अनवट: अकल्पित घटनांचा, वेगळ्या वाटेवरचा भयपट
भयपट किंवा हॉरर चित्रपट म्हटलं की, डोळ्यासमोर येतात चित्रविचित्र भयप्रद चेहरे, अंधार, विचित्र हुंकार, कर्कश्य हसण्याचे चित्कार, अंगावर येणारं संगीत, रक्ताच्या उलट्या, छताला किंवा भिंतीला लोंबकळत असलेली भुतं आणि त्याने झपाटलेली माणसं… पण याहीपेक्षा वेगळा हॉरर चित्रपट असू शकतो आणि हे सिद्ध केलं आहे ‘अनवट (Anvatt)’ या मराठी चित्रपटाने.
मराठी चित्रपट बरेचदा ‘अंडररेटेड’ असतात. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘अनवट’ हा असाच एक ‘अंडररेटेड’ चित्रपट आहे. चित्रपटाची कथा एका गावात घडताना दाखवण्यात आली आहे. शहरातील प्रसिद्ध डॉक्टर विनय (आदिनाथ कोठारे) आणि मधुरा (उर्मिला कानिटकर -कोठारे) या तरुण जोडप्याच्या आयुष्यात घडलेली ही कहाणी आहे. विनयच्या आजोबांची इच्छा असते की, त्याने किमान एक वर्ष तरी आपल्या पत्नीसह गावात जाऊन प्रॅक्टिस करावी; गावातल्या लोकांची सेवा करावी. त्यामुळे विनय आणि मधुरा एका आडगावात राहायला जातात. (Marathi Movie Anvatt)
चित्रपटात साधारणतः ऐशी ते नव्वदच्या दरम्यानचा म्हणजेच मोबाइलपूर्व काळ दाखवण्यात आला आहे. मधुरा आर्किऑलॉजिस्ट असते. तिला गावातलं आयुष्य अनुभवायचं असतं. तिथल्या वास्तूंचा अभ्यास करायचा असतो म्हणून विनय आणि मधुरा क्वार्टरमध्ये न राहता राहण्यासाठी एका वाड्याची निवड करतात. मात्र इथे राहायला आल्यावर मधुराला हा वाडा काहीसा गूढ वाटू लागतो. पण ती दुर्लक्ष करते. ती वाड्याचा अभ्यास करण्यासाठी वाड्यामध्ये आणि भोवतालच्या परिसरात फिरून तिथले फोटो काढते. पण या दरम्यान तिला विचित्र भास व्हायला लागतात. गावात काम करणारी ‘बाईजमा’ तिला वाड्याभोवती फिरू नको असं सांगते.
एक दिवस मधुराला बाथरूममध्ये कोणीतरी असल्याचा भास होतो. ती घाबरून बाहेर येते. ‘बाईजमा’ जेव्हा बाथरूममध्ये बघायला जाते तेव्हा तिचा अपघात होतो आणि ती जखमी होते. यानंतर विनयला सदा कामत, ‘साहेबू आणि गुलाबची’ कहाणी सांगतो. पुढे काय होतं हे मात्र चित्रपट बघून जाणून घेण्यात जास्त मजा आहे.
चित्रपटाचं संगीत आणि लोकेशन ही चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण हे गगनबावडा आणि तळकोकणातल्या गावांमध्ये पावसाळ्यात झाल्यामुळे निसर्ग सौंदर्याचं मनमुराद दर्शन चित्रपटामधून घडतं. चित्रपटात आदिनाथ कोठारे व उर्मिला कोठारे यांच्यासह मकरंद अनासपुरे, विभावरी देशपांडे, भार्गवी चिरमुले, किशोर कदम हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. इतरांच्या तुलनेत आदिनाथचा अभिनय म्हणावा तेवढा प्रभावी झाला नाहीये. उर्मिला मात्र यामध्ये कमालीची गोड दिसलेय. (Marathi Movie Anvatt)
चित्रपटातील अनेक दृश्यं मनात भीती, उत्कंठा निर्माण करतात. यामध्ये चित्रपटाच्या संगीताचा खूप मोठा वाटा आहे. एका रम्य वातावरणाला भयप्रद, तर ओसाड जागेलाही अगदी ‘रोमँटिक’ बनवण्याएवढी प्रचंड ताकद संगीतामध्ये असते. पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि शंकर -एहसान- लॉय यांचं संगीत चित्रपटात आवश्यक असणारं गूढ वातावरण निर्माण करण्यात यशस्वी ठरलं आहे.
