नॉट ओन्ली मिसेस राऊत: मैत्री करताय? सावधान.. तुमचा विश्वासघात होऊ शकतो
मराठी चित्रपटांचा विचार केल्यास स्त्रीप्रधान चित्रपट तुलनेनं जास्त बनतात. परंतु त्यात कौटुंबिक चित्रपटांची संख्या जास्त आहे. पण काही चित्रपटांनी मात्र उत्तम विषय तर हाताळलाच शिवाय स्त्रीप्रधान चित्रपटांची एक वेगळी बाजूही मांडली. असाच एक चित्रपट म्हणजे ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत (Not Only Mrs. Raut)’.
चित्रपटाची कहाणी म्हणजे समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब आहे. चित्रपटात दाखवलेली घटना थोड्याफार फरकाने समाजात घडलेली असेल, घडत असेल. अर्थात त्यावरचा प्रतिसाद मात्र वेगवेगळा असू शकतो. चित्रपटामध्ये ‘फेमिनिस्ट’ या संकल्पनेला अत्यंत योग्य पद्धतीने सादर केल्याबद्दल दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचं अभिनंदन!
ही कहाणी आहे पतीच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या मिसेस राऊत आणि वकील असूनही पुरुषी अहंकाराची शिकार असणाऱ्या स्वातीची. एका आईने घेतलेल्या बदल्याची; स्वाभिमान आणि नैतिकता जपण्यासाठी कुटुंबाच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या उच्चशिक्षित स्त्रीची. खरंतर स्वाती आणि मिसेस राऊत यांचा एकमेकींशी काहीच संबंध नसतो. पण पुढे या दोघीही एकमेकींचं आयुष्य बदलायला कारणीभूत ठरतात.
मिसेस राऊत पतीच्या मृत्यूनंतर नोकरी सांभाळून आपल्या लहान मुलीला सांभाळणारी एक साधी सरळ मध्यमवर्गीय कुटुंबातली स्त्री. वैधव्याचं दुःख, एकाकी आयुष्य, एकेरी पालकत्व या साऱ्या आघाड्यांवर लढत असतानाच तिच्या आयुष्यात तिचा बॉस मित्र बनून येतो. मैत्रीचं नातं छान उमलत जातं. पण मिसेस राऊत यांच्या मुलीला मात्र हे पसंत नसतं. पण मिसेस राऊत मात्र मैत्रीच्या या नात्याला मनापासून स्वीकारतात, या नात्यावर विश्वास ठेवतात. (Marathi Movie Not Only Mrs. Raut)
स्वाती एक उच्चशिक्षित हुशार तरुणी. शहरातील नामांकित वकिलाच्या घरची सून. घरात वकिली वातावरण असून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत जुनाट आणि बुरसटलेला. सतत नवऱ्याच्या कोत्या मनोवृत्तीची जाणीव, मूल न झाल्यामुळे अपमानित होणारी थोरली जाऊ अशा वातावरणाशी ती जुळवून घ्यायचा प्रयत्न करत असते. अशातच तिच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागतं.
खुनाचा गुन्हा केलेल्या दुर्दैवी स्त्रीची केस तिच्यासमोर येते आणि आपल्या कुटुंबाच्या विरोधात उभं राहून स्वाती ही केस स्वीकारते. त्या स्त्रीला न्याय मिळवून द्यायचा निश्चय करते. ती स्त्री असते मिसेस राऊत. हे वाचताना कथा अगदी सामान्य वाटेल पण ती ज्या पद्धतीनं मांडण्यात आली आहे त्यातून कथेचं वेगळेपण सिद्ध होतं.
न्यायदेवता आंधळी असते. पण ती इतकी आंधळी असते की, निरपराध व्यक्तीलाही शिक्षा देते. पण अशावेळी न्याय मिळविण्यासाठी कोणी कंबर कसली तर त्या व्यक्तीचं काय चुकलं? या मुद्द्यावर उभी असणारी मिसेस राऊत यांची केस. आणीत इ लढणारी तरुण वकील स्वाती या दोघींभोवती चित्रपटाचं कथानक फिरत राहतं. या केसमध्ये पुढे काय होतं, मिसेस राऊतना न्याय मिळतो का, स्वातीचं पुढे काय होतं. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देताना दिग्दर्शकाने सामाजिक संदेशही दिला आहे. (Marathi Movie Not Only Mrs. Raut)
चित्रपटातले काही संवाद उत्तम जमून आले आहेत. “ॲडजस्टमेन्ट आणि एक्स्प्लॉयटेशन यामधला फरकच आपल्याकडे अजूनही समजला नाहीये. सावित्रीबाई गेल्या तेव्हा खूप मोठी अंतयात्रा निघाली होती. आपण अजूनही त्या अंतयात्रेत चालतोच आहोत…. आपण स्वतंत्र झालोच नाही. आपण अजूनही चालतेच आहोत…तिचा अदृश्य पदर धरून.” हे असे संवाद समाजामधल्या वास्तवाची जाणीव करून देतात. अर्थात याच्या जोडीला, “अन्याय केवळ स्त्रीवरच होत नाही तर, तो पुरुषावरही होतो” ही अत्यंत महत्त्वाची आणि तेवढीच दुर्लक्षित गोष्ट एका छोट्याशा प्रसंगात का होईना, पण अधोरेखित करायला दिग्दर्शक विसरलेला नाही. अर्थात या गोष्टीला केवळ संवादापुरतं मर्यादित न ठेवता एखाद्या प्रसंगातून दाखवलं असतं, तर ते जास्त प्रभावी ठरलं असतं.
हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. आज परिस्थिती बदलली आहे, असं आपण म्हणतो. पण प्रत्यक्षात कितीतरी मिसेस राऊत समाजात तोंड दाबून मुक्याचा मर सहन करत असतील. कितीतरी स्वाती चार भिंतींच्या आड होणारा आत्मसन्मानाचा अपमान सहन करत असतील. (Marathi Movie Not Only Mrs. Raut)
=============
हे ही वाचा: जेव्हा निर्माते स्वतः विचारतात ‘पिक्चर कैसी हैं….?’
जेव्हा उमेश कामतला एक ‘नॉन मराठी मुलगा’ पोलिओग्रस्त समजला…
=============
या चित्रपटामध्ये अदिती देशपांडे, मधुरा वेलणकर, रवींद्र मंकणी, तुषार दळवी, मोहन जोशी, विक्रम गोखले, मिलिंद शिंदे, इ. कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. कलाकारांनी आपली भूमिका चोख बजावून कथा आणि दिग्दर्शनाला न्याय दिला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ‘सिल्व्हर लोटस अवॉर्ड (रजत कमल), तसंच मिसेस राऊतच्या भूमिकेसाठी अदिती देशपांडे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. (Marathi Movie Not Only Mrs. Raut)
नॉट ओन्ली मिसेस राऊत हा चित्रपट बघताना तो समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण अशा व्यक्तीवर विश्वास ठेवतो जो त्या विश्वासाच्या लायक नसतो, विश्वासघात करतो. त्यामुळे सामाजिक वास्तवासोबत नकळत देण्यात आलेला हा संदेश जरूर लक्षात ठेवा. हा चित्रपट युट्युबवर उपलब्ध असून IMDB वर या चित्रपटाला ७.९ रेटिंग देण्यात आलं आहे.