‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
आपला मानूस: आत्महत्या, हत्या की खून? या प्रश्नाभोवती फिरणारा रहस्यमय चित्रपट
सध्याच्या धावपळीच्या युगात कोणालाच कोणासाठी वेळ नाही. प्रत्येकजण ‘बिझी’ आहे. करिअरसाठी सगळेच धावतायत… पण कुठेतरी सुरकुतलेले हात वाट बघत असतात, कोणीतरी येऊन त्यांचा हात हातात घेईल. त्यांचे एकाकी दिवस आणि लांबलचक रात्री आसुसलेल्या असतात आपुलकीच्या दोन शब्दांसाठी! पण याची जाणीव कोणाला असते? आपलंसं वाटणारं माणूस अनेकदा आपल्या जवळ असूनही नसल्यासारखंच असतं. ‘जनरेशन गॅप’ हा शब्द किती सहजपणे वापरला जातो. पिढी बदलली की विचार बदलतात, पण आपलं माणूस? आपलं माणूस तर प्रत्येकालाच हवं असतं ना? (Marathi Movie Aapla Manus)
२०१८ साली आलेल्या ‘आपला मानूस’ या चित्रपटात घरात एकटी राहणारी वृद्ध माणसं आणि त्यांच्या समस्यांवर रहस्यमय पद्धतीने प्रकाश टाकण्यात आला आहे. आबा गोखले (नाना पाटेकर) हे राहत्या घराच्या बाल्कनीमधून खाली पडतात. आता हा अपघात असतो, आत्महत्या असते, की खून, या प्रश्नाभोवती चित्रपटाचं कथानक फिरत राहतं.
आबा गोखले त्यांचा मुलगा राहुल (सुमित राघवन) आणि सून भक्ती (राधिका हर्षे) यांच्यासोबत राहत असतात. राहुल वकील असतो तर, भक्ती गणिताची प्राध्यापक. सुनेचं नोकरी करणं आबांना पसंत नसतं. शिवाय नोकरीमुळे सुनेनं त्यांच्या नातवाला हॉस्टेलला ठेवलेलं असतं, या गोष्टीमुळे ते नाराज असतात. राहुल आणि भक्तीची खर्चिक जीवनशैली त्यांना खटकत असते.
घरात सतत आबा आणि भक्तीची ‘तू तू मै मै’ चालू असते आणि यामध्ये राहुलचं सॅन्डविच होत असतं. सामान्यतः जवळपास प्रत्येक घरात थोड्याफार फरकाने असंच चित्र दिसत असेल. पण इथे आबा बाल्कनीमधून खाली पडलेले असतात आणि या घटनेचा पोलीस तपास सुरु झालेला असतो. (Marathi Movie Aapla Manus)
इन्स्पेक्टर मारुती नागरगोंजे (नाना पाटेकर) या घटनेचा तपास करत असतात. नागरगोंजे यांचा चेहरा आबांशी मिळताजुळता असतो. काहीसा विक्षिप्त असा हा माणूस कधी ही आत्महत्या असल्याचं पुराव्यासकट सिद्ध करतो, तर कधी खुनाचा संशय घेतो. या माणसाच्या डोक्यात काय चाललं आहे याचा थांगपत्ताच लागत राहुल आणि भक्तीला लागत नाही. त्यांची चौकशीची पद्धतही विचित्रच असते. मारुती नागरगोंजे आणि एकूणच घडलेल्या घटनेमुळे राहुल आणि भक्ती त्रासून जातात.
घडलेल्या घटनेच्या एकामागून एक वेगवेगळ्या थिअरीज मारुती नागरगोंजे मांडत असतात. बरं या थिअरीज इन्स्पेक्टर पुराव्यानिशी सिद्ध करत असतात त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार खायची वेळ भक्ती आणि राहुलवर येते. या दोघांची चिडचिड वाढतच जाते आणि चित्रपट अधिक रंगतदार होत जातो.
अशाप्रकारच्या सामाजिक विषयावर आधारित रहस्यमय कथानक प्रथमच कोणी मांडलं असेल. मुळात असा विचार करणं हेच मुळात कौतुकास्पद आहे. इथे लेखक डॉ. विवेक बेले यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांना मोलाची साथ दिली ती दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी. या गुणी दिग्दर्शकाने चित्रपट कुठेही कंटाळवाणा किंवा ड्रामॅटिक होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. मात्र चित्रपटाचं कथानक काहीसं एकांगी वाटतं. आबांची काळजी घेणाऱ्या राहुल आणि भक्तीला आबांनीही समजून घ्यायला हवं. थोडक्यात आपला माणूस वाट बघत असतो बरोबर आहे, पण त्यानेही धावपळ करणाऱ्यांना, त्यांच्या भावनांना, त्यांच्या स्वप्नांना समजून घ्यायला हवं; हा मुद्दा चित्रपटात कुठे आलाच नाही. चित्रपट बघताना आणि शेवटीही हे खटकतं.
बाकी आत्महत्या, हत्या की अपघात या प्रश्नाचं उत्तर चित्रपटाच्या शेवटी मिळतं. पण ते मिळेपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवायचं अवघड काम दिग्दर्शकाने अगदी व्यवस्थित केलं आहे. अवघड यासाठी की, कथेमध्ये नवीन काहीच घडत नाही. पात्रांची संख्याही मोजकीच. त्यामुळे जवळपास सव्वा दोन तास प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवणं नक्कीच सोपं नाही. चित्रपटातल्या काही गोष्टी खटकतात पण मुद्दाम इथे लिहीत नाही कारण त्या ‘स्पॉईलर’ ठरू शकतील. (Marathi Movie Aapla Manus)
हा चित्रपट डॉ. विवेक बेले यांच्या काटकोन त्रिकोण (मराठी) या नाटकावर आधारित होता. चित्रपटाचे निर्माते होते अजय देवगण. त्यांनी यामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिकाही साकारली आहे. नाना पाटेकर यांनी दोन्ही भूमिका सफाईदारपणे साकारल्या आहेत. सुमित राघवन आणि राधिका हर्षेही ठीकठाक.
=============
हे ही वाचा: जेव्हा उमेश कामतला एक ‘नॉन मराठी मुलगा’ पोलिओग्रस्त समजला…
ऑपेरा हाऊस: एका हेरिटेज वास्तूचा प्रवास
=============
कोणताही आरडाओरडा नाही, मेलोड्रामा नाही, कुठलीही महागडी लोकेशन्स नाहीत की मोठमोठ्या वैचारिक गोष्टीही नाहीत. यातून दिला आहे फक्त एक सामान्य संदेश. हा संदेश आहे तरुणांसाठी… प्रौढांसाठी… खरंतर प्रत्येकासाठी… ज्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसला आहे त्यांचा आपला माणूस!
या चित्रपटाचा गुजराती रिमेक ‘डिअर फादर’ या नावाने प्रदर्शित झाला होता. मध्यंतरी चित्रपटाचा हिंदीत रिमेक होणार असून त्याचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण अजून तरी यासंदर्भात कोणतीही बातमी आलेली नाही. IMDB वर या चित्रपटाला ७ रेटिंग देण्यात आलं असून हा नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. घाबरू नका, फ्री मध्ये बघायचा असेल तर, MX प्लेअरने तुमची सोय केली आहे. तिथे हा चित्रपट अगदी फ्री मध्ये बघता येईल.