जेव्हा देवानंदला त्याची ५५ वर्षांपूर्वीची कॅप एका चाहत्याकडे पुन्हा सापडते!
कदाचित: भूतकाळात घडलेल्या घटनेचं गूढ उकलणारा एक हळवा प्रवास
एक अत्यंत हुशार न्यूरोसर्जन…सर्वांना समजून घेणारी मनमिळावू पण तेवढीच हजरजबाबी आणि स्वतःच्या फिटनेसबाबत जागरूक असणारी. एक गुन्हेगार… आपल्या बायकोच्या खुनासाठी झालेली शिक्षा भोगून जेलमधून २० वर्षांनी बाहेर पडलेला. या दोघांचा एकमेकांशी संबंध असू शकतो? अर्थातच हो! या दोघांच्या परस्पर संबंधांवर आणि भूतकाळात घडलेल्या घटनेवर आधारित चित्रपट म्हणजे ‘कदाचित (Kadachit)’!
गायत्री (अश्विनी भावे) एक प्रसिद्ध न्यूरोसर्जन असते. भूलतज्ज्ञ असणारा तिचा सहृदय पती शेखर (सचिन खेडेकर) तिच्यावर जीवापाड प्रेम करत असतो. हॉस्पिटमधला मानसोपचार तज्ज्ञ राजेश (तुषार दळवी) या दोघांचा जवळचा मित्र आणि हितचिंतक असतो, तर स्त्रीरोग तज्ज्ञ स्मिताचं (सुलेखा तळवलकर) शेखरवर एकतर्फी प्रेम असतं. परंतु त्याने तिला नाकारून गायत्रीशी लग्न केलेलं असतं. गायत्रीची स्मृती अतिशय तल्लख असते. प्रत्येक पेशंटची ‘हिस्ट्री’, त्याला दिलेली ‘ट्रीटमेंट’ तिच्या व्यवस्थित लक्षात असते. गायत्री आणि शेखर यांना एक मुलगीही असते. एकंदरीतच सर्वकाही सुरळीत चालू असतं. पण अचानक गायत्रीच्या आयुष्यात एक वादळ येतं. तिचा भूतकाळ तिच्यासमोर येऊन उभा ठाकतो.
जेलमधून सुटलेला गुन्हेगार तिच्या घरी येतो. हा गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून तिचे वडील असतात. आपल्या आईचा खून करताना तिने त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं असतं. लहान वयात त्यांच्याविरुद्ध कोर्टात साक्ष द्यायची हिम्मतही तिने दाखवलेली असते. खरंतर तिच्या साक्षीमुळेच तिच्या वडिलांना शिक्षा झालेली असते आणि आता आपली शिक्षा भोगून तिचे वडील परत आलेले असतात. (Marathi movie Kadachit)
गायत्रीच्या मनात आपल्या वडिलांबद्दल प्रचंड राग असतो. पण शेखरला मात्र जबाबदारीची जाणीव असते. तो त्यांना आपल्या घरात ठेवून घेतो. गायत्रीला अर्थातच हे मान्य नसतं. अशातच एक दिवस तिचे वडील तिला सांगतात की, तू जे बघितलंस ते खरं नव्हतं. मी तुझ्या आईला मारलं नव्हतं. तो एक अपघात होता. तुझ्यामुळे मी अकारण २० वर्ष तुरुंगवास भोगला.
या घटनेननंतर गायत्रीचं भावविश्व बदलतं. मनात अपराधीपणाची भावना दाटून येते. आपली स्मृती आपल्याला दगा देणार नाही. त्यामुळे आपले वडील खोटं सांगतायत, याबद्दल तिला पक्की खात्री असते. पण तरीही त्यांनी सांगितलेलं खरं असेल तर…या कल्पनेनं तिचा थरकाप उडतो.. अनेकांचे जीव वाचवणारी गायत्री आपल्या गैरसमजुतीमुळे आपल्या वडिलांना शिक्षा भोगावी लागली, त्यांचं आयुष्य उद्धवस्थ झालं ही कल्पनाच ती सहन करू शकत नाही. पुढे काय होतं? गायत्रीचे वडील खरं बोलत असतात की खोटं? जर खरं असेल, तर गायत्री सत्य स्वीकारू शकते का? आणि नसेल तर ती पुढे कोणतं पाऊल उचलते? या सर्व प्रश्नांभोवती चित्रपट फिरत राहतो. शेवटी मात्र जे सत्य समजतं ते कल्पनेच्या पलीकडलं असतं. (Marathi movie Kadachit)
गायत्रीची भूमिका अश्विनी भावे यांनी अतिशय अप्रतिमरीत्या साकारली आहे. एक आत्मविश्वासी न्यूरोसर्जन ते आत्मविश्वास गमावलेली गायत्री या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावरचा त्यांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे. त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत सदाशिव अमरापूरकर अगदी चपलख बसतात. सचिन खेडेकर आणि तुषार दळवी यांच्याही भूमिका चांगल्या झाल्या आहेत. सुलेखा तळवलकरची व्यक्तिरेखा मात्र चित्रपटात नेमकी कशासाठी आहे, हा प्रश्न पडावा इतकी निरर्थक आहे. ही व्यक्तिरेखा चित्रपटात नसती तरी काहीच फरक पडला नसता. चित्रपटात गायत्रीचा राग राग करण्याव्यतिरिक्त तिला फारसं कामही नाही की, तिच्याशी निगडित कोणता विशेष प्रसंगही घडत नाही.
२००७ साली आलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून अश्विनी भावे यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं. एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट निर्मितीचं धाडस त्यांनी दाखवलं आणि त्या यामध्ये यशस्वीही झाल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते चंद्रकांत कुलकर्णी. चित्रपटात रहस्याचा भाग असला तरी, हा रहस्यपट नाहीये. तरीही चित्रपटाची कथा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते. कोणताही मेलोड्रामा नाही की कट कारस्थानं नाहीत. आहेत ते फक्त भावभावनांचे चढउतार, एक खिळवून ठेवणारं रहस्य आणि त्या रहस्याचा अकल्पित पण वास्तववादी शेवट. (Marathi movie Kadachit)
=========
हे देखील वाचा – एक हळवी प्रेमकहाणी: महाराष्ट्राची महामालिका ‘कुलवधू (Kulvaddhu)’
=========
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक दर्जेदार चित्रपट निर्माण झाले आहेत. फक्त ते लोकांपर्यत पोचण्यात काहीसे कमी पडले आहेत. ‘कदाचित’ हा चित्रपट सहकुटुंब बघता येण्यासारखा चित्रपट आहे. हा चित्रपट बघायचा असल्यास तो युट्युबवर फ्रीमध्ये बघता येईल. IMDB वर या चित्रपटाला ७.९ रेटिंग देण्यात आलं आहे.