‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
सुमीत राघवन: व्यक्ती एक, भूमिका अनेक!
प्रत्येक कलाकाराला त्याच्या मुख्य कलेशिवाय इतर सर्वांगीण कलागुणांचाही विकास व्हावा, त्यांना वाव मिळावा असं मनापासून वाटत असतं. आपण फक्त एकाच चौकटीत अडकून राहू नये अशी त्याची धारणा असते मात्र झपाट्याने मिळणारी प्रसिद्धी आणि अमाप मानधनाच्या जाळ्यात तो गुंततच जातो आणि त्यातून बाहेर पडायची दारं स्वतःहून बंद करून घेतो. याउलट एखादा कलाकार त्याच्या कलेचं, सर्जनशीलतेचं महत्त्व जाणून घेतो आणि साचेबद्ध भूमिकांच्या पिंजऱ्यात न अडकता आपल्या प्रतिभेचे पंख पसरून खुल्या कलाविश्वात मनसोक्त रमून जातो. असाच एक मनस्वी कलाकार जो गेली अडतीस वर्षे सिनेमा, नाटकं, रिअलिटी शोज आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झटतोय- सुमीत राघवन! (Sumeet Raghavan)
सुमीतच्या वडिलांची मातृभाषा तामिळ आणि आईची मातृभाषा कन्नड असली तरी सुमीतवर मराठी भाषेचे उत्तम संस्कार त्याच्या पालकांनीच केले. शांत आणि लाजाळू स्वभावाच्या सुमीतला सुरेल गळा लाभला होता. तो शिकत असलेल्या चेंबूर कर्नाटक हायस्कूलमध्ये त्याच्यातील कलागुणांना वाव मिळावा असं पोषक वातावरण त्यावेळी नव्हतं. स्वभावात थोडा भिडस्तपणा यावा, नवनव्या माणसांशी ओळख वाढावी या हेतूने त्याच्या पालकांनी त्याला सुलभा देशपांडे आणि अरविंद देशपांडे संचलित नाट्य शिबिरात पाठवायला सुरुवात केली.
सुलभाताईंनी त्याच्यातील चुणचुणीतपणा हेरला आणि त्याला ‘फास्टर फेणे’ (Faster Fene) मध्ये प्रमुख भूमिका देऊ केली. १९८३ मध्ये आलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तीनच वर्षांत ‘मला भेट हवी’ (१९८६) या व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून सुमीत रंगभूमीवर पदार्पण करता झाला. दहावीनंतर त्याने रुपारेलला प्रवेश घेतला आणि कॉलेजकडून विविध नाट्यस्पर्धा, एकांकिका गाजवू लागला. ‘चंद्रलेखा’ संस्थेची ‘रंग उमलत्या मनाचे’ आणि ‘ज्वालामुखी’ ही नाटकेही त्याने गाजवली.
नाटकांमध्ये उत्तम कामगिरी बजावल्यानंतर त्याला मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी विचारणा होऊ लागली. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर हे तीन हुकमी एक्के तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीवर आपली हुकूमत गाजवत होते. साहजिकच, सुमीतला त्यांच्या फिल्म्समध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या नायकाच्या भूमिकांसाठी विचारलं जाऊ लागलं, पण त्याने या गर्दीचा भाग होण्यासाठी नकार दिला. एव्हाना महाभारतासारख्या मोठ्या हिंदी मालिकेत त्याला सुदामाची भूमिका साकारायला मिळाल्यामुळे सुमीतचा चेहरा आता प्रेक्षकांना ओळखीचा वाटू लागला होता आणि अश्यातच वयाच्या विसाव्या वर्षी त्याला पहिली हिंदी फिल्म मिळाली; तेही हिरोच्या रोलसकट!
पण काही कारणास्तव ‘इश्क खुदा है’ नावाचा तो हिंदी चित्रपट प्रदर्शित झालाच नाही. करिअरच्या सुरुवातीलाच असं काही घडणे हा सुमीतसाठी मोठा धक्का होता पण कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्याने लवकरच स्वतःला सावरलं आणि व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर सचिन पिळगावकरांच्या ‘एक दो तीन’मध्येही त्याला संधी मिळाली आणि आपल्या मिमिक्रीच्या जोरावर त्याने त्या संधीचं सोनं केलं. त्यानंतर त्याने ‘हद कर दी’, ‘संजीवनी’, ‘शुभ मंगल सावधान’ सारख्या मालिकांमध्येही काम केलं.
२००४ला आलेली ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ (Sarabhai vs Sarabhai) ही मालिका त्याच्या एकंदरीत करिअरमधील मैलाचा दगड मानला जाते. त्याने साकारलेली साहिल साराभाई ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. जवळपास दोन वर्षं या तुफान विनोदी सिटकॉमने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. २००६ला ‘घूम’ या MTVची निर्मिती असलेल्या पॅरडी फिल्ममधून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘माय नेम इज खान’, ‘फिराक’, कुछ लव जैसा’, ‘यू, मी और हम’, ‘हॉलिडे’सारख्या चित्रपटांमध्येही सहाय्यक भूमिकेत तो दिसला. मग पुन्हा ‘सजन रे झूठ मत बोलो’ आणि ‘बडी दूरसे आये है’ या दोन गाजलेल्या मालिकांमध्येही प्रमुख भूमिका साकारली. त्याचं हिंदी आणि उर्दू भाषेवरील प्रभुत्व त्याच्यासाठी कायमच वरदान ठरत आलं. त्यादरम्यान त्याला बऱ्याच मराठी मालिका आणि चित्रपटांसाठीही विचारणा केली गेली, पण त्याने नकार दिला.
मात्र, दिग्दर्शक अतुल काळेने जेव्हा त्याला ‘संदूक’साठी विचारलं, तेव्हा तो एका पायावर तयार झाला. यात त्याने ‘वामनराव अष्टपुत्रे’ या थोड्याश्या स्वप्नाळू, भोळसर कारकुनाची भूमिका साकारली होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील हे विनोदी कथानक सुमीतने त्याच्या जबरदस्त कॉमिक सेन्सच्या जोरावर आणखीन चांगलं खुलवलं. पुढे ‘आपला माणूस’मध्ये त्याची आणि नाना पाटेकरची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. हा चित्रपट ‘नाना एके नाना’ असला तरी सुमीत त्यातल्या काही प्रसंगांमध्ये भाव खाऊन जातो. माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट म्हणून ‘बकेटलिस्ट’कडे पाहिले गेले. यात सुमीत माधुरीबरोबर रोमान्स करताना दिसला.
त्यांची केमिस्ट्री पाहता शाहरुख, सलमान, अनिलच्या तुलनेत सुमीतही काही कमी नाही हे जाणवतं. ‘होम स्वीट होम’ आणि ‘वेलकम होम’मधल्या त्याने साकारलेल्या भूमिकाही त्याच्या सहजसुंदर अभिनयामुळे पुन्हा पुन्हा पाहाव्याश्या वाटतात. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ (Ani… Dr. Kashinath Ghanekar) मध्ये त्याने साकारलेलं डॉ. श्रीराम लागूंचं (Shreeram Lagoo) पात्र त्याच्या अभिनयक्षमतेच्या गुणवत्तेचं प्रमाण देतं. या चित्रपटाच्या एका प्रसंगात ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’च्या वेळी त्याने घेतलेली एंट्री बघून डॉ. लागूंना क्षणभरासाठी तेच स्क्रीनवर पुन्हा आल्याचा भास झाल्याचं सुमीत सांगतो.