चित्रपटात एकूण दोनच गाणी आहेत ही आणखी एक जमेची बाजू. कारण भयपट बघताना अनेकदा गाणी नकोशी वाटतात. सुरुवातीला विभावरी आपटे जोशी यांच्या आवाजातलं ‘ये रे घना ये रे घना…’ म्हणावं तेवढं ‘क्लिक’ होत नाही. अर्थात वर्षानुवर्षे आशाजींच्या आवाजात ऐकलेलं हे गाणं इतर कोणाच्या आवाजात कानाला सुखावत नाही, हे त्यामागचं एक कारण असू शकतं. नंतर ‘तरुण आहे रात्र अजूनी…’ हे शंकर महादेवन यांनी गायलेलं गाणं मात्र सुंदर जमून आलं आहे. या गाण्यावर आशाजींची छाप असली तरी, हे गाणं ‘मेल व्हॉइस’मध्ये ऐकताना कुठेही खटकत नाही. (Marathi Movie Anvatt)
उत्तम कथानक, कलाकारांचा दमदार अभिनय, तितक्याच ताकदीची सिनेमॅटोग्राफी आणि संगीताची जोड या सर्व गोष्टी चित्रपटामध्ये आहेत. शेवटची रहस्याची उकल तर पूर्णपणे अनपेक्षित. एवढं सगळं असूनही चित्रपटात कुठेतरी काहीतरी कमी जाणवते. उत्तम कथा असूनही कथाविस्तार मात्र योग्य पद्धतीने न झाल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. चित्रपटाची लांबी १ तास ५० मिनिटं इतकी कमी आहे. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी अत्यंत प्रभावी दिग्दर्शन केलं आहे. परंतु ते अजूनही प्रभावी होऊ शकलं असतं.
दिग्दर्शकाने अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांवर सोडून दिली आहेत. वेबसिरीजमध्ये या गोष्टी चालून जातात कारण पुढच्या सीझनमध्ये कथाविस्तार करताना अथवा सस्पेन्स निर्माण करण्यासाठी त्या उपयोगी पडतात. पण चित्रपटांमध्ये हा पर्याय नसतोच. किमान अर्धा तास चित्रपटातील काही दृश्यांच्या स्पष्टीकरणासाठी घेता आला असता आणि तो आवश्यक होता. मुळात चित्रपटाची लांबी कमी असल्यामुळे यासाठी वावही होता. तसं झालं असतं तर ‘अनवट’ हा हॉलिवूडच्या तोडीचा चित्रपट ठरला असता, हे नक्की. अर्थात यामुळे चित्रपट बघताना फारसा फरक पडत नसला तरी चित्रपटाच्या शेवटी मात्र अनेक अनुत्तरित प्रश्न मनात घर करून राहतात आणि त्याची उत्तरे शोधताना काही गोष्टी आपल्याला ‘गृहीत’ धराव्या लागतात. मात्र कोणत्याही ओंगळवाण्या दृश्यांशिवाय, अंगावर येणाऱ्या कर्णकर्कश्य संगीताशिवाय, हिडीस पीडीस हावभावांशिवाय ‘हॉरर’ चित्रपट बनवता येतो, हे दिग्दर्शकाने दाखवून दिलं आहे, हे देखील मान्य करावंच लागेल.
=============
हे देखील वाचा – असंभव: प्राईम टाईमला प्रसारित झालेली गूढ, रहस्यमय मालिका
=============
एक उत्तम हॉरर चित्रपट बघायचा असल्यास ‘अनवट (Anvatt)’ नक्की बघा. हा चित्रपट ‘जिओ सिनेमा’वर उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांचं ‘जिओ सिमकार्ड’ आहे त्यांना हा चित्रपट अगदी फ्री मध्ये बघता येईल. बाकीच्यांनी अजिबात काळजी करू नका कारण हा चित्रपट युट्यूबवरही उपलब्ध आहे आणि तिथेही तुम्ही अगदी फ्री मध्ये बघू शकता.