‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
मनोरंजनाच्या ‘अल्याड’ व लॉजिकच्या ‘पल्याड’ असलेला सुमार भयपट
Alyad Palyad Review: खरंतर भयपट किंवा हॉरर हा भारतीय चित्रपटविश्वातील तसा दुर्लक्षित जॉनर. त्यातून मराठी चित्रपटक्षेत्रात तर अगदी हातावर मोजण्याइतकेच हॉरर सिनेमे बनले आहेत. त्यातही हॉरर कॉमेडी यांचं मिश्रण असलेले पछाडलेला, झपाटलेलासारखे काही मोजकेच चित्रपट आपल्याला आठवतात.
अलीकडे ‘झोंबिवली’सारख्या वेगळ्या चित्रपटातून हा प्रयोग हाताळला गेला, पण प्रॉपर कमर्शियल हॉरर कॉमेडी चित्रपट मराठीत फारसे नाहीच. ती उणीव भरून काढलीये नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अल्याड पल्याड’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाने. पण थांबा इतक्यात हुरळून जाऊन चित्रपट पाहायचं नक्की करू नका, कारण हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील ही पोकळी भरून काढण्यापलीकडे काहीच करत नाही. (Alyad Palyad Review)
कलात्मक तसेच प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर हा सिनेमा म्हणजे भरभरून मसाले आणि इतर अनेक गोष्टी टाकूनही अत्यंत बेचव आणि निरर्थक बनलेल्या भेळेसारखा आहे.
हिंदीत नुकताच या जॉनरचा अजय देवगण आणि आर माधवनचा आलेला ‘शैतान‘सुद्धा याच पठडीतला होता, पण त्याच्या कथानकाला एक रूपरेषा होता, त्यात दाखवण्यात आलेल्या जादूटोणा, करणी, ब्लॅक मॅजिकसंदर्भातल्या गोष्टी या बऱ्यापैकी विश्वसनीय वाटत होत्या. पण त्याच वाटेवर चालणारा हा ‘अल्याड पल्याड‘ सिनेमा कोणत्याही अॅंगलमधून पाहिला तरी तो मनोरंजक किंवा विश्वसनीय वाटत नाही. (Alyad Palyad Review)
एका गावात वर्षातले का महिन्यातले ३ दिवस आत्मे वास्तव्यास येतात आणि ते ३ दिवस गावातील गावकरी नदीच्या पल्याड जाऊन राहतात, तेही आपलं घरदार तिथल्या ग्रामदेवतेवर सोपवून! अशी पारंपारिक प्रथा असलेल्या गावात एक दिवस शहराकडून ३ तरुण येतात, त्यापैकी एक जण गावकऱ्याचा मुलगाच असतो.
पुढे काय होणार हे आपणा सगळ्यांनाच ठाऊक आहे. उत्सुकतेपोटी आणि जिज्ञासू वृत्तीमुळे ते तीन तरुण एका नाविकाच्या मदतीने त्या ३ दिवसांत गावात राहून यामागचं नेमकं रहस्य हुडकून काढायचं ठरवतात. (Alyad Palyad Review)
पुढची गोष्ट तर अगदी तुमच्या मनात येते तशीच आहे, त्यात उन्नीस बीस फरक करत कथा पुढे सरकते. मध्यांतरानंतर एक अत्यंत वेगळा ट्विस्ट दाखवायचा प्रयत्न करण्यात आला आहे खरा, पण तो ट्विस्ट इतका बालिश आहे की त्यामुळे होत्या नव्हत्या त्या साऱ्या कथानकाचं हसं झालंय.
सव्वादोन तासांचा सिनेमा असला तरी याची पटकथा इतकी रटाळ आणि कथा इतकी प्रेडीक्टेबल आहे की मध्यंतरानंतरचा ट्विस्ट सोडला तर सगळ्या गोष्टींचा तुम्ही अगदी अचूक अंदाज लावू शकता.
एका भयपटाची कथा, पटकथा नेमकी कशी हवी? त्यात उत्कंठा कुठपर्यंत ताणून ठेवावी? त्यातला हॉरर फॅक्टर लोकांना कसा भिडेल याकडे लेखक संजय नवगिरे यांनी आणखी लक्ष दिलं असतं तर कदाचित चित्रपट वेगळाच बनला असता.
योगेश कोळी यांची सिनेमॅटोग्राफी आणि तितिक्षा बागूल व सौमित्र यांचं एडिटिंग हे त्यातल्या त्यात बरं झालं आहे. पण त्यांच्या कामावरही बऱ्याच हिंदी आणि हॉलिवूडच्या दिग्दर्शकांचा पगडा आहे हे स्पष्टपणे जाणवत राहतं.
===
हेदेखील वाचा : अभिनयात अव्वल मात्र कथानकाच्या बाबतीत सुमार असा ‘जुनं फर्निचर’
===
ऋग्वेद कुलकर्णी व अमित पाटील यांचं संगीत हे सहज विस्मृतीत जाण्यासारखंच आहे. एकमेव आयटम सॉन्ग आहे जे अत्यंत कर्णकर्कश आणि बेताल असंच आहे. बाकी बॅकग्राऊंड स्कोअरच्या माध्यमातून भीती निर्माण करण्यात आली आहे पण तेदेखील एका मर्यादेपलीकडे लाऊड वाटतं आणि तुमचा रसभंग करतं. (Alyad Palyad Review)
व्हिज्यूअल इफेक्टच्या बाबतीत तर जो काही बालिशपणा आपल्याला पाहायला मिळतो त्यापेक्षा २००२ मध्ये आलेला ‘जानी दुश्मन’सारखा चित्रपट कित्येक पटीने बरा होता असं राहून राहून वाटतं.
दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांचे आधीचे दोन चित्रपट आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांचा हा ‘अल्याड पल्याड’ त्यामानाने ‘बरा’ चित्रपट आहे, पण तरी तो हॉरर चित्रपटांच्या यादीत केवळ आपली जागा भरण्यापलीकडे काहीच करत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे. (Alyad Palyad Review)
अभिनयाच्या बाबतीत तर सगळा आनंदी आनंदच आहे. गौरव मोरेचा हास्यजत्रा छाप परफॉर्मन्स, सक्षम कुलकर्णीसारख्या चांगल्या कलाकाराचा अत्यंत सुमार अभिनय, भाग्यम जैन नामक एका नव्या ठोकळ्याचा अभिनय करण्याचा किरकोळ प्रयत्न, आपला मुलगा सरपंचाच्या पोरीला पळवून नेईल या आनंदात खुश होणारी आई, डोळे वटारून जादूटोणा करणारी एक रिकामटेकडी बाई आणि इतर काही साळक्या माळक्यांची ओव्हर अॅक्टिंग यापलीकडे ‘अभिनय’ तुम्हाला सिनेमात शोधूनही सापडणार नाही.
हा चित्रपट पाहून एक प्रश्न मात्र नक्की पडतो की मकरंद देशपांडे, संदीप पाठक यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची नेमकी काय मजबूरी असेल की त्यांना असं काहीतरी काम करावं लागतंय.
खरंतर मकरंद देशपांडे आणि संदीप पाठक या मनोरंजनसृष्टीतील नावाजलेले आणि अत्यंत ताकदीचे असे कलाकार, पण हे सांगताना अक्षरशः खेद वाटतो की यात त्यांची कामंदेखील या सिनेमाच्या कथेप्रमाणेच हास्यास्पद झालेली आहेत.
बाकी कॉस्च्युम, मेकअपच्या बाबतीत तर न बोललेलंच बरं. कुठलंही तारतम्य नसलेला, कंट्रोल नसलेला चित्रपट कसा वाहवत जातो अगदी तसंच या ‘अल्याड पल्याड’च्या बाबतीत घडताना आपल्याला पाहायला मिळतं. (Alyad Palyad Review)
हॉरर कॉमेडीच्या नावाखाली प्रेक्षकांना गृहीत धरून वाटेल ते दाखवलं तरी लोक टाळ्या वाजवतील हा मराठी निर्माते आणि दिग्दर्शकांचा भ्रम लवकरच दूर होणं फार गरजेचं आहे. खरंतर महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या खेड्यात अशा बऱ्याच दंतकथा तुम्हाला ऐकायला मिळतील. (Alyad Palyad Review)
नुकत्याच हिंदीत आलेल्या ‘मुंज्या’ने अशाच एका दंतकथेचा किती उत्तमरित्या वापर केलाय याचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. खरंतर ‘अल्याड पल्याड’मध्ये तसं काहीतरी नक्कीच दाखवता आलं असतं, पण हा चित्रपट हॉररपेक्षा विनोदाला अधिक महत्त्व देतो आणि तिथेच तो फसतो.
जादूटोणा, करणी, भूतबाधा उतरवणे तंत्रमंत्र यावर कुणाचा विश्वास असो किंवा नसो त्या गोष्टी चित्रपट स्वरूपात मांडायच्या असतील तर त्या तितक्या गांभीर्यानेही मांडल्या गेल्याच पाहिजेत, त्याला हॉरर कॉमेडीचं गोंडस नाव देऊन त्या नावाखाली काहीही दाखवणं अजिबात योग्य नाही.
हॉलिवूडमध्ये ‘Exorcism’ वर बेतलेल्या एकाही चित्रपटात तुम्हाला असा थिल्लरपणा कधीच पाहायला मिळणार नाही. इथे हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशी तुलना करण्याचा अजिबात हेतू नसून अशा विषयांबाबत जी संवेदनशीलता बाळगण अपेक्षित असतं त्याचा विचार नक्कीच व्हायला हवा.
केवळ पैसा आहे म्हणून हो निर्माता किंवा दिग्दर्शक इतकं सहज-सोप्पं हे क्षेत्र अजिबात नाही याचा विचार अशा ‘हौशी’ निर्माते व दिग्दर्शकांनी नक्कीच करायला हवा.
मराठी सिनेमात ‘अल्याड पल्याड’सारखे वेगळे प्रयोग नक्कीच व्हायला हवेत आणि प्रेक्षकही ते आनंदाने स्वीकारतील, पण त्यात काही प्रमाणात गांभीर्य हे असायलाच हवं. (Alyad Palyad Review)
–अखिलेश विवेक नेरलेकर
चित्रपट: अल्याड पल्याड
कलाकार: मकरंद देशपांडे, संदीप पाठक, गौरव मोरे, माधुरी पवार, अनुष्का पिंपुटकर, सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन
निर्माते: शैलेश जैन, महेश निंबाळकर
दिग्दर्शक: प्रीतम एसके पाटील
पटकथा, संवाद: संजय नवगिरे
संगीत: ऋग्वेद कुलकर्णी व अमित पाटील
दर्जा : ५ पैकी १.५ स्टार