‘हॅम्लेट’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘एक शून्य तीन’ सारखी नाटके असोत किंवा ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’सारखा एकपात्री प्रयोग असो, सुमीत अश्या विविध भूमिका अगदी सहज साकारतो. त्याच्या या भूमिका पाहून परकाया प्रवेशासारखी जादुई विद्या त्याला अवगत आहे की काय, असा प्रश्न प्रेक्षकांना नेहमीच पडतो. ‘रिइन्कार्नेशन’ आणि ‘स्ट्रॉबेरी शेक’सारख्या वेगळ्या विषयांवरील शॉर्टफिल्म्समधील त्याने साकारलेल्या भूमिकाही तितक्याच लोकप्रिय आहेत. आत्ता सब टीव्हीवर गाजत असलेली ‘वागले की दुनिया’मधील राजेश वागले आणि कलर्स मराठीवरील ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस’च्या निवेदकाच्या भूमिकेत प्रेक्षक सुमीतला दररोज पाहत असून, प्रदीर्घ कालावधीनंतर त्याचा असं नित्यनेमानं टीव्हीवर दिसणं प्रेक्षकांना हवंहवंसं वाटत आहे. पण सुमीतचं मत मात्र याहून थोडं वेगळं आहे. तो इतरांसारखे पटापट नवनवीन प्रोजेक्ट्स साईन करण्यापेक्षा मोजकंच काम करण्याला प्राधान्य देतो.
प्रत्येक मालिकेनंतर तो शक्यतो तीनेक वर्षांचा ब्रेक घेऊन स्वतःच्या कलागुणांना विकसित करतो. मागच्या मालिकेचा साचा मोडून नव्या भूमिकेसाठी स्वतःला नव्याने तयार करतो. आपण कुठे चुकलो, कुठे चांगलं काम झालं याचं सिंहावलोकन करून, आपल्या अभिनयक्षमतेला कस लावूनच पुन्हा तो मैदानात उतरतो आणि आपल्या नव्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या खिश्यात टाकतो. याच कारणामुळे सुमीत प्रेक्षकांना इतर कलाकारांच्या तुलनेत कमी भूमिकांमध्ये पाहायला मिळतो पण त्यातही तो आपला दर्जा राखून असतो आणि म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटतो.
त्याचे डोळे बोलके आहेत. व्यक्तिरेखेला अनुसरून धारण केलेली देहबोली वाखाणण्याजोगी आहे. तो ‘हॅम्लेट’ही वाटतो आणि ‘फास्टर फेणे’ही वाटतो. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’मधले श्रीधर मास्तर, गणपतराव बेलवलकर असो वा ‘संदूक’चा वामनराव असो, प्रत्येक भूमिका अचूक कन्व्हिक्शनने सादर करण्याची कला सुमीतने जपली आहे. सुरेश वाडकरांचा शिष्य असल्याने त्याला उत्तम हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची जाण आहे आणि वेळोवेळी त्याच्या सुरावटींनी ते सिद्धही झालेलं आहे.
त्याला भरतनाट्यमदेखील करता येतं. पाकिटामध्ये इतर कुणाचा असो वा नसो, मात्र रफींचा फोटो कायम ठेवणाऱ्या सुमीतचं रफीप्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. मराठी रंगभूमीचा प्राण असलेले दुरवस्थेतील थिएटर्स नीट व्हावेत, रंगभूमीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवू नये यासाठी तो कसोशीने प्रयत्न करतानाही दिसतो.
आज वयाची पन्नाशी गाठणारा सुमीत तितकाच तरुण आणि प्रफुल्लित चेहरा घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सदोदित झटत असतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला नवनवे पैलू पाडून नव्या, आव्हानात्मक भूमिकांसाठी स्वतःला तयार करत असतो. मनोरंजन आणि समाजप्रबोधन या दोन्ही वेगवेगळ्या विषयांचा हात धरून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या कलाकाराला कलाकृती मीडीयाचा मानाचा मुजरा!!
=====
हे देखील वाचा: मराठी भाषेने चिन्मयीला काय दिले पहा
=====