला प्रवास उल्लेखनीय होता.
================================
हे देखील वाचा : Durgabai Kamat : गोष्ट भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्रीची!
================================
चित्रपटांसोबत रंगभूमीवर त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. ‘भाऊबंदकी’ व ‘कीचकवध’ या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या… अभिनयानंतर त्यांनी निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं होतं. दुर्गा खोटे प्रॉडक्शन्स ही कंपनी सुरु करत या बॅनरखाली त्यांनी ‘वागळे की दुनिया’ ही १९८८ मधली मालिका विशेष गाजली. समाजातील रुढीवादी विचार मोडित काढून स्त्रीयांना चित्रपटांमध्ये काम करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या दुर्गा यांचा ‘दौलत के दुश्मन’ (१९८३)हा शेवटचा चित्रपट ठरला. भारतीय चित्रपटसृष्टीचं नाव सातामुद्रापार नेणाऱ्या दुर्गा खोटे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi